|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वायफळ खर्च म्हणजे भ्रष्टाचारच

वायफळ खर्च म्हणजे भ्रष्टाचारच 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी/ पणजी

अतिरिक्त किंवा वायफळ खर्च म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारच असल्याचा दावा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला असून हा खर्च-भ्रष्टाचार टाळण्यासाठी दक्षता खात्याचे अधिकारी, कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारी निधीचा योग्य वापर करावा, असे आवाहनही त्यांनी अधिकाऱयांना केले आहे.

पर्वरी येथील सचिवालयात दक्षता सप्ताहाचे उद्घाटन झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

भ्रष्टाचारास निष्काळजीपणा कारणीभूत

ते पुढे म्हणाले की, दक्षता खात्याकडे येणाऱया सर्वच तक्रारीत भ्रष्टाचार असतोच असे नाही. काहीवेळा निष्काळजीपणा त्यासाठी कारणीभूत ठरतो. अनेकदा मोठे प्रकल्प उभारले जातात, परंतु नंतर त्यांची देखरेख नीट होत नाही. त्यामुळे पैसा फुकट जातो. हे सर्व निष्काळजीपणा किंवा बेफिकीरपणामुळे घडते. त्यासाठी योग्य ते नियोजन आवश्यक असून ते केल्याशिवय पुढे गेल्यास असा खर्च वाया जातो, असे पर्रीकर म्हणाले.

दक्षता खात्याच्या कार्याला दिली गती

दक्षता खात्यामार्फत सरकारने  हाती घेतलेल्या कार्याचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. दक्षता खाते अधिक मजबूत करण्यासाठी आणि खात्यातील प्रलंबित असलेली प्रकरणे सोडविण्यासाठी महत्वाची पावले टाकण्यात येत आहेत. खात्याने  क आणि ड वर्गातील 160 प्रकरणे यशस्वीपणे सोडविली आहेत. आतापर्यंत खात्याने आपल्या कार्याची गती वाढविली असून 200 फाईल्स हाताळल्या आहेत, असे ते म्हणाले.

सरकारी निधीचा योग्य वापर करावा

निधीचा गैरवापर आणि महिला व मुलांवरील अत्त्याचाराच्या प्रकरणांवर खास लक्ष दिले जात आहे. चालू वर्षात प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी किमान 50 टक्के प्रकरणे सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारी अधिकाऱयांनी सरकारी निधीचा योग्य वापर करावा. निधीचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घ्यावी. वायफळ खर्च होणार नाही, याकडे कटाक्षाने पाहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

संरक्षणमंत्रीपदी असताना 4800 कोटी वाचविले

बचत कशी होऊ शकते, यावर बोलताना आपण संरक्षणमंत्री असताना सुमारे रु. 4800 कोटी रुपये वाचवले, असा दावा त्यांनी करून दक्षता खात्यात काम करताना सर्वांनी दक्ष रहावे, निधीच्या वापराबाबत अजिबात निष्काळजीपणा करू नये, असेही पर्रीकर यांनी सुचवले.

 

याप्रसंगी मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा (आयएएस), खास सचिव गोविंद जयस्वाल (आयएएस), भ्रष्टाचार विरोधी शाखेचे एसपी बॉस्को जॉर्ज आणि दक्षता खात्याचे संचालक संजीव गावस देसाई उपस्थित होते. 3 नोव्हेंबर रोजी या सप्ताहाचा समारोप होणार असून ‘भ्रष्टाचारमुक्त भारत-माझे स्वप्न’ अशी या सप्ताहाची संकल्पना आहे.

मुख्य सचिवांनी विविध खात्यांतील अधिकाऱयांना एकात्मतेची शपथ देऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला. पारंपरिक दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालक संजीव गावस देसाई यांनी स्वागतपर भाषण केले. डीवायएसपी एसबी सुचेता देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर शशिकांत कामत यांनी आभार मानले.

Related posts: