|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून महिला ठार

उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून महिला ठार 

वार्ताहर/ मणेराजुरी

मणेराजूरी-सांगली रस्त्यावर मणेराजुरी उसाने भरलेल्या ट्रक्टरच्या ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून मोटारसायकलवरील चंद्रकला हरीदास पाटील (रा. कवलापूर ता. मिरज) ही महिला जागीच ठार झाली, तर 11 महिन्याचा पियूष हा छोटा मुलगा आश्चर्यरित्या बचावला. अपघातानंतर ट्रक्टर चालकाने पळ काढला ही घटना दुपारी अडीचच्या दरम्यान घडली.

याबाबतची माहिती अशी, कवलापूर ता. मिरज येथील हरीदास धोंडीराम पाटील आपल्या मोटारसायकल क्र. एम.एच. 10 व्ही 6196 वरुन मणेराजूरी येथील आपले मेहुणे विश्वास अर्जुन जमदाडे यांचेकडे पत्नी व लान मुलासह येत होते, ते मणेराजुरी सांगली या मुख्य रस्त्यावर गुजरमळा मार्गे येत असताना, त्यावेळी या रस्त्य़ावरुन उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या भरुन (ट्रक्टर क्र. एम.एच. 10 4604) हा निघाला होता, त्यावेळी या टॅक्टरच्या सर्वात मागील ट्रॉलीला या मोटारसायकलची धडक बसली यामध्ये चंद्रकला पाटील व लहान मुलगा पियुष हे ट्रॉलीच्या चाकाखाली आले. अंगावरुन चाक गेल्याने चंद्रकला पाटील या जागच ठार झाल्या, तर पियुषला वडिलांनी प्रसंगावधान ओळखून बाहेर खेचल्याने तो बचावला ही घटना ट्रक्टर चालकाला लवकर समजलीच नाही. नागरिक ओरडल्याने त्याने ट्रक्टर थांबवून पळ काढला.

या घटनेने भांबवलेल्या हरीदास पाटीलांना एकच धक्का बसला. मयत चंद्रकला ही मणेराजुरीची माहेरवाशीण होती. विश्वास जमदाडे यांची बहीण होती. वडिलांना पाहण्यासाठी त्या कवलापूरहून मणेराजुरीला येत होत्या. या घटनेची माहिती मिळताच युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष खंडू पवार, पंचायत समिती सदस्य जमदाडे, सरपंच सदाशीव कलढोणे यांनी धाव घेऊन मयत व जखमींना तातडीने तासगावला हलवून मदत केली. या घटनेची तासगाव पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.

आमदार सुमनताईंची भेट

या अपघाताचे वृत्त समाजताच अंजनीहून तातडीने येऊन आमदार सुमनताई पाटील यांनी भेट देऊन पाटील व जमदाडे कुटुंबीयांना आधार दिला.

पोलिसांचा हलगर्जीपणा

दुपारी अडीचला अपघात घडून देखील तब्बल दीड दोन तासाने तासगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. आमदार घटनास्थळी आल्या. परंतु पोलिसांचा पत्ता नव्हता, त्यातच 4 वाजता मृतदेह तासगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. परंतु शवविच्छेदन करण्याआगोदर मृतदेहाची महिला पोलिसांच्याकडून योग्य त्या तपासणी करणे आवश्यक ठरते. परंतु पुन्हा तब्बल दीड तास महिला पोलीसच उपलब्ध नसल्याने, मृतदेह शवविच्छेदनासाठी अटकळा थांबला होता. पोलिसांच्या या असंवेदनशीलतेमुळे नातेवाईकांचा संताप अनावर झाला होता. त्यामुळे तासगाव पोलिसांचा कारभार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related posts: