|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » टेंभूचा मुद्दा राजकारणासाठी नसून शेतकऱयांच्या हितासाठी

टेंभूचा मुद्दा राजकारणासाठी नसून शेतकऱयांच्या हितासाठी 

वार्ताहर/ खानापूर

टेंभूच्या पाण्याचा मुद्दा हा राजकीय वापरासाठी नसून शेतकऱयांच्या आर्थिक प्रगतीसाठी आहे. टेंभूच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होवून खानापूर घाटमाथ्यावर पाणी सोडण्यात येईल. ग्रामपंचायत निवडणूकीत जनतेने आपणांस साथ दिली असून त्यांच्या विकास कामांतून आणि चांगल्या सेवा देवून संपर्कात रहावे. गावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार अनिल बाबर यांनी केले.

खानापूर तालुक्यातील करंजे येथे नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचा आमदार अनिल बाबर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बाबर बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य निलम सकटे, पंचायत समिती सदस्या सारिका माने, गणपतराव भोसले, माजी चेअरमन कृष्णदेव शिंदे, माजी पंचायत समिती उपसभापती दादासो पाटील, माजी व्हाईस चेअरमन पोपट माने, आटपाडी पंचायत समिती माजी सभापती विजय पाटील, नवनुयक्त सरपंच कलावती रास्ते, संभाजी जाधव, अरविंद पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आमदार बाबर म्हणाले, टेंभूच्या पाण्याच्या मुद्दय़ाचा वापर राजकीय स्वार्थासाठी कधीचच् केला नाही. टेंभू योजनेचे पाणी खानापूर घाटमाथ्यावर आणणे, हे माझे कर्तव्य आहे. करंजे गावात आत्तापर्यंत 9 साखळी सिमेंट बंधारे उभारले असून अजून दोन बंधारे प्रस्तावित आहेत. टेंभूच्या चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचे काम जोरात सुरू असून काही कारणाने घाटमाथ्यावर पाणी येण्याच्या तारखा लांबत आहेत. मात्र पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणारा मी नाही. पळशी गावाने टेंभूचे पाणी टप्प्यात आले असताना निवडणूकीवर बहिष्कार घातला. हा निर्णय अविश्वसनीय आहे. ग्रामपंचायत स्तरावर बहिष्कार घालून पाणी मिळत नसते, अशी टिकाही आमदार बाबर यांनी केली.

पळशी गावास टेंभूचे पाणी मिळावे, यासाठी राज्य स्तरावर प्रयत्न केले आहेत. पळशी गावच्या शेतकऱयांच्या पाण्यासाठीचा आणि द्राक्षबागा जगविण्याचा संघर्ष मला माहित आहे. मी स्वतः पळशीला पाणी मिळावे, यासाठी आग्रही असून पाचव्या टप्प्याचे काम आणि पाईपलाईनचे काम लवकरच पूर्ण होईल. पळशीच्या ग्रामस्थांची दुष्काळाशी सामना करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी असली, तरी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्काराचा निर्णय योग्य नाही. ग्रामपंचायतीत थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांनी ग्रामस्थांना आश्वासक अशी कामे करावेत, असा सल्ला आमदार बाबर यांनी यावेळी दिला.

रामनगरचे नवनियुक्त सरपंच अभय थोरात, ताडाचीवाडीचे सरपंच सुनिल मंडले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच दिलीप पाटील, सचिन माने, जगन्नाथ शिंदे, विठ्ठल कापसे, रावसाहेब जाधव, किसन पवार, डॉ. राजू माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts: