|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘बिबटय़ा हल्ला’ वर संशयाचे ढग

‘बिबटय़ा हल्ला’ वर संशयाचे ढग 

वनपाल म्हणतात बिबटय़ा नाही

ग्रामस्थ म्हणतात बिबटय़ाच

डॉक्टर म्हणता हिंस्त्र प्राणी

जांभवली गाव भितीच्या छायेखाली

वार्ताहर /राजापूर

राजापूर तालुक्यातील जांभवली, पोटलेवाडी येथे साठ वर्षीय महिलेचा बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली आहे. बिबटय़ाच्या हल्ल्यात मानवी बळी जाण्याची हा पहिलाच प्रकार मानला जात असला तरी हा हल्ला आता बिबटय़ानेच केला की अन्य प्राण्याने याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. बिबटय़ाने हल्ला केल्याचा कोणताही परिस्थितीजन्य पुरावा नसल्याचे वनपालांनी स्पष्ट केले आहे, तर डॉक्टरांच्या शवविश्चेदन अहवाल हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू असे निदान आहे, ग्रामस्थांनी मात्र बिबटय़ाच्या हल्ल्यातच कदम यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पार्वती कदम यांच्यावर नेमका कोणी हल्ला केला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान, पार्वती कदम यांच्या मृत्यूमुळे जांभवलीबरोबरच संपूर्ण राजापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. जांभवली, पोटलेवाडी येथील पार्वती महादेव कदम (60) यांच्या घरापासून थोडय़ा अंतरावर जंगलामध्ये गुरांचा गोठा असून सायंकाळी या गोठय़ातील गुरे सोडून रानात चरवून घरी आणणे हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यानुसार रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पार्वती कदम या गोठय़ातील गुरे सोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत त्या घरीच परतल्या नाहीत. गुरे घरी परतली तरी पार्वती कदम या घरी परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. प्रथम ज्या ठिकाणी गुरे चरण्यासाठी जातात त्या माळरानावर शोध घेण्यात आला. मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर काहींनी रानातील गोठय़ात जावून पाहणी केली असता समोरील दृष्य बघून त्यांना धक्काच बसला.

गोठय़ात पार्वती कदम या रक्ताच्या थारोळय़ात पडल्या होत्या. पार्वती यांचा चेहऱयाचा भाग पुर्णपणे छिन्नविच्छिन्न झाला होता. मानेलाही मोठय़ा जखमा झाल्या होत्या. समोरचा प्रकार पाहुन सर्वजण हादरून गेले. मागील काही दिवसात गावात अनेकदा बिबटय़ा ग्रामस्थांच्या नजरेस पडला होता. शिवाय पार्वती कदम यांच्या चेहरा व मानेवर नखांचे ओरखडे असल्याने हा हल्ला बिटय़ानेच केल्याचे सांगितले जात आहे. बिबटय़ाचा वाढता संचार, त्यात यापुर्वी अनेक प्राण्यांचा झालेला मृत्यू व आता महिलेचा मृत्यू यामुळे बिबटय़ाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.

या घटनेबाबत राजापूर वनविभागासह, पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. त्यानंतर वनविभागासहित पोलीस ठाण्याचे अधिकारी रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. त्यामध्ये वन परिक्षेत्र अधिकारी बी.आर. पाटील, राजापूरच्या वनपाल श्रीमती राजश्री कीर व त्यांचे सहकारी तसेच राजापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रायसिंग पाटील व त्यांचे सहकारी यांचा सामावेश होता. रात्री पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदन अहवालात कदम यांचा मृत्यू हिस्र प्राण्याच्या अहवालात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू असा स्पष्ट उल्लेख झालेला नाही. दरम्यान, दुपारी जांभवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

बिबटय़ाच्या हल्ल्याचा पुरावा नाही

राजापूरच्या वनपाल श्रीमती राजश्री कीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, पार्वती कदम यांचा मृत्यु हा बिबटय़ाच्या हल्ल्यात झाल्याचे प्रथमदर्शनी तरी येत नाही. घटनास्थळावरही बिबटय़ाने हल्ला केल्याच्या कोणत्याही खुणा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे कदम यांचा मृत्यु बिबटय़ाच्या हल्ल्यात झाले असे निश्चितपणे म्हणता येणार नाही.

वनविभागासमोर आव्हान

दरम्यान, या तीन वेगवेगळय़ा निष्कार्षांमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. जर पार्वती कदम यांचा मृत्यु बिबटय़ाच्या हल्ल्यात झाला नसेल तर त्यांच्या चेहऱयावर जखमा कशा? तसेच बिबटय़ा नसेल तर दुसऱया कोणत्या प्राण्याने हल्ला केला? असे सवाल उपस्थित होत आहेत. बिबटय़ाने हल्ला केला असल्यास त्याच्या बंदोबस्ताचे व अन्य प्राण्याने हल्ला केला असल्यास त्याचा शोध घेण्याचे व बंदोबस्ताचे वनविभागासमोरही नवे आव्हान उभे राहणार आहे.

Related posts: