|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जठारांनी वाईटाचीही जबाबदारी घ्यावी

जठारांनी वाईटाचीही जबाबदारी घ्यावी 

पालकमंत्री केसरकर यांचा टोला : खड्डय़ांची जबाबदारी का झटकता?

प्रतिनिधी / सावंतवाडी:

मी काही विकासकामे करत नाही, असा आरोप करता. मग विकासकामे सुरू झाल्यावर त्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येऊ नका. मी विकासनिधी किती आणला, याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना नाही. त्यांनी अगोदर कामांची माहिती करून घ्यावी. रस्त्यांवर खड्डे पडले तर त्या खड्डय़ांची जबाबदारी तुम्हा घेत नाही. मग चांगल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी पुढे येऊ नका, असा इशारा गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जठार यांच्या टीकेवर दिला आहे.

मी आणलेल्या विकासनिधीतून लवकरच कामे सुरू होणार आहेत त्यांच्या निविदा निघाल्या आहेत. त्यामुळे आमच्या मंत्र्यांच्या माध्यमातून निधी आणल्याच्या बाता मारू नका, असेही ते म्हणाले.

केसरकर यांनी शनिवारी नगरपालिकेच्या विविध कामांची पाहणी केली. तसेच जिमखाना मैदानावरील स्पर्धा परीक्षा केंद्राला भेट देत तेथे काही नवीन उपाययोजना सूचविल्या. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यापूर्वी मी विकासकामे आणली. त्यांची उद्घाटने दुसऱयांनीच केली. मी प्रसिद्धी व मार्केटिंगमध्ये कमी पडत आहे. त्यामुळे जनतेला अपेक्षित असे काम करणे हे माझे उद्दिष्ट आहे. सोनवडे घाटरस्ता, पारगड घाटरस्ता, शिरशिंगे शिवापूर सहय़ाद्री मार्ग, कुंभवडे तळकट मार्ग अशी कामे सुरू होणार आहेत. त्यावेळी ही कामे केसरकरांनीच आणली असे जठार सांगणार का? हायवेवर खड्डे पडले. बांधकाम खाते तुमच्याकडे आहे. मग त्याची जबाबदारी झटकता का? ती जबाबदारीही स्वीकारा. उगाच टीका करू नका. मी आरोग्यप्रश्नी व विकासकामांबाबत अधिकाऱयांसोबत बैठका घेत आहे. विकासकामे करतांना जर चुकलो असेन आणि जठारांबाबत कमी पडलो असेन तर मी निश्चितच विचारमंथन करेन.

केसरकर पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित आहे त्यासाठीच मी बोलत आहे. माझा लढा प्रवृत्तीविरोधात होता. ही प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढत असेल तर मला कोकणच्या जनतेला जागृत करणे महत्वाचे वाटते. त्यासाठीच मी ईश्वरी संकेताबाबत भाष्य केले. मुख्यमंत्र्यांची प्रतिमा अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे खराब होऊ नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

  स्पर्धा परीक्षा केंद्र दीड महिन्यात

केसरकर म्हणाले, युपीएससी, एमपीएससी परीक्षा केंद्र हे येत्या दीड महिन्यात सुरू केले जाईल. हे जिल्हा केंद्र असून प्रत्येक तालुक्याच्या शाळांना हे केंद्र जोडले जाणार आहेत. यावर आतापर्यंत 35 लाख रुपये खर्च झाला असून नव्याने 110 मुलांना बसण्यासाठी हॉल व अन्य सुविधांसाठी निविदा काढण्याच्या सूचना मुख्याधिकाऱयांना केल्या आहेत. बीएसएनलच्या माध्यमातून हे केंद्र चालविले जाणार आहे.

चार गावे दत्तक

चौकुळ, कुंभवडे, आंबोली, गेळे ही गावे ‘आमदार गावे’ म्हणून विकसित केली जाणार असून ही गावे मी दत्तक घेतली आहेत. या गावातील 500 लोकांना कामे दिली जाणार आहेत. या गावांचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे केसरकर म्हणाले. यासंदर्भात जिल्हाधिकारी व सर्व अधिकाऱयांसमवेत शुक्रवारी बैठक घेऊन आराखडा तयार केला आहे.

यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, सतीश कदम, बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, तानाजी वाडकर, रणजीत सावंत, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, अनारोजीन लोबो, भारती मोरे, दीपाली सावंत, तानाजी पालव आदी उपस्थित होते.

Related posts: