|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘गाव गाता गजाली’तून एसटी कर्मचाऱयांची बदनामी

‘गाव गाता गजाली’तून एसटी कर्मचाऱयांची बदनामी 

एसटी कर्मचारी संघटनेचा निषेधाचा सूर

प्रतिनिधी / कणकवली:

‘गाव गाता गजाली’ ही मालिका सुरू असलेल्या वाहिनीवर एसटीबाबतचे दोन भाग दाखविण्यात आले. यात अवास्तव व भडक चित्रण दाखवून हजारो एसटी कर्मचाऱयांची मने दुखावली आहेत. त्यामुळे या प्रकाराचा आम्ही इंटक संघटनेच्यावतीने निषेध करतो, असे इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे यांनी  प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मालिकेच्या भागात एसटीचा वाहक वस्तीच्या गाडीच्या गावातील लोकांना प्रवासी कमी झाल्याने गाडी बंद होणार, असे सांगतो. लोक त्याला गाडी बंद करू नका, अशी विनंती करत भेटवस्तू देतात. तसेच त्याला धडा शिकवितात, असे दाखविण्यात आले आहे. एसटीचे चालक-वाहक हे वस्तीच्या दुर्गम ठिकाणी राहतात. त्यांना थंडी वाऱयातही सीटवरच झोपावे लागते. एसटीचे चालक-वाहक गाडी बंद होणार म्हणून सांगत नाहीत. उलट सहकार्य करतात. येथील प्रवासी जनतेशी एसटी चालक-वाहकांचे जिव्हाळय़ाचे नाते आहे.

चालक-वाहकांच्या सांगण्यावरून वा तक्रारीवरून गाडी बंद होत नाही. एसटी प्रशासनाकडून याबाबत तपासणी व आढावा घेऊनच कार्यवाही होते. एसटी कर्मचारी कमी पगारात जनतेची सेवा करतात. प्रवाशांचे लाखो रुपये किमतीचे साहित्य गाडीत राहिल्यास प्रामाणिकपणे परत करतात, अशी हजारो उदाहरणे आहेत. कोकणातील बहरणाऱया पर्यटनात एसटी कर्मचाऱयांचाही मोठा वाटा आहे. असे असतांना अवास्तव चित्रण दाखवून कोकणी माणसाचे वाईट चित्र उभे केले जात आहे. त्यांनी एसटी कर्मचाऱयांची चांगली बाजू व समृद्ध कोकणी संस्कृतीही दाखवावी, असेही राणे यांनी म्हटले आहे.