|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आगामी निवडणुकीत भाजपा-शिवसेना एकत्रची शक्यता कमी

आगामी निवडणुकीत भाजपा-शिवसेना एकत्रची शक्यता कमी 

प्रतिनिधी /सांगली :

 गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदानात वाढ होईल. पण भाजपाच्या जागा 116 वरून 125 पर्यंत वाढतील, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेलाबरोबर घेईल की नाही हे सांगता येत नाही. पण, आरपीआय भाजपासोबतच असेल. आरपीआय भाजपा युतीचे राज्यात 30 खासदार निवडून येतील असा दावाही त्यांनी केला.

  लिंगायत समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह मराठा समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. जाट आणि पटेल यांच्या आरक्षणाला आपला विरोध नाही. एस.स्सी.एस.टी. यांचे आरक्षण कायम राखून आरक्षण देण्याची भूमिका आपण सुरूवातीपासूनच घेतली आहे. एनडीएच्या बैठकीतही आपण ही सूचना केली आहे.लवकरच त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही मंत्री आठवले यांनी सांगिले. शासकीय विश्रामधाम येथे मंत्री आठवले यांनी गुरूवारी सकाळी विविध शासकीय खात्यांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हापारिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, विशेष समाजकल्याण अधिकारी सचिन कवले, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी  राधाकिसन देवडे, माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर आदी यावेळी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, गेल्या सव्वातीन वर्षांच्या काळात आपल्या केंद्रीय समाजिक व न्याय मंत्रालयामार्फत देशातील आठ लाखांहून अधिक अपंगांना सव्वातीनशे कोटी रूपयांचे साहित्य वापट केले आहे. मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती दोन टप्प्यात देण्याचा आपला विचार आहे. त्याचबरोबर महागाईच्या तुलनेत शिष्यवृत्तीत वाढ करण्याचाही विचार सुरू आहे. येत्या चार डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांशी याबाबत आपली बैठक आयोजित करण्यात आली असल्याचेही आठवले यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागामार्फत वार्षिक साठ हजार मदत करण्यात येणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली.

Related posts: