|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » धर्मनिरपेक्ष पक्षांचा काँग्रेसला ‘मुक्तहस्त’

धर्मनिरपेक्ष पक्षांचा काँग्रेसला ‘मुक्तहस्त’ 

2014 ची लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजप एका मागोमाग एक राज्यांची राजकीय लढाई जिंकून विरोधकांना सळो की पळो करून सोडत आहे. भाजपच्या या विजयरथामुळे प्रादेशिक राजकीय पक्षांच्या हातातून सत्ता निसटत चालली आहे. आता लढाई गुजरातची असून तेथे प्रादेशिक पक्षांची वेगळी रणनीति दिसून येत आहे. गुजरातमध्ये नरेंद्र मोदींना पराभूत करून दाखविण्याची सर्व जबाबदारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खांद्यावर आहे. गुजरातच्या राजकीय युद्धात भाजपला मात देण्यासाठी कथित धर्मनिरपेक्ष पक्षांनी काँग्रेसला मुक्तहस्त दिल्याचे मानले जाते.

2012 च्या निवडणुकीची आकडेवारी

गुजरातच्या 2012 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यास राज्याच्या 182 मतदारसंघांपैकी 115 ठिकाणी भाजपने विजय मिळविला होता. तर काँग्रेस 61, राष्ट्रवादी काँग्रेस 2, गुजरात परिवर्तन पक्ष 2, संजद आणि अपक्षाने 1 मतदारसंघात विजय प्राप्त केला होता. 2017 च्या निवडणुकी संग्रामात काँग्रेसला राष्ट्रवादी आणि संजदच्या शरद यादव गटाचे समर्थन मिळाले आहे.

लालू-पवार-अजित सिंग काँग्रेससोबत

गुजरातमध्ये काँग्रेसने शरद यादव गटाला 3 जागा सोडल्या. तर राष्ट्रवादीला 7-8 जागा देण्याचे मान्य केल्याचे समजते. समाजवादी पक्षाने निवडक मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. तर लालूप्रसाद यादव यांच्या राजदने काँग्रेसला समर्थन देत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसला पाठिंबा देत रालोदने देखील निवडणुकीतून अंग काढून घेतले.

काँग्रेसचा खेळ बिघडविणारे घटक

गुजरातमध्ये भाजपचा विजय आणि काँग्रेसच्या पराभवाचे एक मोठे कारण प्रादेशिक पक्ष निवडणुकीत उतरणे हे मानले जाते. 2012 विधानसभा निवडणुकीच्या मैदानात 6 राष्ट्रीय पक्ष आणि 34 प्रादेशिक पक्ष सहभागी झाले होते. यातील केवळ 5 पक्षांनी विजयाचा स्वाद चाखला. उर्वरित पक्षांना अनामत देखील वाचविता आली नाही. परंतु हे प्रादेशिक पक्ष मते विभाजित करण्यास यशस्वी ठरल्याने काँग्रेसचा पराभव निश्चित व्हायचा.

वॉकओव्हरचे गणित

यावेळी गुजरातमध्ये सपने काँग्रेसला वॉकओव्हर दिला. अखिलेश यादवचा समाजवादी पक्ष केवळ 5 ठिकाणी निवडणूक लढविणार आहे. तर 2012 मध्ये समाजवादी पक्षाने 60 उमेदवार उभे केले होते. याचप्रकारे काँग्रेससोबत आघाडी करणारा शरद यादव गट 3 जागा लढवेल. 2012 मध्ये संजदने 60 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने गतवेळी 12 उमेदवार उभे करत काँग्रेससमोरील आव्हान वाढविले होते. परंतु यावेळी केवळ 7 जागा लढविण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखविली. चौधरी अजित सिंग यांचा राष्ट्रीय लोकदलाने देखील काँग्रेसला मदत व्हावी याकरता निवडणूक न लढविण्याची घोषणा केली.

काँग्रेसच्या वाटेत ‘बसपचा अडथळा’

काँग्रेसच्या वाटेत बहुजन समाज पक्षाने मात्र अडथळा निर्माण केला आहे. बसपने गुजरातच्या 182 मतदारसंघांमध्ये पूर्ण शक्तिनिशी उतरण्याची घोषणा केली.  बसप मागील तीन निवडणुकांपासून स्वतःचे सामर्थ्य जोखून पाहत आहे. परंतु आतापर्यंत या पक्षाला तेथे फारसे यश मिळू शकलेले नाही. बसप सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याने काँग्रेसला फटका बसू शकतो. परंतु काँग्रेसने दलित नेता जिग्नेश मेवानीचे समर्थन मिळवून दलित मतांवरील पकड कायम राखली आहे.