|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » धावशिरे शाळेला अखेर पूर्णवेळ शिक्षिका मिळाली

धावशिरे शाळेला अखेर पूर्णवेळ शिक्षिका मिळाली 

वार्ताहर /उसगांव :

पूर्णवेळ शिक्षिकेची नेमणूक करण्यात आल्याने गेले दोन दिवस वर्गावर बहिष्कार घालून शाळेबाहेर ठाण मांडून बसलेले धावशिरे तिस्क उसगाव प्राथमिक शाळेचे विद्यार्थी व पालकांनी काल गुरुवारी बहिष्कार मागे घेतला. शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी स्वत: या शाळेला भेट देऊन शिक्षिकेची नेमणूक केल्याने विद्यार्थी पुन्हा वर्गात दाखल झाले आहेत.

संचालक गजानन भट यांनी एका पूर्णवेळ शिक्षिकेची धावशिरे शाळेत नियुक्ती  केल्याचे नियुक्तपत्र पालकांसमोर ठेवल्याने पालकांनीही शिक्षण खात्याचे आभार मानत समाधान व्यक्त केले. याच शाळेतील अन्य एक बीएलओ प्रशिक्षणासाठी गेली असून येत्या दोन दिवसात ती शाळेत रुजू होणार आहे. रजेवर गेलेली शिक्षिका 9 डिसें. रोजी कामावर येतील. काल नियुक्त केलेली एक शिक्षिका व दोन पॅरा शिक्षक असे मिळून एकूण पाच शिक्षकांची नियुक्ती झाल्याने पालकांनी समाधान मानून पुकारलेले आंदोलन मागे घेतले.

मराठी राजभाषा समिती व गोमंतक मराठी अकादमीचा पाठिंबा

मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गो. रा. ढवळीकर व गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर तसेच सदस्य मधुसूदन देसाई यांनी वर्गावर बहिष्कार घातलेल्या विद्यार्थी व पालकांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनाना आपला पाठिंबा दर्शविला. शिक्षण खात्याच्या वेळकाढू धोरणाचा त्यांनी निषेध केला. ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून सरकारकडून मराठी भाषेचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप गो. रा. ढवळीकर यांनी केला. भावीपिढीचा भवितव्यावर अशा प्रकारे परिणाम का करता असा सवालही त्यांनी केला. शिक्षण खात्यामार्फत जारी केली जाणारी परिपत्रके व आदेश मराठी भाषेतूनही काढले जावेत, अशी मागणी गो. रा. ढवळीकर यांनी शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांच्याकडे केली.

Related posts: