|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राष्ट्रवादीचे चिंतन

राष्ट्रवादीचे चिंतन 

किल्ले रायगडाच्या साक्षीने कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे चिंतन शिबिर झाले. चिंतनातल्या या मंथनातून जे बाहेर आले त्यातून कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम व उत्साह संचारेल अशी अपेक्षा करावी म्हटले तर त्याचे चिन्ह कुठेच दिसून आले  नाही. उलट त्यांच्या संभ्रमात वाढ होईल असेच चिंतन झाल्याचे दिसते. प्रफुल्ल पटेल यानी शिबिराच्या पहिल्याच दिवशी शरद पवारांच्या पंतप्रधानपदाचे विमान पुन्हा एकदा हवेत उडविले. 2019 च्या लोकसभा  निवडणुकीनंतर पवार हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतील अशी भाकणूक त्यांनी केली. विद्यमान राजकीय परिस्थिती विचारात घेतली तर शरद पवार पंतप्रधान होतील असे म्हणण्याचे धाडस कोणीच करणार नाही. खुद्द पवारांनीच चिंतन शिबिराच्या समारोपात आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले. तरीही पटेल आताच हे का म्हणाले असावेत हा प्रश्न उरतोच. कदाचित पवारांच्या मनात काहीतरी वेगळे असावे. राजकारणातल्या बदलत्या वाऱयाची चाहूल पवार याना अगोदर लागते असा गौरवपूर्ण उल्लेख खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच एकवेळ केला होता. त्या न्यायाने पवारांना तशी काही चिन्हे दिसत आहेत का? तशी शक्यता त्यांच्या भाषणातून दिसते.  केंद्र आणि राज्यातले सरकार खाली खेचण्याची वेळ आली आहे, असे पवार म्हणाले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या काळात मोदी सरकारवर इतकी थेट आणि सडेतोड टीका त्यांनी पहिल्यांदाच केली आहे.  खरेतर पवार हे एकमेव नेते आहेत की ज्यांचे  सर्वच पक्षनेत्यांशी मैत्रीचे संबंध राहिले आहेत. त्यांच्या शब्दाखातर मोदी बारामतीला येतात यातच सर्व काही आले. पवार हे महत्त्वाकांक्षी नेते आहेत. देशाचा पंतप्रधान होण्याची त्यांची इच्छा खूप जुनी आहे. 1991 च्या मे महिन्यात राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर त्यांनी तसे प्रयत्न केले होते. पण तेव्हा नरसिंहराव बाजी मारून गेले आणि पवारांना संरक्षण मंत्रीपदावर समाधान मानावे लागले. मुंबई बाँम्बस्फोटानंतर परिस्थिती बिघडल्याने त्यांना मुख्यमंत्री म्हणून राज्यात पाठविण्यात आले. केंद्रात  अल्पमतातल्या आघाडी सरकारांचे जेव्हा जेव्हा प्रयोग झाले त्यावेळी अनेकदा  पवारांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आले. एकवेळ तर ते लोकसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते. सोनिया गांधी यांच्या राजकारण प्रवेशानंतर विदेशी जन्माचा मुद्दा पुढे करून ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. याकाळातही पंतप्रधान होण्याची आकांक्षा त्यांच्या मनात असणारच. महाराष्ट्रात  भाजप-शिवसेना युतीला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीने आघाडी केली. केंद्रातही दहा वर्षे मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारमध्ये त्यांनी कृषीमंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले. देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ म्हणजे सुमारे पाच दशके आपला ठसा उमटविणारा त्यांच्यासारखा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. पंतप्रधान होण्याची पात्रता पवार यांच्याकडे नक्कीच होती आणि आहे. तसे पाहिले तर पवार यांच्यापेक्षा दुय्यम दर्जाचे नेते पंतप्रधान झाले आहेत. एच.डी. देवेगौडा, आय.के. गुजराल, चंद्रशेखर, व्ही.पी.सिंग हे अपघाताने पंतप्रधान झाले, पण तशी संधी पवारांना कधीच मिळाली नाही. त्या अर्थाने यशवंतराव चव्हाण यांच्याइतकेच त्यांचे हे मानसपुत्र दुर्दैवी ठरले आहेत.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळेस पवारांचे नाव चर्चेपलीकडे कधी गेले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यानी प्रतिभा पाटील यांच्या उमेदवारीला उघडपणे पाठिंबा दिला होता. तसाच उघड पाठिंबा त्यांनी पवारांना पंतप्रधानपदासाठी नेहमीच देऊ केला होता. सध्या  पवार  निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला झाले आहेत. कोणत्याही प्रकारची औपचारिक सत्ता त्यांच्याकडे  नाही. मात्र त्यांचा प्रभाव, प्रसिद्धीचे वलय कायम आहे. त्यांच्या शब्दामध्ये चर्चा घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे. पवार काँग्रेसमध्ये असोत की काँग्रेसच्याबाहेर त्यांची म्हणून एक ताकद कायम राहिलेली आहे. पण त्याचे राजकीय डावपेच नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. पवारांचे निष्ठावंत छगन भुजबळ भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवासात आहेत. त्यांचे पुतणे अजित पवार सहिसलामत आहेत याचे गौडबंगाल काय असा प्रश्न सामान्यजनतेला पडत असला तरी पवारांची  ताकद हेच त्याचे एक संभाव्य उत्तर आहे. बहुपक्षीय राजकारणाकडून काँग्रेस आणि भाजप अशा द्विपक्षीय   प्रभावाच्या राजकारणाकडे  देशाची वाटचाल सुरू असताना बहुसंख्य प्रादेशिक पक्ष आणि त्याचे नेते कोंडीत सापडले आहेत. वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्या  काळात  प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या नाकी नऊ आणले होते. देशात आणि बहुतेक राज्यातून अपवाद वगळता आघाडय़ांची सरकारे हद्दपार होऊन एकपक्षाच्या हाती सत्ता येत आहेत.आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर प्रादेशिक पक्षांना एकत्र यावे लागेल. तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी  उद्धव ठाकरेंना भेटतात किंवा उद्धव पवारांशी चर्चा करतात. त्याचा अर्थ इतकाच की काँग्रेस व भाजप यांना पर्याय ठरू शकेल अशी चाचपणी पुन्हा केली जात आहे. बिगर काँग्रेसची सरकारे टिकत नाही असे म्हणणारे पवार निवडणुकीत नसले तरी राजकीय मैदानात उभे आहेत. पक्षातील  अनेक  नेते आपल्या राहुटय़ांसह भाजपच्या छावणीत दाखल झाले आहेत. तरीही पवारांचे मैदानात असणे हेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलासा देणारे आहे. पण राष्ट्रवादीला अच्छे दिन आणण्यासाठी तेवढे पुरेसे असणार नाही. कोणत्या प्रश्नावर सरकारविरोधात महाराष्ट्र ढवळून काढता येईल. पक्ष, संघटनात्मक बांधणी नव्याने कशी करता येईल यावर विचारमंथन घडले असते तर ते अधिक सार्थ ठरले असते. पण जाणत्या राजाच्या मनात काय आहे हेच अजून कार्यकर्त्यांना नीट कळत नाही तर मग बाकीच्या गोष्टी खूप दूरच्या आहेत. पंचतारांकित संस्कृतीतले चिंतनाशिवायचे चिंतन चिंता वाढवणारेच आहे.