|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लाखो रुपये खर्चुन उभारलेला व्यवसाय एका रात्रीत उद्ध्वस्थ

लाखो रुपये खर्चुन उभारलेला व्यवसाय एका रात्रीत उद्ध्वस्थ 

प्रतिनिधी/ पेडणे

ओखी वादळामुळे मोरजी, मांद्रे हरमल तसेच केरी किनारी भागातील शॅक व त्यातील लाकडी सामान समुद्राने गिळंकृत केले. मंगळवारी तिसऱया दिवशीही परिस्थिती जैसे थे होती. ही स्थिती पाहिल्यावर मन सुन्न होत होते. लाखो रुपये खर्च करून थाटलेला व्यवसाय निसर्गाने एका रात्रीत उद्ध्वस्थ केला, अशा प्रतिक्रिया मोरजी समुद्र किनाऱयावरील व्यावसायिकांतून व्यक्त होत होत्या.

रविवारी मध्यरात्री समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने किनारी भागात असलेल्या शॅक व रेस्टॉरंटमध्ये पाणी शिरले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. किनारी भागातील सर्व शॅक समुद्राने गिळंकृत केले. वीज उपकरणे निकामी झाली. काही वाचविलेले सामान किनाऱयापसून दूर मिळेल त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. परंतु तिसऱया दिवशी मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा एकदा व्यावसायिकांची तारांबळ उडाली. जे काही वाचविलेले सामान होते तेही भिजून गेले. हे सामान झाकून ठेवण्यासाठी व्यावसायिकांची धावाधाव होताना दिसत होती.

प्रत्येकाचे किमान अडीच लाखाचे नुकसान

या भागातील सात शॅक वाहून गेले. त्यामुळे प्रत्येकाचे किमान अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आता नव्याने व्यवसाय थाटायचा तर परत सामानाची जुळवा जुळव करण्यासाठी लाखो रुपये खर्च येणार आहे. स्ट्रेचर उभारण्यासाठी कामगार मिळणेही कठीण होणार आहे, अशी प्रतिक्रिया येथील व्यावसायिक नंदकिशोर मोरजे यांनी व्यक्त केली.

परत व्यवसाय उभारताना अनेक अडचणी येणार

जे व्यावसायिक किनारी भागात कायदेशीर व्यवसाय करतात त्यांनाच सरकार सतावण्याचा प्रयत्न करीत असते. केरी येथील सर्व सहाही शॅक वाहून केले. केवळ स्ट्रेचर उभे आहेत. परत व्यवसाय उभारताना अनेक अडचणी येणार आहेत. त्या दूर करण्यासाठी सरकारने उपाययोजन करावी, असे व्यावसायिक विलास आरोलकर म्हणाले.

महासंकट येऊनही प्रशासन सुस्त

हरमल किनाऱयावरील व्यावसायिकांवर महासंकट येऊनही प्रशासन सुस्त आहे. अजूनर्यंत मदतीचा हात पुढे केलेला नाही. या किनाऱयावर सर्व व्यवसाय धोक्यात आला आहे. पर्यटकही सध्या येण्यास तयार नाहीत. सरकारने लवकरात लवकर आर्थिक मदत करावी, अशी मागणी हरमल येथील व्यावसायिक प्रमेश मयेकर यांनी केली आहे.