|Saturday, January 25, 2020
You are here: Home » मनोरंजन » दुर्गाच्या येण्याने सरस्वती मालिकेमध्ये सुरू होणार नवा अध्याय

दुर्गाच्या येण्याने सरस्वती मालिकेमध्ये सुरू होणार नवा अध्याय 

सरस्वतीने देविकाला निव्वळ तिच्या मोठय़ा मालकांसाठी स्वीकारले, मोठय़ा मनाने तिला आपलसं केलं. भैरवकरांच्या वाडय़ामध्ये जागा दिली. राघव आणि देविकाचे लग्न होण्यामागे विद्युलचाच हात होता हे सरस्वतीला कळून सद्धा तिने संयम राखला. विद्युलच्या विरोधात तिने भैरवला काहीच सांगितले नाही. याच दरम्यान भैरवकरांचा वाडा आणि संपत्ती सरस्वतीच्या नावावर आहे हे विद्युलला कळाले. संपत्ती मिळविण्यासाठी रचलेले कारस्थान सरस्वतीने जर राघवला सांगितले तर राघव आपल्याला या वाडय़ामधून काढून टाकेल या भीतीने विद्युलने भुजंगच्या मदतीने सरस्वतीला मारण्याचे षड्यंत्र रचले. दुर्दैवाने हे दोघेही या कारस्थानामध्ये यशस्वी ठरले. विद्युल भुजंगच्या मदतीने सरस्वतीला मारून टाकले. सरस्वती मेल्यावर राघव काय करणार? वाडा आणि संपत्ती विद्युलला मिळणार का? सरस्वतीच्या जाण्याने मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरू होणार हे नक्की. 30 ऑक्टोबरपासून सरस्वती मालिकेमध्ये संध्याकाळी 7 वाजता नवा अध्याय सुरू होणार आहे.

विद्युलने सरस्वतीचा काटा काढून टाकला. पण तिला मारल्यानंतर हे कळाले की, जोपर्यंत सरस्वतीचं प्रेत मिळत नाही तोपर्यंत वाडा दुसऱया कुणाच्याही नावावर होऊ शकत नाही आणि जर हे प्रेत मिळाले नाही तर त्यांना सात वर्ष थांबावे लागेल यामुळे विद्युलसमोर एक नवीन समस्या उभी राहली. दुसरीकडे सरस्वतीच्या अचानक जाण्याने राघवने सगळय़ांमधून मन काढून घेतले आहे. तो अचानक शांत झाला आहे, त्याचा कामामध्ये देखील रस उरलेला नाही. राघवच्या अशा वागण्याने देविका अस्वस्थ आहे. गावाच्या जवळच असलेल्या एका मंदिरामध्ये जाऊन राघवसाठी नवस बोलण्याची इच्छा देविकाने विद्युलला सांगितली. त्यासाठी राघव आणि देविका वाडय़ामधून निघाले देखील. पण तिथे देविकाच्या समोर सरस्वतीसारखीच दिसणारी दुर्गा नावाची मुलगी आली, तिला पाहून सरस्वती राघवच्या आयुष्यात परतणार या भीतीने ती राघवला पुन्हा वाडय़ावर घेऊन गेली.

दुर्गा गावामध्ये तिच्या अक्का सोबत बऱयाच वर्षांपासून राहत असून तिचा आणि सरस्वतीचा काहीच संबंध नाही, तिने पहिल्यांदाच सरस्वती नाव देविकाच्या तोंडून ऐकले. मालिकेमध्ये दुर्गाचा लूक सरस्वतीच्या लूकपेक्षा अगदीच वेगळा आहे. वेगळय़ाप्रकारची साडी, गॉगल, रांगडी भाषा, आंबाडा, असा लुक असून जो सरस्वती पेक्षा अगदीच वेगळा आहे. ही दुर्गा बाईक देखील चालवते तसेच संपूर्ण गाव या दुर्गाला घाबरत, अतिशय बिनधास्त स्वभावाची आहे. देविकाने विद्युलला या दुर्गाबद्दल सांगितल्यानंतर ती भुजंगला दुर्गाला वाडय़ामध्ये घेऊन यायला सांगते. दुर्गा नक्की कोण आहे? दुर्गाच्या येण्याने वाडय़ामध्ये आता नक्की काय घडणार आहे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहे. आता सरस्वती सारख्याच दिसणाऱया दुर्गाच्या येण्याने राघव, देविकाच्या आयुष्यात काय घडेल हे बघणे रंजक असणार आहे.

Related posts: