|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » इशांतच्या उपलब्धतेमुळे दिल्लीचे पारडे जड

इशांतच्या उपलब्धतेमुळे दिल्लीचे पारडे जड 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

भारतीय संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज इशांत शर्माला रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱया महाराष्ट्र विरूद्ध अ गटातील पाचव्या फेरीतील सामन्यात खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली संघाचे नेतृत्व इशांत शर्माकडे आहे. रणजी स्पर्धेत दिल्लीला उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी लाभली आहे.

गेल्या काही वर्षापासून संघ व्यवस्थापनाच्या धोरणानुसार भारतीय संघातील यापूर्वी निवड करण्यात आलेल्या खेळाडूचा अंतिम 11 खेळाडूंत समावेश नसेल तर त्याला प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळण्यास पाठविले जाते. इशांत शर्माच्या बाबतीतही अशी स्थिती निर्माण झाल्याने त्याला महाराष्ट्र विरूद्ध रणजी सामन्यात खेळण्याची अधिकृत परवानगी संघ व्यवस्थापनाकडून मिळाली आहे.

लंकेविरूद्ध कोलकात्यातील गुरूवारपासून सुरू झालेल्या भारतीय कसोटी संघात त्याचा समावेश होता पण त्याला अंतिम अकरा खेळाडू स्थान मिळू शकले नाही. इशांत शर्मा गुरूवारी रात्री उशिरापर्यंत दिल्लीत दाखल होईल. शुक्रवारच्या रणजी सामन्यात इशांत शर्माकडे दिल्लीचे कर्णधारपद राहील. ऋषभ पंत उपकर्णधार म्हणून कामगिरी बजावेल, अशी माहिती दिल्ली संघ व्यवस्थापक शंकर सैनी यांनी दिली आहे.

रणजी स्पर्धेत दिल्ली संघाने चार सामन्यांतून 17 गुण घेत अ गटात दुसरे स्थान मिळविले आहे. या गटात कर्नाटकाचा संघ सध्या पहिल्या स्थानावर आहे. शुक्रवारच्या सामन्यात महाराष्ट्र संघाला केदार जाधवची उणीव निश्चित भासेल. दुखापतीमुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. दिल्ली संघातील अनुभवी फलंदाज गौतम गंभीर याच्या कामगिरीत सातत्य दिसत असून त्याने आतापर्यंत चार सामन्यात दोन शतके झळकविली आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व अंकित बावनेकडे राहील. राहुल त्रिपाठी, रोहित मोटवानी यांच्या कामगिरीवर महाराष्ट्राचे यश अवलंबून राहील.