|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हदियाने शिक्षण पूर्ण करावे !

हदियाने शिक्षण पूर्ण करावे ! 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गेल्या वर्षभरापासून गाजत असलेल्या केरळमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील धर्मांतरीत युवती हदिया हिने प्रथम आपले होमिओपॅथी शिक्षण पूर्ण करावे, असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तिचे धर्मांतर, लग्न आणि त्यासंबंधातील दावे प्रतिदावे, यांच्यावर नंतर सविस्तर विचार केला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी 2018 च्या तिसऱया आठवडय़ात निर्धारित करण्यात आली आहे.

हदिया ऊर्फ अखिला या हिंदू तरुणीचा विवाह शफीन जहान या मुस्लीम युवकाशी झाला होता. मात्र केरळ उच्च न्यायालयाने तो रद्द ठरविला होता. केरळ उच्च न्यायालयाच्या या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे हा विवाह आजही रद्द अवस्थेतच आहे, असे हदियाच्या वडिलांच्या वकिलांनी स्पष्ट केले. त्यांनी या अंतरिम आदेशावर समाधान व्यक्त केले.

हदियाचा जबाब नोंदविला

सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये हदियाचा जबाब नोंदवला. धर्मांतरासाठी कोणताही दबाव नसल्याचे सांगताना आपले स्वातंत्र्य अबाधित रहावे, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. आपली पुढे शिकण्याची इच्छा आहे. यासाठी राज्य शासनाची कोणतीही मदत मिळाली नाहीतरी चालेल, असे तिने न्यायालयाने विचारणा केल्यावर सांगितले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील 3 सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

शिक्षणाची अनुमती

हदियाच्या मागणीनुसार सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी तिला तामिळनाडूतील सालेम येथील शिवराज महाविद्यालयात पुढील शिक्षण घेण्यास परवानगी दिली आहे. ती पूर्वी याच महाविद्यालयात होती. तिला पुन्हा प्रवेश द्यावा. तसेच तिचे पालकत्व या महाविद्यालयाच्या प्रमुखांनी (डीन) स्वीकारावे. तिला वसतीगृहात सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तिच्या सुरक्षेची जबाबदारी तामिळनाडू सरकारने घ्यावी. तिच्या वसतिगृहाच्या आसपास बिनगणवेशातील महिला पोलीस असावेत अशा अनेक सूचना न्यायालयाने केल्या.

पतीच्या बाजूने कपिल सिब्बल

शफीन जहान याच्यावतीने बाजू मांडताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व वकील कपिल सिब्बल यांनी हदियाची स्वतःची बाजू ऐकून घेतली जात नसल्याचे म्हटले आहे. केवळ विविध माध्यमातून येत असलेल्या वृत्तावरच विश्वास ठेवला जात असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने हदियाची बाजू ऐकून घ्यावी. केवळ 100 पानांचा अहवाल दिला म्हणून एनआयएचेच म्हणणे ऐकून घेऊ नये, असा युक्तीवाद केला.

पार्श्वभूमी

होमिओपॅथी शिक्षण घेणाऱया अखिला अशोकन नामक 22 वर्षांच्या तरुणीने 2 वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला. तिचे नाव हदिया असे बदलण्यात आले. त्यानंतर गेल्या डिसेंबरमध्ये तिचे शफीन जहान नामक मुस्लीम युवकाशी लग्न झाले. तिच्यावर धर्मांतराची सक्ती करण्यात आली आहे. तसेच तिच्यावर धर्मांधतेचा पगडा लादण्यात आला आहे. तिचा विवाहही सक्तीने लावण्यात आला आहे, असा आरोप तिचे वडील अशोकन यांनी केला. त्यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका सादर केली. उच्च न्यायालयाने तिचा विवाह हा लव्ह जिहाद आहे असा निष्कर्ष काढून तो रद्द ठरविला. तिचा ताबा तिच्या आईवडिलांना देण्यात आला. तिच्या पतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून याच याचिकेवर सुनावणी सुरू आहे.