|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » सुरंगाचा सुरुंग, भारत पहिल्या दिवसअखेर 3 बाद 17!

सुरंगाचा सुरुंग, भारत पहिल्या दिवसअखेर 3 बाद 17! 

कोलकाता :

लंकन मध्यमगती गोलंदाज सुरंगा लकमलने प्रतिस्पर्धी तगडय़ा आघाडी फलंदाजी लाईनअपला चांगलाच सुरुंग लावल्यानंतर येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची 3 बाद 17 अशी जोरदार दाणादाण उडाली. अपेक्षेप्रमाणे पावसाचा व्यत्यय आल्यानंतर दिवसभरात केवळ 11.5 षटके अर्थात, जेमतेम 71 चेंडूंचा खेळ होऊ शकला. त्यातही भारतीय फलंदाजीला चांगलेच भगदाड पडल्याने स्थानिक चाहत्यांची निराशा झाली.

लकमलने आपल्या सनसनाटी स्पेलची सुरुवात लोकेश राहुलला सामन्यातील पहिल्याच चेंडूवर बाद करत केली आणि इथूनच भारताला धक्के बसत गेले. खराब हवामानामुळे, खेळाला तब्बल साडेतीन उशिराने सुरुवात करावी लागली होती. लकमलनेच नंतर शिखर धवन व कर्णधार विराट कोहली यांचेही बळी घेतले. धवनने बाहेर जाणारा चेंडू यष्टीवर ओढवून घेतला तर विराटला भोपळा फोडण्यापूर्वीच तंबूत परतावे लागले. तो चेंडूचा अंदाज चुकल्यानंतर पायचीत झाला. वास्तविक, या निर्णयाविरुद्ध त्याने रिव्हय़ू घेतला होता. पण, रिप्लेत मैदानी पंचांचाच निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय कर्णधाराची निराशा झाली.

पुढे, अंधुक प्रकाश व पावसामुळे सातत्याने खेळात व्यत्यय येतच राहिला आणि हीच मालिका कायम राहिल्याने पंचांनी केवळ 11.5 षटकातच दिवसाचा खेळ रद्द केला. चहापानानंतर दुसऱयाच षटकात कोहली बाद झाला, त्यावेळी भारतासाठी अर्थातच हा जबरदस्त धक्का ठरला. चेंडू यावेळी किंचीत आत वळला होता. दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी चेतेश्वर पुजारा 43 चेंडूत 8 तर अजिंक्य रहाणे 5 चेंडूत शून्यावर नाबाद राहिले.

दिवसभरात पहिल्या सत्रातील खेळ संततधार पाऊस व ओलसर मैदानामुळे पूर्ण वाया गेला तर दुसऱया सत्रातील खेळाला दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी सुरुवात झाली. या दुसऱया सत्रात जेमतेम 42 मिनिटांचा खेळ होऊ शकला. चहापानानंतर दुपारी 3.30 वाजता खेळाला सुरुवात झाली. पण, भारताच्या धावसंख्येत एकाही धावेची भर तर पडली नाहीच. पण, उलटपक्षी, विराट कोहली बाद झाल्याने यजमान संघाला जबरदस्त झटका सोसावा लागला. या तिसऱया सत्रात जेमतेम 17 मिनिटांचा खेळ झाला होता.

प्रारंभी, लंकन कर्णधार दिनेश चंडिमलने नाणेफेक जिंकल्यानंतर सर्द खेळपट्टी, खराब हवामानाचा लाभ घेण्यासाठी भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण केले व त्याचा हा होरा अगदी बिनचूक ठरला. पहिल्याच चेंडूवर बाद झालेल्या केएल राहुलच्या सलग 7 अर्धशतकांची घोडदौड देखील येथे खंडित झाली. वास्तविक, अंतिम संघात मुरली विजयऐवजी त्याला संधी मिळाली होती. पण, येथे लकमलच्या अप्रतिम चेंडूसमोर त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. नंतर त्याने पुजाराचा गाशाही जवळपास गुंडाळलाच होता. पण, भारताच्या सुदैवाने चेंडू अगदी काही इंचांनी मिडल स्टम्पच्या वरुन गेला आणि पुजारासाठी हा मोठा दिलासा ठरला.

2009 नंतर प्रथमच भारत दौऱयात कसोटी मालिका खेळणाऱया लंकेने भारतीय भूमीत आजवर 10 सामने गमावले असून 6 अनिर्णीत राखले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदा तरी येथे त्यांना विजयाची चव चाखता येईल का, हे पहावे लागेल.