|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ग्रामसेवकांचा अपहार साडेपाच कोटींवर

ग्रामसेवकांचा अपहार साडेपाच कोटींवर 

अपहाराची 284 प्रकरणे : कमी पटसंख्येच्या 153 शाळा बंद करणार, स्थायी समितीचा विरोध

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ग्रामपंचायतीमधून होणारा आर्थिक अपहार वाढतच चालला असून एकूण 284 प्रकरणांमध्ये तब्बल साडेपाच कोटी रुपयाचा संशयित आर्थिक अपहार झाला आहे, अशी माहिती जि. प. च्या स्थायी समितीच्या सभेत उघड झाली. या अपहारप्रकरणी संबंधित ग्रामसेवकांवर कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.

जिल्हय़ात कमी पटसंख्या असलेल्या 153 शाळा बंद करण्यात येणार आहेत, अशीही माहिती सभेत देण्यात आली. मात्र, कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करून स्थलांतरित करत असाल तर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सुविधा निर्माण करा आणि वर्ग तेवढे शिक्षक द्या. अन्यथा शाळाबंद करून स्थलांतरास विरोध राहील. याबाबत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गटनेते सतीश सावंत यांनी दिला.

जि. प. च्या स्थायी समितीची सभा अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष रणजीत देसाई, वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर,  शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, गटनेते सतीश सावंत, समिती सदस्य संजय पडते, अमरसेन सावंत, राजेंद्र म्हापसेकर, अंकुश जाधव, विष्णूदास कुबल, समिती सचिव सुनील रेडकर, खातेप्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 साडेपाच कोटीचा अपहार

जिल्हय़ातील काही ठराविक ग्रामसेवक पुन:पुन्हा आर्थिक अपहार करत आहेत. अशा ग्रामसेवकांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना पदोन्नती देऊ नयेत. मोठय़ा ग्रामपंचायती त्यांच्याकडे देऊ नये, अशी सूचना गटनेते सतीश सावंत यांनी केली. याचवेळी अपहार केलेल्या ग्रामसेवकांची यादी तयार करण्यात येत असून सद्यस्थितीत ग्रामपंचायतींमधून 284 प्रकरणात 5 कोटी 50 लाख रुपयांचा संशयित अपहार झाल्याची माहिती कमलाकर रणदिवे यांनी दिली. संबंधित ग्रामसेवकांवर वसुलीच्या कारवाईच्या नोटिसा बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 153 शाळा बंद करणार

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्या शाळेतील मुले गावच्या मुख्य शाळेत स्थलांतरित करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार कमी पटसंख्या असलेल्या जिल्हय़ातील 153 शाळा बंद होणार आहेत, अशी माहिती
प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांनी सभागृहात देताच शाळा बंद करण्यास विरोध करण्यात आला. जिल्हय़ातील कमी पटसंख्येच्या शाळा जर कमी करत असाल तर प्रथम विद्यार्थ्यांना मुख्य शाळांमध्ये येण्या-जाण्यासाठी वाहतुकीची सुविधा निर्माण करावी. कारण सिंधुदुर्ग हा दुर्गम जिल्हा असून दूरवरून विद्यार्थी येतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच वर्ग तेवढे शिक्षक दिले पाहिजेत. तरच मुलांच्या स्थलांतरणास संमती दिली जाईल. अन्यथा विरोधच राहील. त्यासाठी आंदोलनही छेडले जाईल, असा इशारा सतीश सावंत यांनी दिला.

उंदीर मारण्याची योजना हास्यास्पद!

लेप्टोच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उंदीर मारण्याची योजना जाहीर केली. परंतु अशी योजना राबविल्यास त्याचे काय परिणाम होतील, याचा विचार त्यांनी केलेला नाही. लेप्टो हा केवळ उंदरामुळेच होतो, असे नाही हे पालकमंत्र्यांना माहिती नसल्याची बाब हास्यास्पद असल्याची टीका सतीश सावंत यांनी केली. तर जिल्हय़ात लेप्टोच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी 20 डॉक्टरांचे पथक जिल्हय़ात पाठविले. परंतु त्यातील काही डॉक्टरांकडून जनतेला चांगली सेवा मिळाली नाही. उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अशा डॉक्टरांची चौकशी करून कारवाई करावी, अशी सूचना आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांनी केली.

अधिकाऱयांच्या अनुपस्थितीबाबत नाराजी

स्थायी समितीच्या सभेला माध्यमिक शिक्षणाधिकाऱयांसह काही अधिकारी अनुपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त करत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱयांना सभेला बोलवावे, अशा सूचना करण्यात आल्या. अधिकाऱयांच्या तारखा बघूनच सभा ठरवाव्यात, असा उपरोधिक टोलाही लगावला. पिंगुळी जि. प. मतदारसंघात विकास कामांची भूमिपूजने करतांना स्थानिक जि. प. सदस्य व पं. स. सदस्यांना डावलले गेले, याकडे संजय पडते यांनी लक्ष वेधले. त्यावर कुठल्याही जि. प. मतदारसंघात कार्यक्रम घेतांना स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रित करावे, अशा सूचना अध्यक्षा सावंत यांनी प्रशासनाला दिल्या.