|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या रथाला अनोखी आरास!

कार्तिकी एकादशीला पांडुरंगाच्या रथाला अनोखी आरास! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱया विठ्ठल-रखुमाई मंदिरातील यंदाचा कार्तिकी एकादशी विशेष असणार आहे. आषाढी एकादशीच्या वारीला आळंदीतील ज्ञानेश्वर माऊंलीचा रथ सजविणारे विष्णू किसन आवटे हे यंदा येथील श्री पांडुरंगाचा रथ सजविणार आहेत. तर आषाढी एकादशीच्या वारीत माऊलींच्या रथासमोर रांगोळी काढत जाणारी, गिनीज बुकात नोंद झालेली रांगोळीकार राजश्री जुन्नर पांडुरंगाच्या रथासमोर रांगोळी साकारत जाणार आहे.

31 ऑक्टोबर रोजी कार्तिकी एकादशीच्या दिवशी पहाटे 2 वाजता महापूजेने कार्तिकी एकादशी उत्सवाला प्रारंभ होणार आहे. 31 रोजीच रात्री 12 वाजता विठ्ठलाचा रथ मंदिरातून बाहेर पडतो. यासंदर्भात विठ्ठल-रखुमाई मित्रमंडळाचे कार्यकर्ते व नगरसेवक राजू तोडणकर यांनी माहिती दिल्याप्रमाणे, मंडळाचे कार्यकर्ते तथा प्रसिद्ध पखवाजवादक राजा केळकर यांच्या आळंदीतील परिचयाने ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाची आरास सजविणारे विष्णू किसन आवटे हे खुद्द यंदा येथील पांडुरंगाच्या रथाला फुलांची सजावट करण्यास येत आहेत. आवटे साकारत असलेली फुलांची आरास वेगळ्या पद्धतीची असते. तसेच त्याची फुलेही वेगळ्या प्रकारची असतात. त्यामुळे हा रथ अधिक आकर्षक व उठून दिसतो.

याचबरोबर गिनीज बुकमध्ये नोंद झालेली रांगोळीकार राजश्री जुन्नरकर यंदा पांडुरंगाच्या रथासमोर रांगोळी साकारत जाणार आहे. राजश्री ही प्रतिवर्षी आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या रथासमोर आषाढी एकादशीला भव्य रांगोळी साकारत असते. तिने 6 तासात 11 कि.मी. रांगोळी टाकण्याचा विक्रम केला आहे. तिचा ह्या विक्रमाची ग्रिनीज बुकात नोंद झाली आहे. रत्नागिरीतही राजश्री विठ्ठल मंदिरपासून गवळीवाडय़ापर्यंत रथासमोर भव्य रांगोळी साकारत जाणार आहे.

रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजले जाणारे विठ्ठल-रखुमाई मंदिर सुमारे 200 वर्षांहून अधिक पुरातन आहे. या दोन्ही कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून पांडुरंगाची सेवा करण्याचे मान्य केल्याने देवस्थानतर्फे विष्णू आवटे, तसेच रांगोळीकार राजश्री जुन्नरकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यंदाच्या या वैशिष्टय़पूर्ण कार्तिकी उत्सवात भाविकांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.