|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » घंटागाडी चालकांचा ठेका रद्द

घंटागाडी चालकांचा ठेका रद्द 

प्रतिनिधी/ सातारा

शहरातून कचरा गोळा करणाऱया घंटागाडी चालकांनी शनिवारपासून बेमुदत बंद केल्याची घोषणा करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे दोन दिवस शहरवासियाची गैरसोय झाल्याचा ठपका ठेवत पालिका प्रशासनाने रविवारी सर्व घंटागाडी चालकाचे जुने ठेके रद्द करण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला. दरम्यान, तात्पुरती सोय म्हणून चार ट्रक्टर आणि टिपरद्वारे कचरा उचलला जात आहे. तसेच यांना आडकाठी आणण्याचा प्रयत्नही झाल्यामुळे कचरा डेपोच्या ठिकाणी मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती वसंत लेवे, नगरसेवक विशाल जाधव यांनी तेथे जावून पाहणी केली. दरम्यान, पोलिसांना निवेदन दिले आहे. चुकीचे कृत्य केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिला आहे.

घंटागाडीचा प्रश्न चिघळला

  घंटागाडी चालकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे रविवारी सकाळीच सोनगाव कचरा डेपोच्या ठिकाणी वातावरण तंग झाले होते. घंटागाडी चालकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काहींनी मध्यस्थी केल्यानंतर हे वातावरण निवळले. ही माहिती लगेच आरोग्य सभापती वसंत लेवे, मुख्याधिकारी शंकर गोरे यांना मिळाली. त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीणकुमार जाधव यांची भेट घेवून त्यांना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये अशा आशयाचे निवेदन दिले. तसेच सोनगाव कचरा डेपोची पाहणी केली. मात्र, यामुळे आता घंटागाडीचा प्रश्न चिघळला आहे.

कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा

  सातारा पालिकेने 2014 पासून घंटागाडीचा ठेका ठेकेदारांना दिला आहे. गेल्या दीड वर्षापासून त्यामध्ये रिनिव्हेशन केले आहे. काही घंटागाडय़ा चांगलं काम करतात. तर काही घंटागाडय़ा कामच करत नाहीत. त्यामुळे भारत सरकारने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानात अडथळे येत आहेत. त्यामुळे नव्याने घंटागाडीचा ठेका काढला आहे. त्याच अनुषंगाने सर्व घंटागाडी ठेकदारांची बैठक होवूनही त्यांनी अचानक बंद केले आहे. कालपासून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही घंटागाडी ठेका रद्द केला. पर्यायी व्यवस्था केली आहे. चालकमालकांनी कसलीही नोटीस न देता अनाधिकृत बंद  केला आहे.

आडमुठी भूमिका पालिका सहन करणार नाही

पालिकेच्या घंटागाडय़ा कचरा डेपोत न सोडण्याचे प्रकार होत असल्याने तालुका पोलिसांना विनंतीवजा पत्र देवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, अशी मागणी केली आहे. जर घंटागाडी चालकांनी समस्या मांडल्या असत्या तर पालिका आजही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे. रविवारपासून आडमुठी भूमिका घेतल्याने आता पालिका सहन करणार नाही. त्यांनी ऐकल नाही तर कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दिला आहे.

नागरिकांना वेठीस धरल्याने ठेका रद्द

नगरपालिकेच्या गाडय़ा येतात त्या येवू नये म्हणून त्यासाठी कंपाऊडला कुलूप घातलं होते. त्यांनी घालू नये, गोंधळ होवू नये म्हणून पोलिसांना पत्र दिले. पर्यायी व्यवस्था आम्ही केली आहे तसेच आम्ही त्यांना शहराच्या जनतेला वेठीस धरु नका, अशी विनंतीही केली होती. तसेच त्यांच्या पोटावर पाय देण्याची आमची मानसिकता नाही. चांगल्या पद्धतीने काम करा, असेही सांगितले होते. परंतु त्यांनी पूर्वकल्पना दिली नाही. दोन दिवस नागरिकांना वेठीस धरल्याने आम्ही ठेका रद्द केला आहे, असे आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी सांगितले.

Related posts: