|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अधीक्षक शिंदे, उपाधीक्षक काळे यांची उचलबांगडी

अधीक्षक शिंदे, उपाधीक्षक काळे यांची उचलबांगडी 

प्रतिनिधी /सांगली :

  वाटमारीच्या गुन्हय़ाखाली अटक केलेल्या अनिकेत कोथळे या युवकाच्या खून
प्रकरणानंतर सांगलीत पोलिसांच्या विरोधाचे रान उठले. त्यामुळे शासनाने पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि या प्रकरणी संशयाच्या भोवऱयात सापडलेल्या शहर उपाधीक्षक दीपाली काळे यांची गुरुवारी उचलबांगडी केली. कोल्हापूर येथे कार्यरत असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून गुरुवारीच सांगलीत दाखल झाले.

नांदेड येथील देगलूर उपविभागाचे उपाधीक्षक अशोक वीरकर यांची शहर उपाधिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. तर दत्तात्रय शिंदे यांची नागपूरला तर डॉ. काळे यांची सोलापूर शहरला बदली झाली आहे. अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या असल्या तरी त्यांच्यावर कारवाईसाठी सर्वपक्षीय कृती समितीने 25 रोजीचा मोर्चा होणारच असा निर्धार जाहीर केला आहे.

  अनिकेत कोथळे या 26 वर्षीय युवकाला सांगली शहर पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक युवराज कामटे याने थर्ड डिग्री लावली. त्यामध्ये अनिकेतचा मृत्यू झाला. अनिकेतचा मृतदेह पोलिसांनी आंबोली घाटात नेऊन जाळला. अनिकेतचा मृत्यू आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केलेला गंभीर गुन्हा यामुळे समाजात तीव्र भावना उमटल्या होत्या. कामटे आणि टोळीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शहर उपअधीक्षक काळे यांना सहआरोपी करा आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची बदली करा, या मागण्यांसाठी सांगलीत तीव्र
प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर आंदोलनेही सुरू आहेत. सर्वपक्षीय कृती समितीने शनिवार 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजनही केले आहे.

 त्याच दिवशी म्हणजे शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सांगली दौऱयावर आहेत. त्यामुळे दोघांच्या बदलीचा निर्णय शासन पातळीवर तत्काळ होईल अशी चर्चा सुरू होती. अधीक्षक दत्तात्रय शिंदे बुधवारीच रजेवर गेले आहेत. अप्पर अधीक्षक शशीकांत बोराटे यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळीच सुहेल शर्मा यांनी बोराटे यांच्याकडून पदभार स्विकारला.

Related posts: