|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत लिंगायत समाजाचा एल्गार

सांगलीत लिंगायत समाजाचा एल्गार 

स्वतंत्र धर्मासह विविध मागण्यांसाठी वज्रमूठ  :  ‘एक लिंगायत, कोटी लिंगायत’ची गर्जना : शहर भगवेमय : शिस्तबद्धतेचे दर्शन

प्रतिनिधी/ सांगली

‘एक लिंगायत, कोटी लिंगायत’ची गर्जना करत स्वतंत्र धर्मासह विविध मागण्यांसाठी सांगलीसह चार जिल्हे आणि उत्तर कर्नाटकातील लिंगायत समाजाने सांगलीत महामोर्चाने एल्गार केला. शांतताप्रिय असलेल्या लिंगायत समाजातील विविध जाती, पोटजाती यांच्यासह महिला, वकील, डॉक्टर यांनी एकीची वज्रमूठ आवळली. मराठा क्रांती मोर्चानंतर सांगलीत पुन्हा एकदा भगवे वादळ पाहायला मिळाले. वयाची शंभरी पार केलेले राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (अहमदपूरकर) यांनी या महामोर्चाचे नेतृत्व पेले. लाखोंची संख्या असूनही महामोर्चा अत्यंत शिस्तबद्ध पार पडला.

अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या वतीने स्वतंत्र धर्मास मान्यता, अल्पसंख्याक दर्जा मिळावा, पोटजातींना ओबीसी आरक्षण †िमळावे यासह अन्य मागण्यांसाठी महामोर्चाची हाक देण्यात आली होती. राष्ट्रसंत डॉ. †िशवलिंग शिवाचार्य महाराज, चन्नबसव पट्टदेरु महाराज, कोरणेश्वर महास्वामीजी, जगद्गुरु बसवप्रभू स्वामिजी, बसवकुमार स्वामिजी, रुद्रपशुपती विजयकुमार कोळेकर महाराज यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अवघा समाज एकवटला

समन्वय समितीच्या हाकेला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील बेळगाव, विजापूर येथील अवघा लिंगायत समाज रस्त्यावर उतरला होता. रविवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच सांगलीसह, कोल्हापूर, सातारा, सोलापूर  व पुणे या जिह्यासह कर्नाटकातील बेळगाव व विजापूर येथून मोठय़ा संख्येने समाज बांधव सांगलीत दाखल होत होते. लिंगायत समाजबांधवांच्या गर्दीने मोर्चाच्या मार्ग फुलून गेला होता. महामोर्चासाठी विश्रामबाग चौकात भव्य असे बसवव्यासपीठ उभा करण्यात आले होते. त्यामुळे बसवपीठाकडे जाण्यासाठी मोर्चेकऱयांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. मोर्चेकऱयांचे जथ्थेच्या जथ्थे बसवपीठीच्या †िदशेने जात होते.

महिला व तरुणांचा सहभाग लक्षणीय

मोर्चेकऱयांच्यामध्ये महिला, युवती व तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. लहान मुलेही मोठय़ा इर्षेने या महामोर्चात सहभागी झाली होती. हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या परिधान करुन तरुण, तरुणी मोर्चामध्ये सहभागी झाले होते. अनेकांच्या हातात विविध मागण्यांचे फलक होते. यामुळे संपूर्ण सांगली शहर भगवेमय झाले होते. ‘भारत देशा-जय बसव देशा’, ‘जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते.

जिल्हाधिकाऱयांना निवेदन

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (अहमदपूरकर) यांच्या नेतृत्वात व अन्य जगद्गूरू, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता महामोर्चाला सुरवात झाली. विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्यानंतर समाजातील अकरा महिलांच्या हस्ते लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माची मान्यता, अल्पसंख्याक दर्जा तसेच पोटजातींना ओबीसी आरक्षण मिळावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना देण्यात आले.

विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांची उपस्थिती

लिंगायत समाजाच्या या महामोर्चाला सर्व पक्षीय, संघटनांच्या नेत्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुमनताई पाटील, शिवसेनेचे शिरोळ मतदार संघाचे आमदार उल्हास पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीकदादा पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी आ. नितीन शिंदे, सावकार मदनाईक, पै. पृथ्वीराज पवार, जिल्हापरिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सुषमा नायकवडी, आरोग्य सभापती तम्मणगौडा रवी, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यप्रवक्ते महेश खराडे, नगरसेवक राजेश नाईक, किशोर जामदार, संजय मेंढे, संतोष पाटील, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, माजी महापौर सुरेश पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.

 मुस्लीम समाजाची सामाजिक बांधिलकी

लिंगायत समाजाच्या मोर्चास सर्व पक्ष व संघटनांनी पाठींबा दिला होता. मुस्लीम समाजही यामध्ये पाठीमागे राहीला नाही. मराठा क्रांती मोर्चाला मुस्लीम समाजाने पिण्याच्या पाण्याची सोय करत आदर्श निर्माण केला होता. लिंगायत मोर्चातही मुस्लिम समाजाने समाजिक बांधिलकी जपत मोर्चेकऱयांना केळी चे वाटप करत त्यांची भूख भागविण्याचे मोलाचे काम केले. यावेळी शेरु सौदागर, करीम मिस्त्री, लालू मिस्त्री व मुस्लीम बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

चोख पोलीस बंदोबस्त

महामोर्चासाठी लाखो समाज बांधव रस्त्यावर उतरल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चौका-चौकात तसेच बसवपीठाच्या जवळ मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. बसवपीठाच्या शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवरुन पोलीस मोर्चाची टेहळणी करीत होते. पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह शहर विभागाचे उपविभागीय अधिकारी धीरज पाटील, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप पोमण स्वतः महामोर्चावर लक्ष ठेवून होते.

हजारो स्वयंसेवक राबले

महामोर्चासाठी दिवसभरात हजारो स्वयंसेवक राबत होते. भर उन्हात आंदोलनासाठी आलेल्या वयोवृध्द समाज बांधवांची काळजी घेण्यापासून मोर्चा शांततेत व शिस्तीत पार पाडण्यामध्ये स्वयंसेवकांनी मोठी भूमिका बजावली. महामोर्चा झाल्यानंतर रस्त्यांवर पडलेले पाण्याचे पाऊच व कचरा स्वयंमसेवकांनी तात्काळ साफ केला. यामुळे महामोर्चाला लाखो लोक येऊनही कुठेही घाण निर्माण झाली नाही.

Related posts: