|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » उत्तरप्रदेशच्या मदरशांसाठी नवा अभ्यासक्रम

उत्तरप्रदेशच्या मदरशांसाठी नवा अभ्यासक्रम 

योगी आदित्यनाथ सरकारचे पाऊल : मुस्लीम नेत्यांनी बदलाला केला विरोध

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार मदरशांसाठी नवा अभ्यासक्रम  लागू करणार आहे. या नव्या अभ्यासक्रमात मदरसा शिक्षणात एनसीईआरटीच्या पुस्तकांचा समावेश होईल. राज्याचे मदरसा मंडळ एनसीईआरटी आणि सीबीएसईशी चर्चा करून मदरशांमध्ये शिकविण्यायोग्य पुस्तकांची निवड करण्यासाठी कार्यरत आहे.

अभ्यासक्रमाबद्दल दुसऱया राज्यांमध्ये सुरू असलेल्या मदरशांच्या अभ्यासक्रमाचे अध्ययन सरकार करत आहे. याकरता सचिव आणि निबंधक स्तरावर आतापर्यंत तीन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. अभ्यासक्रमात होणाऱया बदलांबाबत राज्यात चर्चा सुरू आहे. पुरोगामी मुस्लीम कार्यकर्त्यांनी या धोरणाचे स्वागत केले. तसेच काही संघटनांनी या बदलाला अनुकुलता दर्शविली आहे.

पुढाकाराला विरोधास प्रारंभ

शिया मुस्लीम धर्मगुरु मौलाना सैफ अब्बास यांनी मात्र या पुढाकाराला विरोध केला. एनसीईआरटीच्या पुस्तकांचे शिक्षण दिल्ली मंडळ आणि उत्तरप्रदेशात पूर्ण होत नसल्याचे चित्र असताना ते मदरशांवर थोपविले जात आहे. सरकार मदरशांनाच लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मदरशांमध्ये दिनचे शिक्षण दिले जाते आणि तेथील शिक्षक नव्या अभ्यासक्रमासाठी सज्ज नाहीत. मदरशांमध्ये पुरेशा मुलभूत सुविधा नाहीत असा दावा मदरशाचे प्राचार्य मौलाना फरीदुल हसन यांनी केला. नव्या अभ्यासक्रमाबाबत मदरशा संचालकांशी चर्चा केली जावी. तसेच यासाठी तज्ञांची समिती नेमून तिच्या अहवालानंतर निर्णय घेतला जावा असे त्यांनी सुचविले. तर सुन्नी धर्मगुरु फिरंगी यांनी मदरशांच्या शिक्षणाला हात न लावण्याचा इशारा योगी सरकारला दिला आहे.

महत्त्वाचे संभाव्य बदल

?   इयत्ता 1 ते 5 पर्यंत दिनियातसमवेत इंग्रजी, हिंदू, उर्दू, गणित आणि
सामाजिक विज्ञानाचे शिक्षण मदरशाच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार

?   6 वी ते 8 वीपर्यंत दीनियात समवेत इंग्रजी, हिंदी, उर्दू, गणित आणि सामाजिक विज्ञानासह प्राथमिक अरबी, फारसीचे ज्ञान देखील मिळणार

?   9-10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वरील सर्व विषयांसह गृहविज्ञानाचा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे.

?   11 आणि 12 वीत इंग्रजी, उर्दू आणि दीनियात अनिवार्य, विज्ञान किंवा कला ऐच्छिक विषय असतील.

? विज्ञानात भौतिक, रसायनशास्त्र आणि गणित अनिवार्य, तर कला शाखेत भूगोल, इतिहास, राजशास्त्र हे विषय अनिवार्य.

Related posts: