|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » स्वतःच्या घरातच उभारले विठू माऊलीचे मंदिर

स्वतःच्या घरातच उभारले विठू माऊलीचे मंदिर 

महादेव खांडेकर / पणजी

भक्तीभाव तया ठायी

अर्पण केला विठ्ठले रखुमाई ।

आता नाही घरसंसाराची चिंता

अवघे जीवन अर्पिले तया पायी ।।

पुराणकाळात संतांनी आपले जीवन परमेश्वराच्या भक्तीमध्ये घालविले. विठ्ठल रखुमाईच्या भक्तीमध्ये आकंठ बुडालेल्या संतांनी कधी घरसंसाराचा विचारच केला नाही. आता आधुनिक काळात जर कुणी अशा प्रकारे भक्तीच्या डोहात आकंठ बुडाल्याचे सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण हळदोणवाडी-मये येथील पुंडलिक रामा होबळे या विठ्ठल-रखुमाईच्या भक्ताने स्वतःच्या घरावरच विठ्ठल रखुमाईचे मंदिर उभारले आहे.

या मंदिर उभारणीसाठी या भाविकाने नोकरीत स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून मिळालेली संपूर्ण रक्कम मंदिरासाठी खर्च केली आहे. या मंदिरातील सुंदर अशा विठ्ठल-रखुमाई मूर्ती स्थापनेचा पहिला वर्धापनदिन 31 ऑक्टोबर रोजी होत असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते सकाळी महापूजा होणार आहे.

ईश्वरभक्तीत रमलेल्या माणसाला घर-संसार आणि अन्य मोहमयी जगाचे भान राहत नाही. त्याला केवळ ठायी ठायी ईश्वरच दृष्टीस पडतो. पुंडलिक होबळे यांचे हळदोणवाडी-मये येथे मातीचे घर होते. 1982 साली हे घर बांधले होते. पण विठ्ठल-रखुमाईचे निवासस्थान उभारावे यासाठी होबळे यांनी स्वतःचे घर यासाठी अर्पण केले. अथक परिश्रमाने आणि मोठय़ा कष्टाने त्यांनी मंदिर उभारले.

कर्ज थकले, स्वेच्छा निवृत्ती पत्करली

मंदिर उभारण्यासाठी त्यांनी बँकांकडून कर्ज घेतले आणि काम सुरू केले. चौगुले खाण कंपनीत पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱया या व्यक्तिमत्त्वाने कर्ज घेऊन मंदिर उभे केले. कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले. त्यावेळी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. त्यांना स्वेच्छा निवृत्तीपोटी 28 लाख रुपये मिळाले. ही सर्व क्कम त्यांनी बँकेत भरणा केली आणि कर्जमुक्त झाले. मंदिरही साकारले.

स्वतःच्या शिरावर कर्जाचा बोजा घेऊन होबळे यांनी पांडुरंग-रखुमाईसाठी मंदिर उभे केले. स्वेच्छा निवृत्तीवेळी प्रस्ताव दिला असता कंपनी अधिकारिणीने त्यांना स्वेच्छा निवृत्तीमागचे कारण विचारले त्यावर त्यांनी सांगिलेले कारण ऐकून सगळेच थक्क झाले. स्वेच्छा निवृत्तीची रक्कम आपण बँकेत भरणा करणार न पेक्षा आपल्याला बेडय़ा पडतील, असे सांगताच अधिकारिणी उत्तरली ‘तुला बेडय़ा घालायची कोणाची हिंमत आहे. मंदिराच्या उभारणीसाठी केलेल्या या त्यागापोटी तुला बेडय़ा पडणार नाहीत’, असे अधिकारिणीचे उद्गार होते. पुंडलिक होबळे यांना मठाधीपती म्हणून ओळखले जाते. या मंदिर उभारणीसाठी त्यांच्या पत्नीनेही खूप मोठा त्याग केला. स्वतःचे मंगळसूत्रही दिले.

पुंडलिक रामा होबळे यांनी काही वर्षांपूर्वी विठुमाऊलीचा दृष्टांत झाला होता. त्यानुसार आपण हे मंदिर साकारण्याचा प्रयत्न केला. विठुमाऊलीच्या कृपेने ते साकारही झाले, असे होबळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते 31 रोजी सकाळी 8 वाजता महापूजा होणार आहे. प्रतिपंढरपूर क्षेत्र विठ्ठलपूर अशी या मंदिराची ख्याती आहे. हल्लीच मुख्यमंत्री पर्रीकर व मयेचे आमदार प्रवीण झांटय़े यांनी या मंदिराला भेट दिली होती. यावेळी त्यांनीही कौतुक केले. 31 रोजी पहाटे 4 वाजता काकड आरती होणार आहे. त्यानंतर 8 वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते महापूजा होईल. दुपारी 12 वाजता पंथाचे महाप्रवक्ता उल्हास नारायण (बाबा) नार्वेकर तसेच मठाधिपती पुंडलिक रामा होबळे यांची अध्यात्मिक प्रवचने होणार आहेत. नंतर आरती, तीर्थप्रसाद व दुपारी 1.30 ते 2.30 या वेळेत महाप्रसाद होणार आहे. तुळशीविवाह समारंभाने, आरती व तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या सोहळय़ाला लालबाग-मुंबई येथून नरसिंह अवतार व अन्य स्वयंचलित देखावे सादर करण्यात येणार आहेत.

Related posts: