|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणका येथे इंडियन ओव्हरसीज बँकेवर भरदिवसा दरोडा

काणका येथे इंडियन ओव्हरसीज बँकेवर भरदिवसा दरोडा 

रोख रकमेसह 16 लाखाचा ऐवज लांबविला,  तिघे दरोडेखोर पसार,स्थानिकांनी पकडले दोघा दरोडेखोरांना

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापसा-कळंगूट रस्त्याच्या बाजूला काणका-आबासवाडा येथील इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये 5 बंधुकधारी दरोडेखोरांनी घुसून 16 लाख रुपये पळविले. यामध्ये कॅश काऊंटरमधील 11 लाख, एटीएममधील 4 लाख तसेच बँकेत उपस्थित असलेल्या ग्राहकांचे 1 लाख रुपये तसेच कॅशिअरची एक अंगटी, त्याला त्याच्या मदतीला आलेल्या ग्राहकाची सोनसाखळी घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. पळताना त्यांनी आपल्या बचावासाठी हवेत गोळीबार केला. मात्र स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवित सुमारे एक किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यांच्यापैकी दोघांना पकडले. ही घटना काल शुक्रवारी सायंकाळी 4.25 वाजण्याच्या दरम्यान घडली.

शुक्रवारी सायंकाळी या दरोडय़ावेळी झालेल्या झटापटीत बँक व्यवस्थापक, कॅशिअर व एक महिला कर्मचारी जखमी झाली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो, अशी प्रतिक्रिया बँक अधिकाऱयांनी दिली. या दरोडय़ामुळे पोलीसही भांबावून गेले आहेत. तसेच या भागातही भीतीचे वातावरण पसरले आहे. काही स्थानिकांनी आपला जीव धोक्यात घालून तिघा दरोडेखोरांना पकडले. मात्र स्थानिकांच्या हातातून सुटून दोघांनी पळ काढला.

कॅशिअर पैसे मोजतानाच पडला दरोडा

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी 4.20 वा. च्या दरम्यान बँक अधिकारीवर्ग बँकेत होते. त्यावेळी बाजूच्या एका कार्यालयातील पंढरीनाथ पोळे, माधूरी देशपांडे व संदीप सरमळकर हे बँकेत पैसे भरण्यासाठी आले होते. कॅशिअर गोविंद दामू नार्वेकर हे कॅश काऊंटरमध्ये पैसे मोजत होते. त्यावेळी अचानक चारजण बँकेत घुसले. त्यांनी शटर बंद करून थेट बँक व्यवस्थापक व कॅश काऊंटरमध्ये जात नार्वेकर यांच्या डोक्याला बंदूक लावून धरत काऊंटरमधील 11 लाख रुपये घेतले. तसेच जाताना नार्वेकर यांच्या बोटातील अंगठी काढून घेतली. यावेळी त्यांना मारहाणही केली.

दरोडेखोरांनी मारली व्यवस्थापकाच्या कानफटीत

कॅशिअर नार्वेकर यांनी आपल्याजवळ आणखी पैसे नाहीत, असे सांगतल्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा व्यवस्थापक श्वेता भारतीय व उपव्यवस्थापक मनिष प्रमाणे यांच्याकडे वळविला. त्यांच्याकडे पैशाची मागणी केली असता त्यांनीही आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी व्यवस्थापक श्वेता भारतीय यांच्या कानफटीत मारली व त्यांच्याकडे लॉकरच्या चाव्यांची मागणी केली. त्यांनी याला नकार दिला.

दरोडेखोरांनी बँकेतील ग्राहकांनी लुटले

बँकेतील कॅश तसेच कॅशिअरची अंगठी यांची लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी बँकेतील ग्राहकांकडे मोर्चा वळविला. त्यांना बंदुकीचा धाक दाखवून आरडाओरड केल्यास जिवंत मारण्याची धमकी दिली. ग्राहकांनी दरोडेखोरांकडे आपल्याकडील पैसे, दागिने घ्या पण जिवंत सोडा असा गयावया केला. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत ग्राहक पंढरीनाथ पोळे यांच्याकडील एक लाख रुपये, माधुरी देशपांडे यांच्याकडील दागिने तसेच गौतमी उर्फ लता चिमुलकर यांच्याकडील मंगळसूत्र व बांगडय़ा हिसकावून घेतल्या.

एटीएममधील चार लाख रुपये लुटले

ग्राहकांनी लुटल्यांनर दरोडेखोरांपैकी तिघेजण बँकेच्या एटीएममध्ये घुसले. एटीएमचा बॉक्स खोलून आतील सुमारे 4 लाख रुपये रोख पळविले, अशी माहिती बँक व्यवस्थापकांनी दिली.

बँक कर्मचारी लता चिमुलकरचे धाडस

अवघ्या दहा मिनिटाच्या या नाटय़मय घडामोडीत दरोडेखोरांनी आतमधील ग्राहक पंढरीनाथ पोळे यांना वगळता सर्वांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. लता चिमुलकरचा हात मुरगाळून त्यांच्याकडील दागिने हिसकावून घेतले. याच दरम्यान, तिघे दरोडेखोर आतमध्ये गेल्याचे पाहून बँक कर्मचारी लता चिमुलकर यांनी धाडस करत शर्टर उघडून बाहेर धाव घेतली. आरडोओरड करीत बाजूला असलेल्या परब यांना घटनेची माहिती दिली. आरडाओरड ऐकून आजूबाजूच्या लोकांनी बँकेकडे धाव घेतली. त्यामुळे आजुबाजुच्या लोकांना या दरोडय़ाची माहिती मिळाली. त्यामुळे दरोडेखोराला पकडणे शक्य झाले.

 बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे लॅपटॉप फोडले

दरोडेखोरांनी बँकमधील सीसीटिव्ही कॅमेरे बंद करुन लॅपटॉप फोडले. बाहेरील आवाज ऐकून एक लॅपटॉप व रोख रक्कम घेऊन दरोडेखोरांनी बाहेर धाव घेतली. त्याबरोबर आतमधील संदीप सरमळकर व इतरांनी ओरडत बाहेर धाव घेतली. आरडाओरड झाल्यावर बँकेच्या बाजूला असलेले दीपक गांवकर, ज्योती गांवकर बाहेर आले. दीपकने एका दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने दीपकला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडील सोनसाखळी हिसकावून घेतली.

नागरिकांनी पाठलाग करुन दरोडेखोराला पकडले

बँकेतून बाहेर आलेल्या कर्मचारी व ग्राहकांच्या आरडाओरडीच्या आवाजाने बाहेरील नागरिक सर्तक झाले. विशांत परब, शंकर गडेकर, दीपक गावकर, आत्माराम (आप्पा) लिंगुडकर तसेच अँथोनी नरोन्हा, राजेसहाब सुदरबाग (राजू), विनेश साळगावकर आदींनी दरोडेखोरांच्या मागे धाव घेतली. यावेळी दरोडेखोरांनी पाचवेळा नागरिकांवर गोळीबार केला मात्र त्यांनी तो चुकविला. सुमारे अर्धा किलोमीटरचा पाठलाग करीत म्हापसाच्या दिशेने विश्वाटी विश्वेश्वर मंदिर जवळच्या रस्त्यावर एका दरोडेखोराला पकडण्यात नागरिकांना यश आले. त्या दरोडेखोराच्या हातात भलामोठा सुरा होता. त्याने अँथोनी नरोन्हा यांच्यावर वार केला मात्र त्यांनी तो चुकविला. जमावाने त्याला बेदम मारहाण करीत त्याच्या सुऱयानेच त्याच्या पाठीत वार केले.

दुसऱया दरोडेखोराला पोलिसांनी पकडले

नागरिकांनी विश्वाटी विश्वश्वर मंदिराजवळ एका दरोडेखोराला पडकल्यांनतर म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर पोलीस पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरोडेखोराची जमावाच्या तावडीतून सुटका करत जीपमध्ये टाकले. त्याला त्वरित म्हापसा आझिलो इस्पितळात नेण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दुसरा एक संशयित आरोपी शेतातून गिरी भागाकडे पळाला असता पोलिसांनी त्याला गिरी येथील बँक ऑफ बडोदाकडे पाठलाग करुन पकडण्यात यश मिळविले. पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील, तुषार लोटलीकर यांनी त्याला पकडण्यात यश मिळविले.

दैव बलवत्तर म्हणून वाचलो : कॅशिअर गोविंद नार्वेकर

केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण दरोडेखोरांच्या तावडीतून सहीसलामत सुटलो. पत्नीने आज सुट्टी घेऊन मयडे येथे फेस्तला जाऊया असे सांगितले होते. मात्र आपण नकार देत त्यांना जायला सांगून बँकेत कामाला आलो होतो. दरोडेखोरांनी आपल्याला मारहाण करत अंगठी हिसकावून घेतली. दरोडेखोर व्यवस्थापकाच्या कॅबिनमध्ये गेल्यावर सोनसांखळी काढून लपविली तसेच त्यांच्याकडील मनीपॉकेट ड्रॉवरखाली फेकले.  आपणास दरोडेखोरांनी आडवा पाडून डोक्यावर लाथाबुक्यांनी पैसे मागत मारहाण केली. त्यात आपले शर्टही फाटले, अशी माहिती कॅशिअर गोविंद नार्वेकर यांनी दै. ‘तरुण भारत’ला दिली.

आर्सेकराच्याकारला लागली गोळी

दरम्यान यावेळी साळगावहून आपल्या मारुती कार जीए 01 आर. 9156 ने डिएमसी कॉलेजचे माजी प्राचार्य राजन आर्सेकर म्हापशाच्या दिशेने येत असता दरोडेखोरांनी झाडलेली गोळी त्यांच्या कारच्या मागील काचेला लागली. त्यामुळे कारची काच फुटली. यातून आपण बचावलो असल्याचे यावेळी आर्सेकर म्हणाले.

दरोडय़ानंतर संदीप सरमळकर, अँथनी नरोन्हा, राजेसाहेब सुकंत, लिंगुडकर, जाफर नदाफ यांनी दरोडेखोरांचा नाटय़मयरित्या पाठलाग करीत व दरोडेखोरांच्या बंदुकीतील गोळय़ा चुकवत दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळविले. यात ते किरकोळ जखमी झाले. दरोडेखोरांनी बंदुकीतील पाच गोळय़ा झाडल्या. मात्र त्या सर्वांनी चुकविल्या.

उपसभापतींकडून कौतूक

राजेसाहेब सुकंत हे कळंगूट येथील रहिवासी आहेत. ते कळंगूटच्या दिशेने जात होते. बाहेर रस्त्यावरून गोळीबार करीत पळणाऱया दरोडेखोरांना पाहिले असता त्यांनीही पडकण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोरांनी झाडलेली एक गोळी त्यांच्या कंबरेच्या जवळून गेली. तरीही त्यांनी पाठलाग सुरुच ठेवला. अर्धा कि. मी. पोहोचल्यावर एकटय़ाला पकडले. त्याच्याजवळ 1 लाख रुपये व बंदूक होती. सदर रक्कम व बंदूक काढून घेऊन नंतर पोलिसांच्या स्वाधीन केली. मात्र सदर रक्कम देत असता आपल्या खिशातील पगाराचे पैसे त्यातून गेल्याने त्यांना रडायला येऊ लागले. याबाबत उपसभापती लोबो यांना कळताच त्यांनी त्यांचे कौतूक करीत गेलेले तीन हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. तसेच प्रसंगावधान दाखवून दरोडेखोरांना पडकण्यात सहभाग घेतलेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.

घटनेची माहिती मिळाल्यावर उपसभापती मायकल लोबो, जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधीक्षक शॅराफिन डायस, पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. दरम्यान सरपंच मिल्टन मार्किस यांनीही येथे भेट दिली.

दंडुके घेऊन फिरणे बंद करा : उपसभापती लोबो

दिवसाढवळय़ा असे दरोडे पडणे हे गंभीर बाब आहे. असा विचारही कुणाच्या मनात आला नसेल. चित्रपटात जसे पाहतो तसे आज येथे घडले आहे. काही नागरिकांनी जीवाची पर्वा न राखता पाठलाग करीत दरोडेखोरांना पकडले. ही अभिनंदनाची गोष्ट आहे. आता यापुढे प्रत्येक पोलिसाला बंदूक घेऊन फिरण्याची वेळ आली आहे. आता त्यांनी दंडुके घेऊन फिरणे बंद करावे. किनारी भागात तर आर्थिक व्यवसाय मोठा होतो. पोलिसांनी आता अशा दरोडेखोरांपासून सावधगिरी बाळगायला हवी अन्यथा येथे काहीही घडू शकते, असे यावेळी उपसभापती लोबा म्हणाले.

 

Related posts: