|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तीन गोष्टींमुळे यश सहज साध्य!

तीन गोष्टींमुळे यश सहज साध्य! 

जादूगार सुहानीने विद्यार्थ्यांना दिल्या यशस्वी जीवनाच्या टीप्स

 

कणकवली:

‘कॉन्फिडन्स’, ‘कॉन्सन्ट्रेशन’ आणि ‘हार्डवर्क’ या तीन गोष्टी आचरणात आणलात तर आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्ही साध्य करू शकता. एखादा चित्रपट अथवा गाणे तुम्ही काही मिनिटे पाहता आणि ते तुमच्या ध्यानात रहाते अथवा पाठ होते. याचे कारण तुमचे तेथे कॉन्सन्ट्रेशन असते. अशीच एकाग्रता तुम्ही अभ्यासात अथवा तुमच्या आवडत्या क्षेत्रात केली, तर तुम्हाला यश मिळू शकते. फक्त स्वत:मधील आत्मविश्वास जागृत करा, असे आवाहन जादूगार सुहानी शहा हिने कणकवली येथे केले.

जादूगार सुहानी हिने गुरुवारी वरवडे येथील आयडियल इंग्लिश स्कूल आणि विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनात यश प्राप्त करण्यासाठीच्या ‘टीप्स’ दिल्या. सुहानीच्या व्याख्यानामुळे मुले अक्षरश: मंत्रमुग्ध झाली. सुहानी म्हणाली, आपण चित्रपटगृहात असताना एखादा फोन आल्यास फोन उचलत नाही अथवा उचललाच तर ‘बिझी आहोत’, असे सांगून फोन ठेवतो. तेच अभ्यास करताना एखादा फोन आल्यास गप्पा मारतो. त्यावेळी बिझी असण्याचे कारण सांगत नाहीत. याचे कारण आपण अभ्यासाला फार महत्त्व देत नाही अथवा तेथे एकाग्रता करीत नाहीत. म्हणूनच कोणतेही काम करताना आत्मविश्वासाने व एकाग्रतेने करा. मी लहानपणी पालकांकडे जादू करण्याचा हट्ट केला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र वारंवार हट्ट धरल्यानंतर त्यांनी मला परवानगी दिली आणि आज मी त्या क्षेत्रात प्राविण्यही मिळविले. अशाचप्रकारे एखादी गोष्ट करायची तर त्यासाठी मेहनत करा.

आपल्याच वाटय़ाला दु:ख, समस्या का येतात? आपल्याचबाबतीत असे का घडते? असे प्रश्न कोणाकोणाला पडतात? असा सवाल केल्यावर बहुतांश मुलांनी हात वर केले. त्यावेळी बहुतेक मुलांना हा प्रश्न पडतो. म्हणजे समस्या, प्रश्न सर्वांनाच पडतात. फक्त ते आपण स्वत:लाच दोष देत बसतो. त्यामुळे आलेल्या समस्यांवर मात करायला शिका, असा सल्ला सुहानीने दिला.

आयडियल स्कूल येथे ज्ञानदा शिक्षण संस्थेचे सीईओ डी. पी. तानावडे, प्राचार्या गीतांजली कुलकर्णी, उपप्राचार्या अर्चना देसाई आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रियांका सिंग यांनी केले. विद्यामंदिर हायस्कूल येथे मुख्याध्यापक एच. एस. खोत यांनी सुहानीचे स्वागत केले. यावेळी अच्युत वणवे, श्री. सिंगनाथ, प्रसाद राणे, श्री. मुंडले आदी उपस्थित होते.