|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » संशयिताचे रेखाचित्र प्रसिध्द

संशयिताचे रेखाचित्र प्रसिध्द 

प्रतिनिधी/ पणजी

येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱया तसेच तेथील सुरक्षा रक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱया संशयिताचे रेखाचित्र काढून पोलिसांनी प्रसिध्द केले आहे. पणजी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे. पणजी पोलासंनी भादंसं 394, 307, 511 कलमाखाली अज्ञात चोरटय़ांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

  ही घटना 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली होती. येथील सुजा पावलो फोटो स्टुडीओ जवळ, सरकारी प्रिन्टींग प्रेसच्या समोर असलेल्या महाराष्ट्र बँकच्या एटीएममध्ये अज्ञात चोरटय़ांने चोरी करण्याचा प्रय़त्न केला होता. दोघे चोरटे दुचाकीवरून आले होते. त्याच्यातील एकटा बुरखा घालून एटीएममध्ये घुसला तर दुसरा दुचाकीवर बसून राहिला होता.

एटीएममध्ये आवाज होत असल्याने सुरक्षारक्षक आत गेला व त्याने पाहिले तर चोरटा एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला पकडण्यासाठी गेल्यावर चोरटय़ाने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर हातोडीने वार केला. सुरक्षा रक्षक जखमी झाला होता मात्र त्याने चोरटय़ाला पकडून ठेवण्याचा आटोकाट प्रय़त्न केला. चोरटा आणि सुरक्षा रक्षक यांच्यात बराच वेळ झटापट झाली होती. यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला होता. झटापटीच्या दरम्यान चोरटय़ाच्या तोंडावरचा बुरखा खाली पडला शेवटी चोरटा पळून गेला.  सुरक्षा रक्षकाच्या सावधानीमुळे चोरटय़ाचा चोरी करण्याचा प्रय़त्न फसला होता. सुरक्षा रक्षक राणू सिंग याचा त्याच्या बाहादुबद्दल पोलिसांनी गौरव केला होता तसेच बँकेतर्फेही सुरक्षा रक्षकाचा गौरव करण्यात आला होता. पणजी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.