|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सांगे मिरेकल्स विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार

सांगे मिरेकल्स विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार 

प्रतिनिधी/ मडगाव

दिवाळीच्या सुट्टी संपून काल सोमवार पासून शाळांना पुन्हा प्रारंभ झाला खरा, पण सांगे येथील मिरेकल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी वर्गावर बहिष्कार घातला. हायस्कूलचे मुख्याध्यापक फा. ऍथनी मेल्विन फर्नाडिस यांची बदली केली जात असल्याने विद्यार्थ्यांनी हा बहिष्कार घातला. विद्यार्थी वर्गा बाहेर आल्याने काल बराच तणाव निर्माण झाला. काल सायंकाळी नव्या मुख्याध्यापकांनी ताबा घेतल्याने आज पुन्हा तणाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिरेकल्स हायस्कूलमध्ये गेल्या सहा महिन्यामागे फा. ऍथनी फर्नांडिस यांनी मुख्याध्यापक म्हणून ताबा घेतला होता. या सहा महिन्यात त्यांनी हायस्कूलचा कायापालट करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. विद्यार्थी तसेच शिक्षक व पालकांकडे आपुलकीचे नाते जोडले होते. मात्र, दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आल्याने विद्यार्थी प्रचंड संतप्त झाले होते.

काल पहिल्याच दिवशी वर्गावर बहिष्कार घालणाऱया विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाची बदली करू नये, फा. ऍथनी फर्नांडिस यांनाच कायम ठेवावे अशी मागणी करणारे फलक हातात घेऊन आंदोलन केले. काल अचानक हा प्रकार घडल्याने मिरेकल्स हायस्कूलच्या परिसरात बराच तणाव निर्माण झाला. दुपार पर्यंत परिस्थिती अशीच होती.

हायस्कूलचे पूर्वीचे मुख्याध्यापक फादर पिवो फुर्तादो यांच्या जागी फा. ऍथनी फर्नांडिस यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा पासून हायस्कूलचा कारभार अंत्यत सुरळीतरित्या चालत होता. पण, काल अचानक मुख्याध्यापकाची बदली केल्याची माहिती पुढे आल्याने विद्यार्थी संतप्त झाले व त्यांनी फादर ऍथनीच्या समर्थनात मोठ मोठय़ाने घोषणा दिल्या. यावेळी शिक्षक वर्गही विद्यार्थ्यांबरोबर राहिला. हळू हळू ही वार्ता पालकांपर्यंत पोहचली व या ठिकाणी शेकडो पालक देखील जमा झाले.

आक्रमक पवित्रा…

सर्व विद्यार्थी हातात फलक घेऊन घोषणा देत होते, यावेळी फादर ऍथनी हे दुपारी अकरा वाजता आपला ताबा सोडणार होते व नवीन येणारे मुख्याध्यापक ताबा घेणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला व फादर ऍथनी यांना त्यांच्या कॅबिनमधून बाहेर पडायला द्यायचे नाही व नवीन येणाऱया मुख्याध्यापकांना स्कूलच्या गेटच्या आत घ्यायचे नाही. पण शेवटी नवीन येणारे मुख्याध्यापक आलेच नाही. मात्र, उशिरा मिळालेल्या माहिती प्रमाणे त्यांनी संध्याकाळी मुख्याध्यापक पदाचा ताबा घेतला होता.

या घटनेची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन तथा नगरसेवक कॅरोज प्रुझ व इतर सदस्यांनी स्कूलमध्ये धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे जमलेल्या पालकांशी संपर्क साधला असता जमीर खान म्हणाले की, या मुख्याध्यापकाची जर बदली करण्यात आली तर आपण उद्याच आपल्या मुलांना स्कूलमधून काढू.

मिलाग्रीस मास्कारेन्हास यांनी सांगितले की, हाच मुख्याध्यापक ठेवावा, त्यांनी स्कूलात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. प्रफुल्ल सतरकर हिने सांगितले की, गेल्या सहा महिन्यात या फादरने प्रत्येकाला आपुलकी दाखवली आहे. त्याचा परिणाम ही स्कूलमध्ये दिसून येत आहे. मोनिका डिकॉस्ता हिने सांगितले की, अचानक सहा महिन्यातच बदली करणे योग्य असून त्यांचा विपरीत परिणाम स्कूलावर होईल. आणखीन एका पालकाने सांगितले की, पूर्वीची दडपशाही संपवून हे स्कूल नवीन श्वास घेत होते. फा. ऍथनीने बंद पडलेले ग्रंथालय तसेच कॉम्प्युटरची दुरूस्ती करून ते पुन्हा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केले होते.

दरम्यान ही घटना घडल्यानंतर त्याची दखल घेऊन पिलार सोसायटीचे एक शिष्टमंडळ सांगेत दाखल झाले व त्यांनी शाळा व्यवस्थापन व पालकांशी चर्चा केली व आपला निर्णय नंतर कळवितो असे सांगितले.

अशा प्रकारची पहिलीच घटना

हायस्कूलच्या वर्गावर बहिष्कार घालण्याचा सांगेतील हा प्रकार पहिलाच होता. यावरून फा. ऍथनी हे विद्यार्थी व पालकांमध्ये किती लोकप्रिय होते याचा अनुभव काल आल्यावाचून राहिला नाही. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन कॅरोज प्रुझ यांनी अशी मागणी केली की, येणाऱया पाच वर्षाकरीता फा. ऍथनी यांनाच या हायस्कूलमध्ये ठेवावे. कारण, त्यांनी पुढील काही वर्षांचा आराखडा तयार करून ठेवला आहे. त्याची बदली झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर दिसून येईल.