|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » द. आफ्रिकेत मालिका जिंकण्याची भारताला नामी संधी

द. आफ्रिकेत मालिका जिंकण्याची भारताला नामी संधी 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील प्रचंड गुणवत्ता पाहिली तर हा संघ पुढील महिन्यातील दक्षिण आफ्रिका दौऱयात सहज मालिकाविजय प्राप्त करु शकेल, असा विश्वास माजी भारतीय कर्णधार व 19 वर्षाखालील संघाचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केला. भारतीय संघ दि. 5 जानेवारीपासून खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकन भूमीत खेळेल. सध्या लंकेविरुद्ध मालिकेत वनडे व टी-20 लढती झाल्यानंतर भारतीय संघ पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार, लगोलग दक्षिण आफ्रिका दौऱयावर रवाना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, द्रविड वृत्तसंस्थेशी बोलत होता.

कसोटी क्रिकेटमध्ये सलग 9 मालिकाविजय संपादन केले असल्याने भारतीय संघ अर्थातच उत्तम बहरात आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यानंतर केवळ एकाच सराव सामन्यानंतर त्यांना पहिल्यावहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरावे लागेल, हे स्पष्ट आहे. ‘सध्याच्या संघातील गुणवत्ता पाहता, दक्षिण आफ्रिकेला नमवण्याची आपल्याला उत्तम संधी असेल. आपल्या संघात दर्जेदार जलद गोलंदाज आहेत. शिवाय, हार्दिक पंडय़ासारखा अष्टपैलू खेळाडूही उपलब्ध आहे. याशिवाय, आवश्यकता भासल्यास जडेजा व अश्विनसारखे दर्जेदार फिरकीपटूही असतील. सध्याच्या संघातील बहुतांशी फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेत खेळण्याचा सराव असून त्यांच्या गाठीशी 40 ते 50 कसोटी सामन्यांचा अनुभवही आहे’, असे द्रविड याप्रसंगी म्हणाला.

दैवही पाठीशी हवे

‘दक्षिण आफ्रिकेत खेळताना काही प्रमाणात दैवही पाठीशी असावे लागते. ते लाभले तर आपल्या संघाला निश्चितच विजयाची आशा असेल’, असे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले. भारतीय संघ चॅम्पियन्स चषकानंतर सातत्याने भरगच्च क्रिकेट खेळत असून कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता अन्य एकाही भारतीय खेळाडूने सलग क्रिकेटवर अजिबात तक्रार नोंदवलेली नाही. अर्थात, याच भरगच्च क्रिकेटमुळे दक्षिण आफ्रिकेला रवाना होत असताना भारतीय संघाचा पुरेसा सराव झालेला नसेल, हे देखील तितकेच स्पष्ट आहे. सध्या सुरु असलेली लंकेविरुद्धची मालिका दि. 24 डिसेंबर रोजी संपत असून त्यानंतर काहीच दिवसांच्या अंतराने भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडे रवाना व्हावे लागेल, हे ही सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

Related posts: