|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘काँग्रेस-पाक’ संबंधांवरून नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

‘काँग्रेस-पाक’ संबंधांवरून नरेंद्र मोदींचा हल्लाबोल 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

गुजरातच्या दुसऱया आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाअगोदरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवरील शाब्दिक हल्ले सुरूच ठेवले. मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. पाकिस्तानातील सैन्य आणि गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी अहमद पटेलांना गुजरातचा मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसला मदत का करत आहेत? याचा अर्थ काय घ्यायचा असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले.

पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत काँग्रेस नेत्यांच्या गुप्त बैठका झाल्या. या बैठकांनंतर पाकचे उच्चाधिकारी अहमद पटेलांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसला सहकार्य पुरवित आहेत. अय्यर यांनी मला नीच म्हणण्याच्या एक दिवस अगोदर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पाकिस्तानच्या माजी विदेशमंत्र्याने अय्यर यांच्या निवासस्थानी चर्चा केल्याचा दावा जाहीर सभेत करत मोदींनी काँग्रेसच्या अडचणी वाढविल्या आहेत.

अय्यर यांनी नीच म्हणून माझा नव्हे तर पूर्ण गुजरातचा अपमान केल्याचे वक्तव्य मोदींनी केले. अय्यर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. तेव्हापासून भाजपकडून सातत्याने या वक्तव्यावरून काँग्रेसला घेरले जात आहे. मोदींनी या वक्तव्याला गुजरातच्या अस्मितेशी जोडून काँग्रेसवरील शाब्दिक हल्ले सुरूच ठेवले.

गुजरातचा अपमान करणारे मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत गुप्त बैठका घेतल्या होत्या. या बैठकांचे कारण कोणते असा प्रश्न विचारत पंतप्रधानांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेत्यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा केला.

जोपर्यंत मोदींना मार्गातून हटविणार नाही, तोपर्यंत दोन्ही देशांचे संबंध चांगले होणार नसल्याचे वक्तव्य अय्यर यांनी पाकिस्तान दौऱयावेळी केले होते. या वक्तव्याचा उल्लेख करत मोदींनी अय्यर हे माझी सुपारी देण्यासाठीच पाकिस्तानात गेले होते असा आरोप केला.