|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » लंकेचा 205 धावांत धुव्वा

लंकेचा 205 धावांत धुव्वा 

वृत्तसंस्था /नागपूर :

कर्णधार विराट कोहलीचा चार गोलंदाज खेळविण्याचा निर्णय सार्थ ठरविताना भारतीय गोलंदाजांनी दुसऱया कसोटीच्या पहिल्या दिवशी लंकेला केवळ 205 धावांत गुंडाळले. अश्विनने चार तर जडेजा व इशांत शर्मा यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविले. लंकेतर्फे कर्णधार दिनेश चंडिमल व दिमुथ करुणारत्ने यांनी अर्धशतके झळकवली. त्यानंतर दिवसअखेर भारताने पहिल्या डावात 1 बाद 11 धावा जमविल्या.

स्पोर्टिंग खेळपट्टीवर भीतिदायक वाटावे असे काहीही नसताना लंकन फलंदाजांना फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा तसेच पुनरागमन करणारा इशांत शर्मा यांच्या भेदक माऱयासमोर दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना टिकाव धरता आला नाही. अश्विनने 67 धावांत 4 बळी मिळवित आपल्या 54 व्या कसोटीत बळींची संख्या 296 वर नेऊन ठेवली. तीनशे बळींचा टप्पा गाठण्यासाठी त्याला या सामन्यातील आणखी एक डाव तसेच दिल्लीतील शेवटची कसोटी खेळावयास मिळणार आहे. तसे झाल्यास ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिलीचा 56 कसोटीत जलद त्रिशतकी मजल मारण्याच्या विक्रमाला तो मागे टाकेल.

लंकेची स्थिती एकवेळ 4 बाद 160 अशी समाधानकारक होती. शेवटच्या सत्रात ते प्रतिकार करून मोठी मजल मारतील असे वाटत होते. पण भारताच्या भेदक माऱयासमोर त्यांचा डाव कोलमडला आणि उर्वरित सहा फलंदाजांनी केवळ 45 धावांची भर घातल्याने त्यांचा पहिला डाव 205 धावांत आटोपला. विशेष म्हणजे लंकेचे सहा फलंदाज सरळ चेंडूवर बाद झाले. जामठाच्या खेळपट्टीवर बऱयापैकी बाऊन्स होता व चेंडू किंचित उसळत होता. पण त्यात भीतिदायक असे काहीही नव्हते. तरीही त्यांच्या फलंदाजांनी पहिल्या सत्रात अतिसावध धोरण अवलंबले होते. दुसऱया व तिसऱया सत्रात दीर्घकाळ खेळण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव त्यांना नडला. फक्त करुणारत्ने व कर्णधार चंडिमल यांनी भारतीय माऱयाला चांगला प्रतिकार केला. दोन जीवदाने लाभलेल्या करुणारत्नेने 147 चेंडूत 6 चौकारांसह 51 तर चंडिमलने 122 चेंडूत 4 चौकार, एका षटकाराच्या मदतीने 57 धावा केल्या. करुणारत्नेचा एक झेल सोडण्यात आला तर त्याला यष्टिचीत करणारा चेंडू नोबॉल होता.