|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » क्रिडा » 2018रशिया विश्वचषकाचा मुख्य ड्रॉ उद्या

2018रशिया विश्वचषकाचा मुख्य ड्रॉ उद्या 

वृत्तसंस्था/ मॉस्को

पुढील वर्षात होणाऱया मॉस्को विश्वचषक स्पर्धेसाठी उद्या (शुक्रवार दि. 1) मुख्य ड्रॉ काढला जाणार आहे. या स्पर्धेत 32 संघांनी संघर्षमय वाटचालीनंतर विविध गटातून आपली पात्रता निश्चित केली असून रशियाचा संघ यजमान या नात्याने सहभागी होईल.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, येथील स्टेट क्रेमलिन पॅलेस येथे मुख्य ड्रॉ काढला जाणार असून त्यात माजी इंग्लिश फॉरवर्ड खेळाडू गॅरी लिनेकर व रशियन क्रीडा माध्यम प्रतिनिधी मारिया कोमान्दया मुख्य निमंत्रित असणार आहेत. यापैकी गॅरी लिनेकरने फिफावर भ्रष्टाचाराने कलंकित असल्याचा सातत्याने ठपका ठेवला असून त्यामुळे गॅरीला फिफाने निमंत्रित करणे सर्वांसाठीच आश्चर्याचे ठरले आहे. गॅरी 1986 विश्वचषकात गोल्डन बूट पुरस्काराचा मानकरी ठरला होता. त्यामुळे, त्याला हा सन्मान बहाल केला असल्याची शक्यता अधिक आहे.

स्पर्धेसाठी पात्रता निश्चित केलेल्या 32 संघांचे एकूण 8 गट तयार केले जाणार असून त्यात प्रत्येकी 4 संघांचा सहभाग असेल. त्यानुसार, प्रत्येक गटातील समीकरणे कशी असतील, याबद्दलचे प्राथमिक चित्र या ड्रॉमध्ये स्पष्ट होईल. सध्या ड्रॉ साठी 4 पॉट्स असून पहिल्या पॉटमध्ये यजमान रशियासह जर्मनी, ब्राझील, पोर्तुगाल, अर्जेन्टिना, बेल्जियम, पोलंड, फ्रान्स, दुसऱया पॉटमध्ये स्पेन, पेरु, स्वित्झर्लंड, इंग्लंड, कोलंबिया, मेक्सिको, उरुग्वे, क्रोएशिया यांचा समावेश असेल.

याशिवाय, तिसऱया पॉटमध्ये डेन्मार्क, आयलंड, कोस्टारिका, स्वीडन, टय़ुनिशिया, इजिप्त, सेनेगल, इराण तर चौथ्या पॉटमध्ये सर्बिया, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, जपान, मोरोक्को, पनामा, दक्षिण आफ्रिका व सौदी अरेबियाचा समावेश असणार आहे. यजमान या नात्याने रशियासह विद्यमान विजेते जर्मनी, ब्राझील, पोर्तुगाल, अर्जेन्टिना, बेल्जियम, पोलंड व फ्रान्स हे संघ ड्रॉमधील सर्वोच्च मानांकित संघ असणार आहेत.

ड्रॉसाठी आयोजित शानदार सोहळय़ात फ्रान्सचा लॉरेन्ट ब्लँक, इंग्लंडचा गॉर्डन बँक्स, ब्राझीलचा काफू, इटलीचा फॅबिओ कॅनाव्हारो, उरुग्वेचा दिएगो फोरलॅन, अर्जेन्टिनाचा दिएगो माराडोना, स्पेनचा कार्लोस प्युयोल व रशियाचा निकिता सिमोन्यान यांचीही यावेळी उपस्थिती असणार असल्याचे फिफाने जाहीर केले आहे. पहिल्या गटात यजमान या नात्याने रशियाला अव्वलस्थान बहाल केले जाणार असून त्यानंतर ड्रॉनुसार प्रत्येक गटातील संघ निश्चित होणार आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, पुढील वर्षात दि. 14 जून रोजी या स्पर्धेची शानदार सुरुवात होईल व दि. 15 जुलै रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

Related posts: