|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » माजी आमदार सा. रे. पाटील ग्रंथालय उभारणीसाठी 60 लाख रूपये

माजी आमदार सा. रे. पाटील ग्रंथालय उभारणीसाठी 60 लाख रूपये 

जयसिंगपूर पालिकेत बहुमताने ठराव मंजूर

प्रतिनिधी/ जयसिंगपूर

पालिकेच्या पाणी पुरवठा यंत्रणेचे बळकटीकरण, विस्तारीकरण व सुधारणा करण्यासाठी पालिकेकडे प्राप्त झालेल्या वैशिष्टय़पूर्ण योजनेतील शिल्लक रक्कम रूपये 60 लाख खर्च करण्याच्या विषयावर पालिकेच्या सभेमध्ये सुमारे दोन तास गरमागरम चर्चा झाली. अखेर वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नव्याने पाणी पुरवठा विभागाने अंदाजपत्रक तयार करावे व 60 लाख रूपये निधीचा विनीयोग यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या माजी आमदार स्व. सा. रे. पाटील ग्रंथालय, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र बांधण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय बहुमताने घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा डॉ. सौ. निता माने होत्या.

पालिकेच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा सभागृहात विशेष सभा पार पडली. पालिकेकडे विविध विभागाकडून आलेल्या निवीदाना मंजुरी देण्यात आली. चार सेवानियुक्त कर्मचाऱयांना शासन नियमाप्रमाणे द्यावयाच्या रक्कमेच्या विषयालाही मंजुरी देण्यात आली. विषय पत्रिकेवरील शहराला पाणी पुरवठा करणाऱया फिल्टर हाऊस येथील यंत्रणेचे बळकटीकरण, स्थिरीकरण व सुधारणा करण्यासाठी वैशिष्टय़पूर्ण योजनेतील शिल्लक 60 लाख रूपये खर्च करण्याच्या विषयावरून वादाला सुरूवात झाली. राजर्षि शाहू विकास आघाडीने शहराची वाढती लोकसंख्या लक्ष्यात घेवून पाणी पुरवठा योजनेचे नव्याने नियोजन करण्याची मागणी केली. या कामी लागणारा 15 कोटी रूपयाच्या निधीसाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. स्व. सा. रे. पाटील ग्रंथालय व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राकडे हा निधी वळवावा, अशी सूचना उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी केली.

यावर नगरसेवक बजरंग खामकर आक्रमक होवून सदरचे 60 लाख रूपये विषय पत्रिकेत सुचविल्याप्रमाणे पाणी पुरवठेच्या कामास खर्च व्हावेत, अशी आग्रही मागणी लावून धरली. तर शहराचा विकास व गरज लक्षात घेवून प्राधान्यक्रम ठरवूनच निधीचा विनियोग व्हावा, अशी सूचना नगरसेविका आसावरी आडके यांनी केली. सर्जेराव पवार यांनी ग्रंथालय उभारणीचा ठराव केंव्हा झाला, याबाबत विचारणा करून 60 लाखाचा निधी वाचनालयाच्या उभारणीसाठी पुरेसा ठरणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. यातून पालिकेचे उत्पन्न वाढणार आहे का? असाही प्रश्न उपस्थित झाला.

अभ्यासिकेवरील गुंतवणूक व्यर्थ जात नाही, त्यामुळे हा निधी ग्रंथालयासाठीच खर्च करायचे, अशी आक्रमक भूमिका सत्ताधारी राजर्षि शाहू विकास आघाडीने घेतली. अखेर वादावादी होवून बहुमताने हा निधी ग्रंथालय बांधकामासाठीच खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद बजरंग खामकर व अपक्ष नगरसेवक सर्जेराव पवार तटस्थ राहिले तर ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही.

कृष्णा नदीवरील जयसिंगपूर पालिकेच्या जॅकवेलमध्ये पंपिग मशिनरी बसविण्याची परवानगी संभाजीपूर ग्रामपंचायतीने मागीतली आहे. या विषयावरही जोरदार चर्चा झाली. मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांनी शहरात सद्या पाणी पुरवठा विभाग कार्यक्षम नसल्याने संभाजीपूरला पंपिग मशिनरी बसविण्यास परवानगी दिल्यास शहरात पाणी पुरवठा करण्यात व्यत्यय येवू शकतो, असे सांगितले. यावर तांत्रिक बाबींचा विचार करून अभ्यास करून पुढील सभेपुढे हा विषय ठेवण्यात यावा, अशी सूचना संजय पाटील-यड्रावकर यांनी केली. त्यानंतर हा विषय तहकुब ठेवण्यात आला.

पालिकेचे आरक्षण क्रमांक 77 मध्ये 8 एम.एम. पार्क विकसित करण्यासाठी प्रशासनाने आर्किटेक्टना पुर्ण सहकार्य करावे, लवकरात लवकर हा पार्क विकसित व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मोकाट जनावराचा बंदोबस्त करत असताना ठेकेदाराकडून त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, हे पाहणे गरजेचे असून या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष अधिकाऱयांची नेमणूक करावी, अशी सूचना सभेत करण्यात आली.

यावेळी झालेल्या चर्चेत संजय पाटील-यड्रावकर, शिवाजी कुंभार, असलम फरास, संजय पाटील-कोथळीकर, सर्जेराव पवार, बजरंग खामकर, असावरी आडके, शैलेश चौगुले, पराग पाटील आदीनी भाग घेतला.

 

  1. चौकट – नगराध्यक्षांची नुरोवा पुंजरवा भूमिका

ताराराणी आघाडीच्या सहकार्याने जनतेतून विजयी झालेल्या नगराध्यक्षा डॉ. निता माने यांनी पालिका सभागृहामध्ये चर्चेत भाग न घेता सभागृहात चाललेल्या विषय पत्रिकेवरील विषयाबाबत नुरोवा पुंजरवा भूमिका घेतल्याने त्यांचे स्वतःचे असे काही मत आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पद्धतीने त्या कामकाज करू लागल्या तर दोन आघाडय़ामध्ये नेहमीच वादाचे प्रसंग उभे राहतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

  1. चौकट – ताराराणीच्या पक्षप्रदोतांना घरचा आहेर

ताराराणी आघाडीचे पक्षप्रदोत बजरंग खामकर यांनी 60 लाख रूपयचा निधी पाणी पुरवठय़ाच्या कामासाठीच खर्च व्हावा, अशी आग्रही मागणी करत ते सभागृहात भांडत होते. या विषयावर मतदान होताना ताराराणीचे काही सदस्य निघून गेले तर स्वाभिमानीचे शैलेश आडके यांनी राजर्षि शाहू विकास आघाडीच्या पाठिशी राहिले. तर काहीनी आपली भूमिकाच स्पष्ट केली नाही. यामुळे ताराराणी सदस्यामध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले.

  1. चौकट – पाणी पुरवठा विभाग अधिक सक्षम करण्याची गरज

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. यासाठी जॉकवेलची क्षमता वाढवणे, फिल्टर हाऊसचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे. या कामी किमान 15 कोटी रूपयाचा निधी आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावेत, मागणीचा पाठपुरावा करावा, असे मत संजय पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले.

Related posts: