|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » आशियाई एअरगन स्पर्धेत भारताला 5 पदके

आशियाई एअरगन स्पर्धेत भारताला 5 पदके 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येथील 10 व्या आशियाई एअरगन नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये भारताने पहिल्याच दिवशी 5 पदकांसह शानदार सुरुवात केली. ऑलिम्पिक कांस्यजेता गगन नारंग मात्र पदकप्राप्तीपासून दूरच राहिला. जपानमधील वाको शहरात ही स्पर्धा सुरु आहे.

दिवसातील पहिल्या टप्प्यात रवी कुमारने पुरुषांच्या 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये कांस्यपदकाची कमाई केली तर अर्जुन बबूटाने कॉरस्पाँडिंग कनिष्ठ पुरुषांच्या गटात रौप्य मिळवले. याशिवाय, तिन्ही एअर रायफल इव्हेंट्समध्ये भारताने तीन सांघिक रौप्यपदकाची कमाई केली. टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धा देखील याच शुटिंग रेंजवर होईल, हे देखील महत्त्वाचे ठरु शकते.

पुरुषांच्या 10 मीटर्स एअर रायफलच्या इव्हेंटमध्ये रवी कुमारने 627.5 अंकाची कमाई केली. 60 शॉट्सच्या फेरीनंतर 8 पैकी चौथ्या स्थानासह अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. एकवेळ तो 624.6 अंकांसह सहाव्या स्थानी देखील होता. गगन नारंग 624.5 च्या शॉटसह सातवे स्थान संपादन करत अंतिम फेरीत पोहोचला. पण, फायनलमध्ये रवी कुमारने चांगलीच बाजी मारली. चीनच्या साँग बुहानला त्याने उत्तम लढत दिली. 24 शॉट्सच्या या फायनलमध्ये दहाव्या शॉटनंतर रवी कुमारला उत्तम सूर सापडला. साँगने उत्तम आव्हान निर्माण केले. शिवाय, त्याचाच राष्ट्रीय सहकारी काओ यिफेई देखील बहरात होता. अंतिमतः साँगने 250.2 च्या शॉटसह सुवर्ण, काओने 248.6 गुणांसह रौप्य तर रवीने 225.7 अंकांसह कांस्यपदकाची कमाई केली.

वास्तविक, यापूर्वी रवी कुमारला मागील सलग तीन आंतरराष्ट्रीय आयएसएसएफ फायनल्समधून पदकाशिवायच परतावे लागले होते. पण, इथे त्याने पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला. कनिष्ठ पुरुषांच्या 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये अर्जुन बाबुटाने रौप्यपदकाची कमाई केली. चीनचा रायझिंग स्टार युकून लिऊने या गटात सुवर्ण मिळवले. अंतिम फेरीत अर्जुनचे सुवर्ण केवळ 0.01 अंकांनी हुकले, ते महत्त्वाचे ठरले. या इव्हेंटमधील आणखी एक भारतीय नेमबाज तेजस कृष्णा प्रसादला सातव्या स्थानासह बाहेरचा रस्ता धरावा लागला. पण, या जोडीने नंतर सुनमून सिंग ब्रारच्या साथीने सांघिक रौप्यपदकाची कमाई केली. त्यांनी 1867.5 अंकांसह दुसरे स्थान प्राप्त केले.

महिलांच्या 10 मीटर्स एअर रायफल इव्हेंटमध्ये अंजुम मौदगिल, मेघना सज्जनार यांनी अनुक्रमे 417.5 व 415.9 अंकांसह दुसरे व चौथे स्थान संपादन केले. शर्यतीतील तिसरी भारतीय नेमबाज पूजा घाटकरने 413.6 अंक मिळवले. पण, तिला 11 व्या स्थानी समाधान मानावे लागले. नंतर अंजूमला अगदी किंचीत फरकाने पदकापासून वंचित राहावे लागले. तिसऱया स्थानसाठी झालेल्या शूटऑफ लढतीत सिंगापूरच्या तॅन क्वियान क्झिऊ ऍडेलेने तिच्याविरुद्ध बाजी मारली. अंतिम फेरीत अंजूमने 207.6 अंक तर मेघना सज्जनारने 163.4 अंक मिळवले. सांघिक गटात त्यांनी 1247 अंकांसह रौप्य मिळवले. चीन या गटात सुवर्णजेता ठरला.

Related posts: