|Saturday, October 19, 2019
You are here: Home » क्रिडा » दिविज शरण दुहेरी मानांकनात अव्वल पन्नासमध्ये

दिविज शरण दुहेरी मानांकनात अव्वल पन्नासमध्ये 

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

भारताचा दुहेरीतील टेनिसपटू दिविज शरणच्या या मोसमात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीला बक्षीस मिळाले असून एटीपी दुहेरीच्या मानांकनात त्याला टॉप 50 मध्ये स्थान मिळाले आहे. मार्च 2014 नंतर प्रथमच त्याने पहिल्या पन्नासमध्ये झेप घेतली आहे. मात्र सानिया मिर्झाचे मानांकन घसरले असून ती टॉप टेनमधून बाहेर पडली आहे.

सोमवारी एटीपीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत, दिविज शरणने एका स्थानाची प्रगती करीत 50 वे स्थान मिळविले आहे. त्याने भाग घेतलेल्या गेल्या तीन स्पर्धांत त्याने अंतिम फेरी गाठली. त्यापैकी एटीपी 250 युरोपियन स्पर्धेचे जेतेपद त्याने पटकावलेड तर ब्रेस्ट व ताश्कंद येथील स्पर्धेत त्याने वेगवेगळय़ा सहकाऱयांसह उपविजेतेपद मिळविले. दिल्लीच्या या 31 वषीय टेनिसपटूने त्याचा दीर्घकाळचा जोडीदार पुरव राजाशी फारकत घेतल्याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. एकच जोडीदार नसूनही त्याने सातत्यपूर्ण खेळ करीत चांगले प्रदर्शन घडविले. ‘2003 मध्ये मी पहिला एटीपी गुण मिळविला. त्यानंतरचा हा दीर्घ प्रवास बराच रोमांचक ठरला आहे. यासाठी कठोर परिश्रम करावे लागले, काही गोष्टींना सोडावे लागले, प्रवास, अनेक निर्णय, चढउतार या गोष्टी घडल्या. पण मला जे अत्यंत आवडते ते करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. टेनिस हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे,’ असे शरण वृत्तसंस्थेशी स्लोव्हाकियातील ब्राटिस्लावा येथून बोलताना सांगितले.

भारताकडे सध्या टॉप 50 मधील दुहेरीचे दोन खेळाडू असून 15 व्या स्थानावर असणार रोहन बोपण्णा त्यात सर्वांत आघाडीवर आहे. पुरव राजा (62), लियांडर पेस (70), एन. जीवन (97) हे शंभरच्या आत स्थान मिळविणारे भारताचे अन्य खेळाडू आहेत. शरणनने 19 आयटीएफ फ्युचर्स स्पर्धा, 13 चॅलेंजर ट्रॉफी आणि तीन एटीपी टूरवरील स्पर्धा जिंकल्या असून ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याबाबत त्याने आशावाद क्यक्त केला. ‘ज्यांच्याविरुद्ध मी थोडक्मयात सामने गमवित आहे तेच खेळाडू ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकताना दिसत आहेत. त्यांना मी अनेकदा हरविले देखील आहे. त्यामुळे मीसुद्धा ग्रँडस्लॅम जिंकू शकतो, हा विश्वास मला वाटत आहे,’ असे तो म्हणाला. टॉप 30 मध्ये स्थान मिळविण्याचे पुढील उद्दिष्ट असून ते साध्य झाल्यास एटीपी 1000 व मास्टर्स मालिकेतील स्पर्धांत खेळण्याची संधी मिळेल, असे त्याला वाटते. दुहेरीच्या मानांकनात विष्णू वर्धननेही 16 स्थानांची प्रगती केली असून तो आता 118 व्या क्रमांकावर आहे. कारकिर्दीतील आजवरचे त्याचे हे सर्वोच्च मानांकन आहे. वर्धन व त्याचा साथीदार एन. श्रीराम बालाजी (139) यांनी शनिवारी शेनझेन चॅलेंजर स्पर्धेचे जेतेपद मिळवून 90 मानांकन गुणांची कमाई केली होती.

एकेरीच्या क्रमवारीत युकी भांब्री भारतातर्फे आघाडीवर असून तो 140 व्या क्रमांकावर आहे. रामकुमार रामनाथन 148, प्रज्ञेश गुणेश्वरण 255, सुमित नागल 331 व बालाजी 350 व्या क्रमांकावर आहेत.

महिलांमध्ये अंकिता रैना भारतातर्फे आघाडीवर असून ती 281 व्या स्थानावर आहे. करमन कौर थांडी (307), प्रांजला यडलापल्ली (483) या तिच्यापेक्षा बऱयाच मागे आहेत. दुहेरीत सानियाची तीन स्थानांनी घसरण झाल्याने टॉप टेनमधून बाहेर पडली असून ती आता 12 व्या क्रमांकावर आहे.