|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रियकरासह पत्नीनेच केला खून

प्रियकरासह पत्नीनेच केला खून 

गडहिंग्लजमधील शिक्षकाच्या खुनाचे रहस्य उलगडले : मुंबईत दोघेही सापडले जाळय़ात

प्रतिनिधी / सावंतवाडी:

कोल्हापूर जिल्हय़ातील गडहिंग्लज भडगाव येथील माध्यमिक शिक्षक विजयकुमार आप्पया गुरव यांच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात अखेर सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. सिंधुदुर्गातील आंबोली येथे गेळे कावळेसादच्या दरीत विजयकुमार यांचा मृतदेह टाकण्यात आला होता. धक्कादायक बाब म्हणजे विजयकुमार यांचा खून त्यांची पत्नी जयलक्ष्मी (36) हिनेच प्रियकर सुरेश आप्पया चोथे (34) याच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जयलक्ष्मी व तिचा प्रियकर सुरेश चोथे या दोघांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या (सावंतवाडी) पोलिसांनी मुंबई येथे परेल रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी सायंकाळी सापळा रचून ताब्यात घेतले. या दोघांनीही विजयकुमार यांच्या खुनाची कबुली दिली आहे. अनैतिक संबंधातून हा खून केल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान या दोघांनाही येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जयलक्ष्मी व सुरेश चोथे या दोघांना मोबाईल लोकेशनच्या आधारे पकडण्यात आले. आंबोलीतील कावळेसाद दरीत खून करून टाकण्यात आलेला मृतदेह विजयकुमार गुरव यांचाच असल्याचे डी. एन. ए. चाचणीत स्पष्ट झाले आहे. पुणे येथील प्रादेशिक न्याय सहाय्यक प्रयोगशाळेत तसा अहवालही देण्यात आला आहे. डी. एन. ए. साठी विजयकुमार यांचा मुलगा अनुप याचे वैद्यकीय नमुने घेण्यात आले होते.

आंबोलीतील गेळे कावळेसादच्या फूटपाथवर 10 नोव्हेंबर रोजी पर्यटकांना रक्ताचे डाग आढळले होते. यासंदर्भात एका पर्यटकाने गेळे येथील पोलीस पाटील दशरथ कदम यांना माहिती दिली. कदम यांनी रक्ताबाबत खात्री करून या संदर्भात आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार विश्वास सावंत यांना कल्पना दिली. त्यानंतर आंबोली आपत्कालीन पथक आणि सांगेलीचे बाबल आल्मेडा पथक यांच्या पथकाने दरीत उतरून शोध घेतला असता कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळय़ात सापडलेली दोरी, मृतदेहावरील जखमा, सापडलेला लोखंडी रॉड व त्यावर असलेले रक्ताचे डाग यामुळे कुणीतरी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कावळेसाद दरीत आणून हा मृतदेह टाकला असावा, अशा निष्कर्षाप्रत पोलीस येऊन त्यांनी या संदर्भात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान यासंदर्भात वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध होताच गडहिंग्लजहून बेपत्ता झालेले भडगाव येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचे नातेवाईक सिंधुदुर्गात दाखल झाले. गुरव यांचा मुलगा अभिषेक याने हातातील दोरा आणि पायाची नखे, बोटे आणि अंगातील बनियनवरून मृतदेह ओळखला. मृतदेह वडिलांचाच असल्याचे त्याने सांगितले. गुरव यांच्या नातेवाईकांनी या संदर्भात घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यानंतर सावंतवाडीचे सहाय्यक निरीक्षक अरुण जाधव यांनी भडगाव गडहिंग्लज येथे जाऊन तपास केला. जाबजबाबही घेतले. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी तपास स्थानिक गुन्हा अन्वेक्षण विभागाकडे दिला.

गुरव यांची पत्नी संशयाच्या भोवऱयात

विजयकुमार हे 6 नोव्हेंबरला रात्री घरातून बाहेर पडले होते. त्यांना कुणीतरी फोन करून बोलावून घेतले होते. परंतु ती व्यक्ती कोण, याबाबत कुणालाच काही कल्पना नव्हती. मात्र रात्री अचानक गायब होण्याने संशय बळावला होता. नातेवाईकांनी यासंदर्भात एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता. त्यातून विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी संशयाच्या भोवऱयात सापडली होती. पोलिसांनीही त्यादृष्टीने तपास सुरु केला होता. याच दरम्यान 21 नोव्हेंबर रोजी शौचाला जातो, असे सांगून जयलक्ष्मी घरातून बाहेर पडली, ती परत आलीच नाही. त्यांच्या अचानक गायब होण्याने त्यांच्यावरील संशयाला अधिक पुष्टी मिळाली. त्यातून विजयकुमार यांच्या खुनाचे रहस्य उलगडत गेले. विजयकुमार  यांच्या घराजवळ सुरेश कोथे राहतो. विजयकुमार यांचा मृतदेह मिळाल्याच्या दुसऱया दिवशीपासून तोही गायब होता. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला.

दोघांच्याही मुसक्या आवळल्या

संशयित सुरेश चोथे गावातून गायब झाल्यानंतर तो दिल्ली, गुजराथ येथे गेला होता. त्याचे लोकेशन बदलत होते. त्यामुळे पोलिसांना त्याला अटक करण्यात अडचण येत होती. दरम्यान गुरव यांची पत्नी जयलक्ष्मीही बेपत्ता झाली. पोलीस तिच्या मागावर होते. चौथे याच्या मोबाईल लोकेशनवरून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि सावंतवाडी पोलिसांनी मुंबईत परेल रेल्वे स्टेशन परिसरात या दोघांना सापळा रचून ताब्यात घेतले. 

खून कुठे केला? मृतदेह कसा हलविला?

न्यायालयात तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी सांगितले की, संशयितांनी अनैतिक संबंधातून गुरव यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. आंबोली कावळेसाद पॉईंट येथील खोल दरीत मिळलेला मृतदेह हा गुरव यांचा असल्याचे डीएनए चाचणीत स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा गुरव यांची पत्नी व सुरेश याच्यावर संशय होता. या दोघांना मुंबईत परेल येथे अटक करण्यात आली. गुरव यांचा खून कुठे केला?, कोणत्या हत्याराचा वापर केला?, मृतदेह आंबोलीत कसा आणला? याचा तपास करायचा आहे. गुन्हय़ासाठी वापरलेले वाहन, सीमकार्ड, कपडे जप्त करण्यात आले आहेत. खून नेमका कोणत्या कारणासाठी केला, याचा तपास करून मयताच्या अंगावरील चीज वस्तू, रोख रक्कम कुठे काढून ठेवली, खून करून दोघे कुठे गेले, कोणाकडे राहिले, या गुन्हय़ात आणखी कोणाचा सहभाग होता, याचा तपास करण्यासाठी दोन्ही संशयितांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली.

सरकारी वकील नूरजहॉन दलाल यांनी या गुन्हय़ाचा  सखोल तपास व्हावा, खून नेमका कशासाठी केला, याचा तपास करण्यासाठी संशयितांना पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. यावेळी न्यायालयात उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांच्यासह पोलीस मोठय़ा संख्येने हजर होते.

गुरव यांचा घरीच खून केल्याचा संशय

विजयकुमार माध्यमिक शिक्षक होते. त्यांचा पत्नी जयलक्ष्मी हिने प्रियकर सुरेश चोथे याच्या मदतीने खून गेला. गुरव यांच्या घरीच या दोघांनी संगनमताने खून करून त्यांचा मृतदेह गेळे कावळेसाद पॉईंट येथे टाकला असल्याचा पोलिसांचा अंदाज असून यादृष्टीने आता पोलीस तपास करीत आहेत. सध्याच्या परिस्थितीत जयलक्ष्मी व तिचा प्रियकर सुरेश याने खुनाची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरेश चौथे याचा पोल्ट्री व्यवसाय होता. तो सध्या बंद आहे. त्याच्यावर बारा लाख रुपयांचे कर्जही आहे.