|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तरंदळेत म्युझियम होण्यासाठी प्रयत्न करणार!

तरंदळेत म्युझियम होण्यासाठी प्रयत्न करणार! 

प्रतिनिधी / कणकवली

पहिल्या महायुद्धात सहभागी झालेल्या तरंदळेतील सैनिकांच्या इतिहासाची गाथा पुढील पिढीला कळावी, यासाठी इंग्रज सरकारने गावात स्मृतिस्तंभ उभारला. हत्यारे, सनद भेट दिली. गावची ही शौर्यगाथा पुढील पिढीसहीत कोकणात येणाऱया पर्यटकांना पाहता यावी, यासाठी अशा गोष्टींचे म्युझियम व्हावे, असे आपणाला वाटते. असे म्युझियम तरंदळे शाळा नं. 1 येथे उभारण्याच्यादृष्टीने आपण प्रयत्न करूया. मात्र, हे करीत असताना जिल्हय़ात पहिल्या, दुसऱया महायुद्धात सहभागी झालेल्यांचे असे उभारलेले स्तंभ, माहिती, सदन, ताम्रपट याबाबतची माहिती एकत्रित करून जिल्हय़ासाठीचे ‘म्युझियम’ बनविण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केले.

‘तरुण भारत’मध्ये 15 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘शूरगाथा तरंदळेची…’ या वृत्ताची दखल घेत जठार यांनी तरंदळेतील स्मृतीस्तंभाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप तालुकाध्यक्ष संदेश पटेल, महेश सावंत, नवनिर्वाचित सरपंच नम्रता देवलकर, जीतेंद्र सावंत, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष रमाकांत देवलकर, पुरुषोत्तम सावंत, तेजस सावंत, अमित सावंत, अशोक सावंत, रतन सावंत, डॉ. कुडतरकर, चेतन गावकर, प्रज्ञेश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती कासले आदी उपस्थित होते.

तरंदळेतील 52 जणांनी पहिल्या महायुद्धात सहभाग घेतला होता. यापैकी दोघांना वीरमरण आले, तर 50 जण सुखरुप परत आले. त्यांच्या शौर्यगाथेच्या इतिहासाची आठवण म्हणून इंग्रज सरकारने तरंदळेत त्यांचा स्मृती स्तंभ उभारला. तर या शूरविरांना सैन्यात पाठविणाऱया तत्कालीन पोलीस पाटील भाऊराव सावंत यांना सनद, तलवार, गुप्ती, बंदुका देऊन सन्मानीत करण्यात आले होते. याबाबतची माहिती ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जठार यांनी याची दखल घेत तरंदळेमधील या स्मृतीस्तंभाची पाहणी केली. या स्तंभासमोरच तरंदळे शाळा नं. 1 असून त्या शाळेची उभारणीही 14 एप्रिल 1919 मध्ये झालेली आहे.  जठार व सहकाऱयांनी या शाळेलाही भेट देऊन माहिती घेतली.

तरंदळेसहीत जिल्हय़ातील अन्य काही ठिकाणीही पहिल्या अथवा दुसऱया महायुद्धात सहभागी झालेल्यांची अशी माहिती, वस्तुसंग्रह, स्तंभ असण्याची शक्यता आहे. कासार्डे गावातही दुसऱया महायुद्धात सहभागी झालेल्यांच्या नावांचा स्तंभ असल्याचे डॉ. कुडतरकर म्हणाले. त्यामुळे अशा विजयगाथेचे म्युझियम तरंदळे येथे तयार करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले. यासाठी असे स्तंभ वा युद्धात, स्वातंत्र्य लढय़ात सहभागी असलेल्यांकडील माहिती, सनदी, ताम्रपट वा इतर वस्तू या प्रदर्शनात ठेवून ते पर्यटनदृष्टय़ा विकसीत करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरले. यासाठी शाळेच्या आवारात नवीन वर्गखोलीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास त्यासाठी निधी देण्याबरोबरच म्युझियम उभारण्यासाठीही मदत केली जाईल, असे जठार यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आतापासूनच कामाला लागा. 14 एप्रिल 2018 ते 14 एप्रिल 2019 हे या शाळेचे शताब्दी वर्ष असून तत्पूर्वी आपण सर्व कार्यवाही पूर्ण करून 2019 मध्ये या म्युझियमचे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करूया, यासाठी गावातील सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जठार यांनी केले.