|Saturday, January 25, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नराधमांना फाशी!

नराधमांना फाशी! 

अहमदनगर जिल्हय़ातील अल्पवयीन मुलीवर कट रचून लैंगिक अत्याचार करून खून केल्याच्या आरोपात अखेर आरोपी जितेंद्र शिंदे,  संतोष भवाळ आणि नितीन भैमुले या तीनही नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली आहे. योग्य दिशेने झालेला तपास, परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी, साक्षीदार ठाम राहिले आणि सरकारी वकिलांनी अत्यंत प्रभावीपणे या सर्वाची संगतवारी लावत न्यायालयाला हे प्रकरण ‘रेअरेस्ट रेअर’ असल्याचे पटवून दिले. कट रचून अत्याचार व खुनाच्या अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून तिनही आरोपींना देण्याची फाशीची शिक्षा देण्याची सरकारी पक्षाची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून न्यायालयाला कठोर होऊन फाशीच्या शिक्षेसारखा निर्णय द्यावा लागतो. याशिवाय असा निकाल आपल्या हातून पुन्हा लिहायला लागू नये या अपेक्षेसह पेनची नीफ मोडण्याची एका प्रथा आहे. त्यानुसार न्यायालयाने नीफ मोडलेही असेल. मात्र खरोखरच या निकालानंतर तरी अशा घटना थांबणार आहेत का? हा प्रश्नच आहे. दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतरही पुन्हा अशा घटना घडू नयेत अशी अपेक्षा देशभरातून व्यक्त करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने त्यानंतरही घटना वाढतच राहिल्या. कोपर्डीच्या घटनेचा विचार केला तर या घटनेने पेटून उठून महाराष्ट्रात एक मोठा सामाजिक लढा उभा राहिला होता. सरकारवर मोठा दबावही निर्माण झाला होता. मराठा समाजाचे लाखोच्या संख्येने जमलेले स्त्री, पुरूष, मुली, अबालवृध्दांचे मोर्चे राज्याच्या प्रत्येक जिल्हय़ातून निघाले. त्यामुळे या निकालाला एक गंभीर सामाजिक पैलुही आहे हे नाकारताच येणार नाही. त्यामुळे नराधमांना फाशी झाल्यानंतर राज्यभरातील कोटय़वधी लोकांकडून त्या निकालाचे स्वागत होणे अपेक्षितच आहे. पण, म्हणून ही सगळी जनता आता असा अत्याचार पुन्हा कोठेच घडू नये म्हणून आपापल्या भागात रस्त्यावर उतरेल असाही होत नाही. ही एक घटना एका मोठय़ा आंदोलनाचे कारण बनली असली तरी त्या-त्या काळातील सामाजिक परिस्थितीचे परिणाम किंवा पडसाद उमटत असतात तसेच ते कोपर्डी प्रकरणात उमटले असे म्हणावे लागेल. कारण या एक वर्ष चार महिन्यांच्या काळात महाराष्ट्रभरात अशा शेकडो केसीस नोंदवल्या गेल्या असतील. मात्र सर्वांनाच याप्रमाणे न्याय मिळेल असेही नाही. याचा अर्थ एकाच प्रकारच्या दोन घटनांमध्ये समान न्याय मिळेल याची खात्री देता येणार नाही हे तर स्पष्टच आहे. कारण, घडलेल्या घटनेकडे पोलीस, समाज, धोरणकर्ते, शासनकर्ते, समाजधुरिण, न्यायालयीन यंत्रणा कोणत्या दृष्टीकोनातून पाहते आणि त्याचे पडसाद कसे उमटतात यावरही निकालाची तीव्रता ठरू शकते असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. तरीही कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाने महाराष्ट्रातील प्रत्येक सहृदयी नागरिक आश्वस्त होईल आणि स्वागत करेल हे मात्र निश्चितच. या खटल्याच्या दरम्यान विख्यात कायदेतज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक दाखले दिले. कोपर्डीची घटना ही देखील इंदिरा गांधी यांच्या हत्येप्रमाणे रेअरेस्ट रेअर आहे. त्यातील आरोपी केहरसिंग यालाही नंतर अटक करण्यात आली होती. त्याच प्रमाणे संतोष भोवळलाही नंतर अटक झाली. त्यानेही खून केला नसला तरी कट रचण्यात त्याचा सहभाग होता हे सिध्द झाले असल्याने रेअरेस्ट रेअर केस मानून उर्वरित दोन्ही आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. त्याच मागणीच्या पुष्टय़र्थ अफजलगुरू प्रकरणातही कट रचल्याच्या आरोपाखाली फाशी झाल्याचे निकम यांनी निदर्शनास आणून दिले होते. अहमदनगर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने ऐकलेले ऍड. निकम यांचे आणखी एक विधान फार महत्वाचे आहे. मनुष्य खोटे बोलू शकतो मात्र परिस्थिती खोटे बोलू शकत नाही. क्रूरकर्मा आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने हे कृत्य केले. त्यांना दयामाया दाखवली जाऊ नये ही त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. विनयभंग प्रकरणी तीन वर्षे, बलात्कार प्रकरणी जन्मठेप आणि हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा न्यायालयाने दिलेली आहे. 15 जुलै 2016 ते 29 नोव्हेंबर 2017 या काळात महाराष्ट्र ढवळून निघाला, उकळून निघाला आणि त्यातून निर्माण झालेले रसायन म्हणून हा अत्यंत महत्वाचा निकाल बाहेर आला असे म्हणावे लागेल. लोकांचा न्यायावर विश्वास वाढावा म्हणून असे निकाल लागणे हे अत्यंत महत्वाचे असते. त्याशिवाय माणुसकीला काळीमा फासणाऱयांच्या उरात धडकी भरत नाही. मात्र या निकालाचे स्वागत करतानाच अंतःकरणाला पीळ पाडणाऱया कोपर्डीसारख्याच आणखीही काही घटनांचे निकाल योग्य रितीने लागले नाहीत याचे दुःखही महाराष्ट्राला झालेच पाहिजे. खैरलांजीतील आरोपींना दशकभरानंतरही खरी शिक्षा झालेली नाही हे याच महाराष्ट्रातील जळजळीत सत्य आहे. महाराष्ट्राला हे कधीही विसरला येणार नाही. त्या परिवारातील वाचलेला अखेरचा व्यक्तीही न्यायाची आस ठेवूनच या जगाचा निरोप घेऊन गेला आहे. कोपर्डीच्या निकालाचे स्वागत करण्यासाठी वक्तव्य करणाऱया सर्वच पक्षातील नेत्यांनी खैरलांजी प्रकरणी आपण इतका जलद न्याय देऊ शकलो नाही याबद्दल निदान यानंतर तरी खेद व्यक्त केलाच पाहिजे. अहमदनगर जिल्हय़ातीलच दुसरी एक घटना खर्डा येथील नितीन आगे या युवकाच्या खुनाची. त्याला आरोपींनी वर्गातून बाहेर नेऊन खून केला आणि मृतदेह झाडाला टांगला. मात्र या प्रकरणातील सर्व 26 साक्षीदार फितुर झाले आणि सर्व आरोपी निर्दोष मुक्त झाले. न्यायाचा तराजू परिस्थितीजन्य हतबलतेने ढळला हेही ढळढळीत वास्तव आहे आणि उज्ज्वल निकम म्हणतात तसे मनुष्य खोटे बोलतो, परिस्थिती कधीही खोटे बोलत नाही. न्यायास विलंब आणि न्यायास नकार या सुध्दा त्या-त्या काळाच्या राजकीय, सामाजिक स्थितीचे फळ असतील तर हे सुध्दा वाईटच आहे हे सहृदयी महाराष्ट्राने आणि न्यायव्यवस्थेनेही जाणले पाहिजे.

Related posts: