|Thursday, November 21, 2019
You are here: Home » क्रिडा » व्हिन्स, स्टोनमन यांची अर्धशतके

व्हिन्स, स्टोनमन यांची अर्धशतके 

वृत्तसंस्था /ब्रिस्बेन :

ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने संथ सुरुवात केली असून पहिल्या दिवशी त्यांनी 4 बाद 196 धावा जमविल्या. ऍशेसमध्ये पदार्पण करणारा जेम्स व्हिन्स पहिल्याच सामन्यात शतकाच्या समीप पोहोचला होता. पण लियॉनने त्याला 83 धावांवर धावचीत करून त्याचे हुकवले आणि ऑस्ट्रेलियाने सामन्यावर थोडीशी पकड मिळविली. आणखी एक ऍशेस पदार्पणवीर मार्क स्टोनमननेही अर्धशतक झळकवले. खराब हवामान व अंधुक प्रकाश यामुळे सामना 80.3 षटकांचा खेळ झाल्यानंतर थांबविण्यात आला.

मार्क स्टोनमन व व्हिन्स यांनी शानदार अर्धशतके झळकावत 125 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱयाची धार बोथट केली. गब्बाच्या संथ खेळपट्टीवर अखेरच्या सत्रात सीमर पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलियाला पुन्हा पकड मिळवून दिली. त्याने स्टोनमला चहापानाआधीच्या शेवटच्या षटकात 53 (159 चेंडूत 3 चौकार) धावांवर बाद केले. चहापानानंतर परतल्यावर त्याने इंग्लंडचा कर्णधार जो रूटला केवळ 15 धावांवर पायचीत केले. त्यामुळे मोईन अली व डेविड मालान यांना आणखी पडझड होणार नाही याची दक्षता घ्यावी लागली. मोईन 13 व मालान 28 (64 चेंडूत 6 चौकार) धावांवर दिवसअखेरीस खेळत होते. कमिन्सने 2 तर स्टार्कने एक बळी मिळविला.

व्हिन्सचे शतक हुकले

लियॉनने अप्रतिम क्षेत्ररक्षण करून व्हिन्सला ऍशेसमधील पहिल्या शतकापासून रोखण्यात यश मिळविले. हॅजलवुडच्या गोलंदाजीवर अनावश्यक धाव घेण्याचा प्रयत्न करताना लियॉनच्या थेट फेकीवर तो धावचीत झाला. सुमार तासांच्या खेळांत त्याने 170 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 83 धावा केल्या. रूटने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण अनुभवी ऍलेस्टर कूक दुसऱयाच षटकात 2 धावा काढून बाद झाल्याने इंग्लंडची चांगली सुरुवात होऊ शकली नाही. मात्र स्टोनमन व व्हिन्स यांनी डाव सावरणारी अर्धशतके झळकावत सव्वाशे धावांची भागीदारी करून संघाला सुस्थिती प्राप्त करून दिली. चहापानाआधीच्या शेवटच्या षटकात व्हिन्सचे धावचीत होणे कलाटणी देणारे ठरले.  रूटने 50 चेंडू खेळत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कमिन्सच्या गोलंदाजीवर तो पायचीत झाला. मैदानी पंच मरायस इरासमुस यांनी त्याला नाबाद ठरविले होते. पण ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने ‘रिक्हय़ू’ मागितल्यानंतर रिप्लेमध्ये तो बाद असल्याचे स्पष्ट झाले.

Related posts: