|Sunday, August 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भाजपकडून फायरब्रँड नेत्यांची फौज

भाजपकडून फायरब्रँड नेत्यांची फौज 

गांधीनगर / वृत्तसंस्था :

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपने स्वतःच्या फायरब्रँड नेत्यांची फौज उतरविली आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्यात आली. भाजपचे हे दिग्गज 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये निवडणूक प्रचार करताना दिसून येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 नोव्हेंबरपासून राज्यात प्रचारसभांचा धडाका लावणार आहेत.

गुजरात निवडणुकीत विजय मिळविणे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. यामुळे भाजपने गुजरातमध्ये प्रचारासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच पक्षाध्यक्ष अमित शाह यांचे हे गृह राज्य असल्याने तेथे मोठा विजय मिळविण्याचे आव्हान आहे. यावेळी गुजरात निवडणूक देशाच्या राजकारणासाठी एक लिटमस टेस्ट मानली जातेय. देशाच्या राजकारणात ‘गुजरात मॉडेल’चा आदर्श मांडणाऱया नरेंद्र मोदींची प्रतिष्ठा तेथे पणाला लागली आहे. याचमुळे गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी भाजप नेतृत्वाने पूर्ण जोर लावला आहे.

नरेंद्र मोदी 13 वर्षे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी होते. त्यांच्यानंतर आनंदीबेन पटेल्। विजय रुपाणी यांना ही जबाबदारी मिळाली. जीएसटी लागू केल्यावर होणारी ही निवडणूक मोदी सरकारची सर्वात मोठी अग्निपरीक्षा मानली जाते. गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा भाजपला विजय मिळवून देण्यास मोदींना यश मिळाले तर पुढील सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा विजय रोखण्यास विरोधकांना यश येणार नाही असे मानले जाते.