|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोळसा विस्तारीकरणाला सरकारचा ठाम विरोध

कोळसा विस्तारीकरणाला सरकारचा ठाम विरोध 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती

प्रतिनिधी/ पणजी

कोळसा हाताळणीच्या विस्तारीकरणाला सरकारने याअगोदरच विरोध केला असून सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. कोळसा हाताळणीचे आणखी विस्तारीकरण करायला सरकार देणार नाही. त्याचबरोबर कोळसा प्रदूषण नियंत्रणात असून सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. काही स्वार्थी घटक दूषित हेतूने कोळसा व नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाबाबत चुकीच्या गोष्टी पसरवित असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

कोळसा हाताळणी विस्तारीकरण केले जाऊ नये, असे सरकारला वाटत असून त्याला गोवा सरकारचा यापुर्वीच विरोध आहे. याबाबतचे पत्र केंद्र सरकारला ऑगस्ट महिन्यातच पाठविण्यात आले आहे. त्यात गोव्याचा या विस्तारीकरणाला विरोध आहे हे राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे. त्याचबरोबर कोळसा प्रदूषणाची तपासणी केली जावी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळालाही सूचना केली होती. त्यानुसार वास्कोत दोन ठिकाणी प्रदूषणाबाबतची तपासणी करण्यात आली.

कोळसा प्रदूषण पुर्णपणे नियंत्रणात

एप्रिल – मे महिन्यात कोळसा प्रदूषणासंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्यावेळच्या कोळसा वाहतुकीमुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी होत्या. जी वाहतूक 2006-07 पासून सुरू होती. केंद्रीय प्रदूषण मंडळानेही याची दखल घेतली होती. हे प्रदूषण केवळ कोळसा वाहतुकीमुळेच नाही तर धूळ, बांधकाम व्यवसाय याचेही आहे. तरीही सरकारने मागील काही महिन्यांच्या कोळसा प्रदूषणाची तपासणी केली. या तपासणीवरून आलेला निष्कर्ष पाहता कोळसा प्रदूषण नियंत्रणात असल्याचे दिसून येते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

वास्कोत दोन ठिकाणी कोळसा प्रदूषण तपासणी

वास्कोत दोन ठिकाणी कोळसा प्रदूषणाबाबत तपासणी करण्यात आली. नगरपालिकेसमोर आणि सडा जंक्शन येथे. या तपासणीत तीन वर्गवारी करण्यात आली होती. चांगले, समाधानकारण व किरकोळ प्रदूषण. चांगले म्हणजे पूर्ण नियंत्रणात असलेले, समाधानकारक म्हणजे काही प्रमाणात वाढलेले पण प्रदूषणरेषेखाली. किरकोळ प्रदूषण म्हणजे प्रदूषणरेषेचे नाममात्र उल्लंघन केलेले. एप्रिल 2017 मध्ये 8 दिवस नगरपालिकेसमोर तपासणी करण्यात आली. हवेतील प्रदूषणाबाबत ही तपासणी करण्यात आली. 8 दिवसांच्या तपासणीत 1 दिवस चांगले, 3 दिवस समाधानकारक तर 3 दिवस किरकोळ प्रदूषण असा अहवाल आला होता. त्यानंतर मे महिन्यात 9 दिवस तपासणी करण्यात आली. यापैकी 1 दिवस चांगले, 3 दिवस समाधानकारक व 5 दिवस किरकोळ प्रदूषण असा अहवाल आला.

एप्रिलपासून वारंवार प्रदूषण तपासणी

सप्टेंबर महिन्यात 7 दिवस तपासणी करण्यात आली. या 7 दिवसांपैकी 5 दिवस अत्यंत चांगले म्हणजे प्रदूषण विरहित, 1 दिवस समाधानकारक व 1 दिवस किरकोळ प्रदूषण असा अहवाल आला, तर ऑक्टोबरमध्ये 9 दिवस तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 दिवस चांगले व 2 दिवस समाधानकारक असा अहवाल आला. सडा जंक्सन येथे एप्रिल महिन्यात 30 दिवस पाहणी करण्यात आली. त्यापैकी 10 दिवस चांगले, 16 दिवस समाधानकारक व 4 दिवस किरकोळ प्रदूषण असा अहवाल आला. मे महिन्यात 31 दिवस पाहणी करण्यात आली. त्यापैकी 25 दिवस चांगले तर 6 दिवस समाधानकारक असा अहवाल आला. सप्टेंबर महित्यात 30 दिवसांपैकी 26 दिवस चांगले तर 4 दिवस समाधानकारक असा अहवाल प्राप्त झाला होता.

प्रदूषण पूर्ण नियंत्रणात आणणार

वास्कोतील प्रदूषण पूण नियंत्रणात आलेले सरकारला हवे आहे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक दिवशी पूर्ण नियंत्रणात म्हणजे चांगले असा अहवाल यायला हवा. पूर्णपणे प्रदूषण नियंत्रणात आणण्यावर सरकार भर देणार असल्याचे ते म्हणाले.