|Monday, August 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » स्वप्निल जोशी बनला मालिकेचा निर्माता

स्वप्निल जोशी बनला मालिकेचा निर्माता 

बदलत्या काळात बदलत्या नातेसंबंधांची कहाणी सांगणारी नवी मालिका नकळत सारे घडले 27 नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरू होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशीने या मालिकेद्वारे निर्मितीमध्ये पदार्पण केले आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी 7.30 वाजता पहायला मिळणार आहे.

‘नकळत सारे घडले’ या मालिकेत गोष्ट आहे मुलीची… जी एका छोटय़ा मुलीची प्रेमळ, काळजी घेणारी सावत्र आई होते. त्याबरोबरच या मालिकेला काही वेगळे पदरही आहेत. कोल्हापुरात राहणाऱया आणि वेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबाची ही गोष्ट आहे. ही आजच्या मॉडर्न काळातली रंजक गोष्ट आहे. उत्तम कथानक असलेल्या या मालिकेत उत्तम स्टारकास्टही आहे. हरीश दुधाडे, नुपूर परूळेकर, बाल कलाकार सानवी रत्नालीकर, अनुराधा राजाध्यक्ष, उमेश दामले, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची, प्राची पिसाट, यांच्या भूमिका आहेत. अभिजित गुरू यांनी मालिकेची कथा, पटकथा लिहिली आहे. अभिजित पेंढारकर संवादलेखन करत आहेत. तर, अवधूत पुरोहित दिग्दर्शन करत आहेत. मालिकेचं टायटल साँग नीलेश उजल या नव्या दमाच्या गीतकाराचं असून, टायटल साँगचं संगीत नीलेश मोहरीर यांचं आहे.

मालिकेविषयी निर्माता स्वप्नील जोशी म्हणाला, या मालिकेत नात्यांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याचा हा एक अप्रतिम प्रयत्न आहे. या मालिकेत नाटय़ आहे, भावभावना आहेत, खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत म्हणूनच या मालिकेसाठी मी खूप उत्सुक आहे. स्टार प्रवाहच्या देवयानी, पुढचं पाऊल अशा काही मालिका म्हणजे मराठी टेलिव्हिजनवरचे बेंचमार्क आहेत. निर्माता म्हणून मला खात्री आहे की नकळत सारे घडले ही आमची मालिका स्टार प्रवाहच्या आजवरच्या लौकिकाला साजेशी ठरेल. मालिका सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियामध्ये या मालिकेचे प्रोमो आणि टायटल साँग लोकप्रिय झालं आहे.