|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » रुबी रेसिडन्सी दुर्घटनेतील बहुतेक संशयित दोषमुक्त

रुबी रेसिडन्सी दुर्घटनेतील बहुतेक संशयित दोषमुक्त 

प्रतिनिधी/ मडगाव

31 कामगारांना मृत्यू आलेल्या काणकोण येथील रुबी रेसिडन्सी इमारत दुर्घटनेसंबंधी एक संशयित आरोपी सोडल्यास इतर 10 संशयित आरोपींना त्यांच्यावरील आरोपातून दोषमुक्त (डिस्चार्ज) करण्यात आले तर एकमेव संशयित आरोपी कंत्राटदार विश्वास देसाई याच्याविरुद्ध काणकोण न्यायालयात खटला चालविण्यात यावा, असा मडगावच्या सत्र न्यायालयाने काल सोमवारी आदेश दिला आहे.

सरकारी अधिकारी होते संशयित आरोपी

 काणकोणचे तत्कालीन मुख्याधिकारी दीपक देसाई, प्रशांत शिरोडकर, प्रदीप नाईक, पालिका अभियंते अजय नाईक देसाई, अशोक नाईक गावकर, सुहास फळदेसाई, नगर नियोजन खात्याचे उपनगर नियोजक प्रकाश बांदोडकर, ड्राफ्टमन रमेश नाईक हे सरकारी कर्मचारी तसेच भारत डेव्हलपर्स ऍण्ड रिअलेटर्सचे प्रदीप सिंग बिरिंग व जगदीपकुमार सेहगल या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून होते. या सर्व संशयिताना सत्र न्यायालयाचे न्या. बी. पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने या खटल्यातून ‘डिस्चार्ज’ करण्याचा आदेश दिला आहे.

सरकारपक्षातर्फे सरकारी वकील एल. फर्नाडिस तर संशयितांच्यावतीने ऍड. ए. प्रभुदेसाई न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, दोन बिल्डर्स अणि एक कंत्राटदार सोडल्यास या प्रकरणातील वरील संशयित आरोपी हे सरकारी कर्मचारी होते.

 कंत्राटदार विश्वास देसाई याना भारतीय दंड संहितेच्या 304, 420,120 (ब) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या 7 व 13 (1) (अ) व (ड) कलमाखालील आरोपातून मुक्त करण्यात आले आहे.

नगर व नियोजन कायद्याच्या 17 अ कलमाखालील आरोपातून आरोपी विश्वास देसाई सोडल्यास इतर सर्व संशयितांना ‘डिस्चार्ज’ करण्यात येत असल्याचे न्या. देशपांडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

खटला चालणार काणकोण कोर्टात

न्या. देशपांडे यांच्या न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशात रुबी रेसिडन्सी दुर्घटना प्रकरणातील एकमेव संशयित आरोपी विश्वास देसाई याच्याविरुद्ध भारतीय दंड संहतेच्या 336, 337, 338 तसेच 304 (अ) कलमाखाली आरोप निश्चित करण्यात यावेत असा आदेश या न्यायालयाने काणकोण येथील न्यायदंडाधिकाऱयांना दिला आहे.

रुबी रेसिडन्सी इमारत दुर्घटनेसंबंधीचा हा खटला काणकोण न्यायालयात चालविण्यात यावा आणि या प्रकरणातील संशयित आरोपीने 5 डिसेंबर 2017 रोजी सकाळी काणकोण न्यायालयापुढे हजर रहावे असे या न्यायालयाने म्हटले आहे.

काणकोण पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले आरोपपत्र 2600 पानी होते. त्यात 185 साक्षीदार आणि 11 संशयित आरोपी होते.

Related posts: