|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेतकरी संघटनेने वड्डीत ऊसतोड रोखली

शेतकरी संघटनेने वड्डीत ऊसतोड रोखली 

प्रतिनिधी/ मिरज

वड्डी येथे एका शेतात सुरू असलेली ऊसतोड शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतात घुसून बंद पाडली. ऊसतोड करणाऱया तोडकऱयांना त्यांनी हाकलून लावले. उसाला योग्य दर जाहीर झाल्याशिवाय तोड करु देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

सध्या बहुतांशी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे ऊस तोडीला वेग आला आहे. गावागावात ऊस तोडणी मजूर दाखल झाले आहेत. ते ऊस तोडणी करीत आहेत. मात्र शेतकरी संघटनेने ऊसाला योग्य दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड करु नये, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कारखान्यांनी प्रथम पहिल्या हप्त्याचा दर जाहीर करावा आणि मगच उसाच्या कांडय़ाला हात घालावा, अशी आक्रमक भूमिका शेतकरी संघटनेने घेतली होती.

रविवारी सकाळी तालुक्यातील वड्डी येथे एका शेतकऱयाच्या शेतात ऊसतोड सुरू होती. त्यासाठी दहा-पंधरा ऊसतोड मजूर आले होते. ही माहिती शेतकरी संघटनेला मिळताच त्यांनी तेथे धाव घेऊन मुकादमाला ऊस तोड न करण्याच्या सुचना देत ही ऊसतोड बंद पाडली. यावेळी संबंधीत शेतकऱयाबरोबर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची वादावादी झाली. मात्र, कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने अखेर शेतकऱयांनी ही ऊसतोड थांबवली.

आजवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणाऱया गाडय़ा, ट्रक्टर रोखल्या होत्या. आतामात्र कार्यकर्ते ऊसतोडच होऊ देत नसल्याने शेतकऱयांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. कारखान्यांनी योग्य दर जाहीर करुन या पेचातून शेतकऱयांची सुटका करावी, अशी मागणी होत आहे.

Related posts: