|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पोलिसांना आता मूकमोर्चाचीही धास्ती

पोलिसांना आता मूकमोर्चाचीही धास्ती 

प्रतिनिधी/ निपाणी

1956 पासून कानडी जुलूम सहन करत असतानाही अस्तनीतील निखाऱयाप्रमाणे तीव्र अशी मराठी अस्मिता जपलेल्या मराठी भाषिकांतर्फे 1 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे काळादिन पाळण्यात येणार आहे. त्यानिमित्त निपाणीत नियोजित मूकफेरीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. यासंबंधीची नोटीस शहर पोलीस स्थानकातर्फे निपाणी भाग महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष या नात्याने जयराम मिरजकर यांना देण्यात आली आहे. या दडपशाही प्रवृत्तीचा मराठी भाषिकांतून तीव्र निषेध होत आहे. पोलिसांनी आता मराठी भाषिकांच्या मूकमोर्चाचीही धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.

गेल्या 61 वर्षापासून अखंडितपणे सीमाभागात मराठी भाषिकांतर्फे 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून पाळण्यात येतो. यावर्षीही निपाणीत कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. तत्पूर्वी बसस्थानक ते नेहरु चौकापर्यंत मूकफेरी काढण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी निपाणीभाग म. ए. समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर यांनी केली होती. मात्र लोकशाहीमार्गाने होणाऱया मूकफेरीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारून लोकशाही मार्गावर विषारी फुत्कार सोडण्याचा प्रयत्न केला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

यापूर्वी मराठी भाषिकांनी निपाणीत अनेकवेळा मूकफेरी काढली. यावेळी एकदाही कायदा हातात घेतलेला नाही. असे असताना यावेळी मूकफेरीला परवानगी न देणे म्हणजे दडपशाहीची परिसिमाच म्हणावी लागेल अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी काळादिन केवळ 10 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच यावेळी कोणत्याही मूकफेरीस परवानगी नसून याचे उल्लंघन झाल्यास कोणत्याहीक्षणी मूकफेरीत सहभागी झालेल्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. यामुळे या दडपशाहीचा निषेध व्यक्त होत आहे.

शांततेत बंद यशस्वी करणार

दरम्यान, प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या निवासस्थानी रविवारी काळादिन पूर्वबैठक पार पडली. यावेळी 1 नोव्हेंबर रोजी काळादिन कडकडीत पाळण्यात येणार असून यादिवशी शहर व उपनगरातील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन मराठी भाषिकांतर्फे करण्यात आले. 1 नोव्हेंबर यादिवशी दुपारी 4 वाजता पन्हाळा-शाहूवाडीचे शिवसेना आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर हेदेखील काळादिनप्रसंगी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय कोल्हापूर जिल्हा व निपाणी परिसरातील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी मराठी भाषिक आजी-माजी लोकप्रतिनिधी व समस्त मराठी जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अस्मितेचा प्रश्न

कन्नडिगांना घोषणा, मिरवणुकीसाठी परवानगी मिळते तर मराठी भाषिकांवर ही दडपशाही का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. सीमाप्रश्नावरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींकडून सुरू असला तरी हा कोणत्याही जाती किंवा धर्माचा प्रश्न नसून अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे यावेळी सर्वपक्षीय मराठी भाषिक नेते व कार्यकत्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीस प्रा. डॉ. अच्युत माने, जयराम मिरजकर, हरिष तारळे, एम. पी. कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, दिलावर गडकरी, रमेश निकम, किरण पावले, शिवसेना शहरप्रमुख विशाल हत्तरगी, नवनाथ चव्हाण, सुभाष खाडे, सुभाष जोंधळे, बाबासाहेब मगदूम, दीपक वळीवडे, सुहास सूर्यवंशी, राजू बगाडे, प्रताप पाटील, मारुती हेरेकर, शैलेश शिंदे, प्रशांत नाईक, दिपक सावंत यांच्यासह मराठी भाषिक कार्यकर्ते उपस्थित होते.