|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » रडार

रडार 

रडार हा शब्द आता सर्व परिचीत आहे. पावसाळय़ात आपण हवामान खात्याच्या रडार यंत्रणेबद्दलची चर्चा ऐकतो. एरवी विमानांच्या संदर्भात रडार यंत्रणांचा उल्लेख ऐकतो. या रडारांमध्ये  वेगवेगळे अनेक प्रकार असतात. याची  आपल्याला कल्पना असतेच असं मात्र नाही. रडार हा शब्द प्रत्यक्षात ‘रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग’ या शब्दाचं लघुरूप आहे. त्याचबरोबर पाण्यात सोनार यंत्रणा वापरली जाते. त्या यंत्रणेत आणि रडार यंत्रणेत मूलभूत फरक आहे. हा फरक म्हणजे रडारमध्ये रेडिओ लहरी वापरल्या जातात. तर सोनारमध्ये ध्वनिलहरी. असं असलं तरी त्या वापरताना तत्त्व वापरले जाते. ते म्हणजे प्रतिध्वनी, अर्थात प्रतिध्वनी हा शब्द सोनार यंत्रणेत वापरणं योग्य ठरेल. कारण त्या यंत्रणेत ध्वनीलहरी वापरल्या जातात. सोनार म्हणजे  ‘साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग.’ रेजिंग म्हणजे लक्ष्याचे अंतर माहीत करून घेणे. दुसऱया महायुद्धात जर्मन विमानांचे ताफे आणि जहाजांचे काफिले जर त्यांनी काही नुकसान करायच्या आतच लक्षात आले तर त्यांना तोंड देण्यासाठी काही पूर्वतयारी करता येईल, म्हणून ब्रिटिश शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून रडार जन्माला आले असं जरी म्हटलं गेलं तरी क्रिस्तिआन हुल्समेअर  नावाच्या तंत्रज्ञान जर्मनीत 18 मे 1904 रोजी बेक यंत्रणा कस्तोन येथे लोकांसमोर सादर केली. त्यानं त्याच्या या यंत्रणेला ‘टेली मोबिलोस्कोप’ असं नाव दिलं होतं. या दूरच्या हालचाली टिपणाऱया यंत्राच्या साहाय्यानं अगदी दाट धुक्यातसुद्धा 3 कि. मी. दूरच्या जहाजांच्या आणि इतर अडथळय़ांच्या अस्तित्वाची कल्पना येऊ शकत होती. हे यंत्र जहाजांवर बसवले तर जहाजांच्या धुक्यात होणाऱया टक्करी टाळता येतील, असा त्याचा दावा होता.

त्यानं ज्यांच्यासमोर या यंत्रणेचं सादरीकरणं केलं ते सर्व जहाज कंपन्यांशी संबंधित धनिक गृहस्थ होते. त्यांना या यंत्रणेचं महत्त्वच लक्षात आलं नाही. ‘ही योजना फार खर्चिक आहे, त्यापेक्षा सध्या धुक्यात जहाजं वापरतात ते भोंगे (फॉग हॉर्न) जास्त उपयुक्त आहेत आणि त्यांचा खर्चही कमी आहे,’ असं हुल्समेयरला सांगण्यात आलं आणि त्याची बोळवण करण्यात आली.  इ. स. 1886 मध्ये  टैनिश रूडॉल्फ हर्टझ या पदार्थ वैज्ञानिकानं विद्युत चुंबकीय लहरी अडथळय़ावर आदळून परावर्तित होत असतात, हे सिद्ध केलं होतं. हुल्समेयरचा जन्म 1881 चा म्हणजे तो पाच वर्षांचा असताना टर्टझचं हे संशोधन प्रसिद्ध झालं होतं. या संशोधनाचा वापर करून हुल्समेयरनं त्याचं ‘टेली मोबिलोस्कोप’ हे यंत्र तयार केलं होतं. हे यंत्र खोलगट थाळय़ांच्या आकाशकातून विद्युत चुंबकीय लहरींचे स्पंद प्रक्षेपित करीत असे. या खोलगट थाळय़ांना शास्त्राrय परिभाषेत ‘अन्वस्ती आकाशक’ म्हणतात. यातून अवकाशात प्रक्षेपित झालेल्या लहरी जेव्हा एखाद्या अडथळय़ाला आपटतात तेव्हा त्या परावर्तित होऊन परत येत. ज्या पृष्ठभागावर आपटून त्या परावर्तित होत त्या पृष्ठभागाच्या संरचनेवर आणि तो पृष्ठभाग ज्या पदार्थांचा असेल त्यावर अवलंबून या परावर्तित लहरींचे स्वरूप क्षीण किंवा बळकट असे. या लहरींचे मग ध्वनीत रूपांतर होत असे. प्रक्षेपण आणि परावर्तित लहरींचे पुनरागमन यांच्यातल्या वेळातल्या फरकावरून त्या अडथळय़ांचे ‘टेली मोबाईल स्कोप’ पासूनचे अंतर सांगता येत असे. अशा तऱहेची प्रक्षेपणं आणि परावर्तन लागोपाठ सतत बघितली की निरीक्षकाला समोरचा अडथळा किती वेगानं, कुठल्या दिशेनं हलतोय, हे सांगणं शक्य होत असे. अडथळा दिसो किंवा न दिसो, त्याची कल्पना निरीक्षकाला येत असे. दुर्दैवानं हल्समेयरला प्रायोजक मिळाला नाही. त्यामुळं त्याचं संशोधनं मागे पडलं.पहिल्या महायुद्धानंतर हळूहळू या यंत्राचं महत्त्व रेडिओ अभियंत्यांच्या लक्षात येऊ लागलं. 1930 नंतर काही काळातच रॉबर्ट वॉटसन वॅट यांनी या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांनी परावर्ती लहरी ग्राहकांना एक कॅथोड रे टय़ुब (ऋणभागीत किरण नळी) जोडली. यामुळं ही यंत्रणा वापरणारा निरीक्षक समोरच्या अडथळय़ाचे स्वरूप, त्याचे निरीक्षकापासूनचे अंतर आणि अडथळय़ाचे स्थळ हे समोरच्या पटलावर दृश्य स्वरूपात पाहू शकत होता. या नव्या यंत्रणेचं वॉटसन, वॅट यांनी ‘रडार’ असं नामकरणं केलं.

रडार हे विमानं, जहाजं, काही लष्करी वाहनं आणि अवकाश स्थानकावरही वापरलं जाणारं आजकालचं एक महत्त्वाचं साधन आहेच. पण ते क्षेपणास्त्रं आणि  क्षेपणास्त्ररोधक क्षेपणास्त्राचं दिशादेशन करणारं लष्करी उपयोगाचं साधनही आहे. याशिवाय रडारच्या साहाय्यानं भूमी आलेखाचं कामही केलं जातं. रडारचे उपयोग खरोखरच अनंत होत चालले आहेत. लष्करी आणि नागरी उपयुक्ततेच्या बाबतीत रडार हे साधन आजकाल अद्वितीय मानलं जातं. पल्स रडार म्हणजे रेडिओलहरींचे स्पंद किंवा पुंजके एखाद्या वस्तुच्या दिशेनं सोडून तिच्या स्थानाच्या आणि इतर बाबींचा अचूक ठावठिकाणा लावणारे रडार ही रडारद्वारे शोध घेण्याची पारंपरिक पद्धत आहे. ही पद्धत ‘परावर्तन’ तत्त्वावर आधारित आहे, हे आपण बघितलेच. त्यात रेडिओ लहरींचे पुंज ठरावीक कालांतराने ज्या वस्तूचा अंदाज घ्यायचा त्या दिशेने प्रक्षेपित करण्यात येतात आणि समोरच्या अडथळय़ावर आपटून परतणाऱया प्रतिप्रक्षेपित लहरींद्वारे समोरच्या अडथळय़ाबाबत माहिती देतात. रेडिओ लहरींची गती बदलत नसल्यामुळे पुढचे गणित सोपे होते. ज्या गतीने  रेडिओ लहरींचे पुंज प्रक्षेपित केले जातात. त्या गतीला पुंज पुनरावृत्तीची वारंवारता पल्स रिपीटशन फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं. ज्यांचा पल्ला दूरचा असतो. अशा पुंज रडारांमध्ये पुंज प्रक्षेपणाची वारंवारता दीर्घ असते. म्हणजे दोन प्रक्षेपणातील अंतर जास्त वेळाचे असते. तर कमी पल्ल्याच्या पुंज रडारांमध्ये ही पुंजप्रक्षेपण वारंवारता अल्पकालावधीची असते. एकाच दिशेला असलेल्या वेगवेगळय़ा लक्ष्यांचा वेगळेपणा शोधून काढणाऱया पुंज रडारांची ही क्षमता रडारांच्या स्पंदन लांबीवर अवलंबून असते. जर स्पंदांची लांबी एका लक्ष्याकडून दुसऱया लक्षापर्यंत पोहोचायला लागणाऱया वेळेपेक्षा जास्त असेल तर अशा स्पंदांचा वेगवेगळी लक्ष्ये ओळखताना गोंधळ उडतो. त्यामुळेच स्पंदांमधील मध्यंतर हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे दोन प्रक्षेपांच्या मधला काळ जितका कमी असेल तितकी पुंज रडारांची उपयुक्तता वाढते. दोन प्रक्षेपांच्या मधला काळ कमी झाला तर प्रत्येक पुंजामधील ऊर्जाही कमी होते. यावर एक उपाय म्हणजे वेगवेगळय़ा पुंज प्रक्षेपांची क्षमता असलेले रडार बनविणे. अति दूरवरच्या लक्षाचा वेध घ्यायचा असेल तर पुंजातील लहरींची तरंग लांबी वाढवायची आणि दोन प्रक्षेपांमधील काळही वाढवायचा त्याचबरोबर कमी तरंग लांबीचे पुंज प्रक्षेपित करायचे. मात्र त्यांच्या प्रक्षेपातील काळ कमी ठेवायचा.

रडारचे इतरही प्रकार आहेतच. पण लिहिता लिहिता एक मजेशीर गोष्ट आठवली. आता रडारला इंग्रजी भाषेत एक वेगळं स्थान मिळालं आहे. अमूक तमूक व्यक्ती ही पोलिसांच्या रडारवर आहे. ही कंपनी आयकर विभागाच्या रडारवर आहे वगैरे. म्हणजे आता रडार हा शब्द केवळ इंग्रजी भाषेतच नव्हे तर अगदी मराठीतही रूढ झाला असून, तो लक्ष्य असणे किंवा ज्यावर लक्ष आहे तो किंवा ती या अर्थाने सर्रास वापरला जातो.

Related posts: