|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » …तर दहा लाखांचा धनादेश परत करणार

…तर दहा लाखांचा धनादेश परत करणार 

कोथळे कुटुंबीयांचा इशारा : एस.पी., डीवायएसपींवर कारवाईवर करा

प्रतिनिधी/ सांगली

 शासनाने दहा लाखांचा धनादेश देऊन आमची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शुक्रवारी पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे याच्या कुटुंबीयांनी केला. पोलीस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करा आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली करा या मागणीवर ठाम असणाऱया कुटुंबाने शासनाला सोमवारपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत आपल्या मागण्या मान्य केल्यास धनादेश शासनाकडे परत करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, सीआयडीच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामानंद आज सांगलीत येत आहेत.

अनिकेत कोथळे याचा पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या चार साथीदार पोलिसांनी पोलीस कोठडीत मारहाण करून खून केला. घटनेनंतर सहा जणांना तात्काळ अटक करण्यात आली. अन्य सात पोलिसांनाही निलंबित करण्यात आले आहे. पण, या प्रकरणात कामटे आणि टोळीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱया शहर डीवायएसपी डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करा, घटनेला जबाबदार धरून पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली करा, हा खटला फास्ट ट्रक न्यायालयात चालवा, यासाठी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा आणि मृत अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घ्या आदी मागण्या कुटुंबीय आणि सर्वपक्षीय कृतीसमितीसह कार्यकर्त्यांनी केल्या आहे.

 या घटनेनंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगलीला दोन वेळा भेट दिली. तर कोथळे कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे कबूल केले होते. तर अनिकेतच्या खुनानंतर उघडय़ावर पडलेल्या कुटुंबीयांना शासनातर्फे दहा लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. पण, खुनानंतर बारा दिवस झाले तरीही अद्याप पोलीस प्रमुख आणि डीवायएसपींवर कारवाई झाली नाही. फास्ट ट्रक आणि ऍड. उज्ज्वल निकम यांच्याबाबतीतही शासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे दहा लाखांची मदत करून जर आमचे तोंड बंद करण्याचा शासनाचा डाव असेल तर आम्हाला सरकारची ही मदतच नको. सोमवारपर्यंत कारवाईची प्रतीक्षा करू अन्यथा धनादेश शासनाला परत करू असा इशारा, मृत अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

 आज सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक सांगलीत

सीआयडीने अनिकेतच्या खुनाचा तपास गतीने सुरू केला आहे. आंबोली घाटात जाऊन अनिकेतचा मृतदेह जाळल्याच्या ठिकाणाचा पंचनामा केला आहे. साक्षीदारांच्या चौकशी आणि जबाब घेण्यात येत आहेत. यामध्ये सर्व संशयितांना चौकशीच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. सीआयडीचे अप्पर पोलीस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, पोलीस उपाधीक्षक हरि कुलकर्णी यांच्यासह पाच जिल्ह्य़ातील पथके तपास करीत आहेत. या तपासाचा आढावा घेण्यासाठी सीआयडीचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामानंद आज सांगलीत येत आहेत. तपासाचा आढावा घेण्याबरोबरच ते पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि डीवायएसी डॉ. दीपाली काळे यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. कॉल डिटेल्स काढणे, आतापर्यंतचा तपास अपडेट करणे आदी कामे शुक्रवारी सीआयडीने सुरू केली होती. सीआयडीने शहर पोलीस ठाण्यात ज्या खोलीत अनिकेतला मारहाण केली, त्या खोलीतून एक बादली आणि लोखंडी पाईप हस्तगत केली आहे.

Related posts: