|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रोहा ते वीर दुपदरीकरण सुरू

रोहा ते वीर दुपदरीकरण सुरू 

पहिल्या टप्प्यात 50 किमीचे काम

दुसऱया टप्प्यासाठी चार हजार कोटी हवेत

प्रतिनिधी / सावंतवाडी:

कोकण रेल्वेच्या 740 किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी 157 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात रोहा ते  वीर या 50 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यासाठी एक हजार कोटी रुपये तर उर्वरित मार्गासाठी चार हजार कोटी रुपये आवश्यक आहेत. तसा चार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला असून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे कोकण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दुपदरीकरणानंतर कोकण रेल्वे मार्गावर 21 नवी स्टेशन उभी राहणार असून कोकण रेल्वे मार्गावरील स्टेशनांची संख्या 87 होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाला सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंत्री असतांना गती दिली. दुपदरीकरणाचे कामही सुरू झाले. मात्र, प्रभू यांचे खाते बदलण्यात आल्याने दुपदरीकरणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल काय, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. परंतु प्रवासी संख्या वाढत असूनही या मार्गावर दुपदरीकरणाअभावी जादा गाडय़ा सोडणे शक्य होत नाही. जादा गाडय़ा सोडल्या तरी विलंबाने धावतात. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे या मार्गाने दुपदरीकरण करण्यात येत आहे. पूर्ण मार्गाचे दुपदरीकरण करायचे झाल्यास 15 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 157 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येणार असून ठराविक ठिकाणी हे दुपदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी पाच हजार कोटी रुपये अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात 50 कि. मी. लांबीच्या मार्गाचे दुपदरीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर आहेत. तर उर्वरित मार्गासाठी 4 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव कधी मंजूर होतो, यावर दुपदरीकरणाच्या कामाचे भवितव्य अवलंबून आहे. साधारणत: सात वर्षात दुपदरीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. निधी वेळेत न मिळाल्यास दुपदरीकरणाचे काम लांबणीवर पडणार आहे.

दोन वर्षात विद्युतीकरण!

कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार आहे. सुमारे 740 कि. मी. लांबीच्या मार्गाचे विद्युतीकरण होणार असून त्यासाठी 1100 कोटी रुपये मंजूर आहेत. विद्युतीकरणाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचा इरादा कोकण रेल्वेचा आहे. विद्युतीकरणामुळे इंधनाची बचत होणार आहे.

फायद्यासाठी मालवाहतूक आवश्यक

कोकण रेल्वेमुळे प्रवासी वाहतूक वाढली आहे. मात्र, प्रवासी वाहतूक वाढूनही कोकण रेल्वे अद्याप फायद्यात नाही. कोकण रेल्वे फायद्यात येण्यासाठी मालवाहतूक मोठय़ा प्रमाणात होण्याची गरज आहे. त्यासाठी कोकण रेल्वे विजयदुर्ग, रेडी बंदराला जोडण्याचा विचार सुरेश प्रभू यांनी मांडला होता. मात्र, प्रभू रेल्वेमंत्री नसल्याने कोकण रेल्वे बंदराला जोडण्याच्या प्रस्तावाचे काय होणार, असा प्रश्न आता कोकणवासीयांना पडला आहे.

कोकण रेल्वेत साधारण साडेसहा हजार कर्मचारी आहेत. त्यातील क व ड वर्गाच्या कर्मचाऱयांना गेली दोन वर्षे दिवाळी बोनस 17,500 रुपये देण्यात आला. मात्र, यंदा हा बोनस निम्म्यावर आला असून कर्मचाऱयांना 7 हजार रुपये देण्यात आला. प्रभू रेल्वेमंत्री नसल्याने बोनस कमी करण्यात आला नसावा ना, अशी शंका कर्मचाऱयांत व्यक्त होत आहे. भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱयांना 23 हजार 500 रुपये बोनस दरवर्षी देण्यात येतो. मात्र, कोकण रेल्वेच्या कर्मचाऱयांना बोनस देताना सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याचे कर्मचाऱयांकडून सांगण्यात आले.

Related posts: