|Sunday, January 26, 2020
You are here: Home » क्रिडा » मुंबई-ओडिशा रणजी लढत आजपासून

मुंबई-ओडिशा रणजी लढत आजपासून 

अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकुरचा संघात समावेश, पहिल्या विजयासाठी मुंबई प्रयत्नशील

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

मुंबई-ओडिशा रणजी लढतीला आजपासून येथील केआयआयटी स्टेडियमवर प्रारंभ होत आहे. पहिले दोन सामने अनिर्णीत झाल्यानंतर ओडिशाविरुद्ध लढतीत मुंबई विजयासाठी प्रयत्नशील असेल. स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे व वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर या सामन्यात खेळणार असल्याने मुंबईची बाजू भक्कम मानली जात आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत रहाणे व शार्दुलची भारतीय संघात निवड न झाल्याने या दोन्ही खेळाडूंचा मुंबई रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. मुंबईचे आतापर्यंत दोन सामने झाले असून दोन्ही सामने अनिर्णीत संपले होते. सध्या, दोन सामन्यात मुंबईच्या खात्यावर 4 गुणांची नोंद आहे. रहाणे व शार्दुलचे संघात पुनरागमन झाल्याने मुंबईची बाजू भक्कम मानली जात आहे. अपेक्षेप्रमाणे, पृथ्वी शॉ, अखिल हेरवाडकर, अजिंक्य रहाणे, कर्णधार तरे, सुर्यकुमार यादव व सिध्देश लाड यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. गोलंदाजीची कमान धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, शार्दुल ठाकुर यांच्यावर असेल. घरच्या मैदानावर खेळणाऱया ओडिशा संघाला कमी लेखणार नसल्याची प्रतिक्रिया मुंबईचा कर्णधार आदित्य तरेने यावेळी दिली.

दुसरीकडे ओडिशाच्या खात्यावरही 2 गुण आहेत. मुंबईप्रमाणे ओडिशाचे साखळी फेरीतील दोन्ही सामने अनिर्णीत राहिले आहेत. गोविंद पोद्दारच्या नेतृत्वाखालील ओडिशा संघ घरच्या मैदानावर मुंबईविरुद्ध लढती चांगल्या कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल. रणजी चषक स्पर्धेत आतापर्यंत ओडिशाचे मुंबईविरुद्ध रेकॉर्ड काही चांगले राहिलेले नाही. आजपासून सुरु होणाऱया साखळी फेरीतील तिसऱया लढतीत दोन्ही संघ विजयाच्या निर्धारानेच मैदानात उतरतील.

मुंबई संघ – आदित्य तरे (कर्णधार), पृथ्वी शॉ, अखिल हेरवाडकर, सुर्यकुमार यादव, सिध्देश लाड, जय बिस्ता, अजिंक्य रहाणे, विजय गोहिल, धवल कुलकर्णी, आकाश पारकर, रोस्टन डायस, शार्दुल ठाकुर, तुषार देशपांडे, आदित्य देशपांडे व सुफियान शेख.

ओडिशा संघ – गोविंद पोद्दार (कर्णधार), सौरभ रावत, संदीप पटनायक, नटराज बेहरा, शुभाश्रु सेनापती, बिपलाभ समंत्रय, अभिनाश शाह, शुभम नायक, बसंत मोहंती, सुर्यकांत प्रधान, धीरज सिंग, आलोक मंगराज, दीपक बेहरा, रणजीत सिंग व आलोक चंद्र साहू.

 

Related posts: