|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सर्वांसाठी शांती आणि समृद्धी महत्वाची

सर्वांसाठी शांती आणि समृद्धी महत्वाची 

प्रतिनिधी/ मडगाव

आज सर्व बाबतीत ताण तणाव अधिक असतात, त्यामुळे मनाला शांती मिळत नाही, माणूस अस्वस्थ असतो, आज सर्वांनाच शांती व समृद्धीची गरज असल्याचे उद्गार केंद्रीय समाज कल्याणमंत्री थवरचंद गेहलोत यांनी काढले. श्री. गेहलोत हे जैन इंजिनियरिंग सोसायटीच्या अकराव्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळय़ात बोलत होते.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दक्षिण गोव्याचे खा. नरेंद्र सावईकर, अजय कुमार सिंग, अशोक सोजाथिया व राजेंद्र सिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जैन इंजिनियरिंग सोसायटी स्थापना 15 वर्षापूर्वी करण्यात आली होती. तेव्हा पासून या सोसायटीच्या माध्यमांतून जैन इंजिनियरिंर्सनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. कॅरियअर मार्गदर्शन, नेत्र चिकित्सा, रक्तदान, वैद्यकीय शिबीरे, वाहतूक जागृती तसेच होतकरू मुलांना आर्थिक मदत इत्यादी उपक्रम राबविण्यात आले आहेत.

2006 पासून दर वर्षी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते. त्यावेळी सोसायटीच्या 18 विभागातील सदस्य आपल्या कुटूंबियांसोबत उपस्थित राहून परिषदेत भाग घेतात. यंदाची परिषद गोव्यात झाली.

केंद्रीयमंत्री थवरचंद गेहलोत यांनी जैन इंजिनियरिंग सोसायटीच्या कार्याची दखल घेत, पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. समाजात शांती व समृद्धी निर्माण होणे ही काळाची गरज आहे. त्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. तंटे, तणाव या मुळे काहीच साध्य होत नाही, माणसांवर मानसिक परिणाम होत असल्याचे उद्गार त्यांनी पुढे बोलताना काढले.

खा. नरेंद्र सावईकर यांनी गोवा हा शांत प्रदेश असून येथे कलेचा वारसा हा मोठा असल्याचे सांगितले. येथील माणसे देखील प्रामाणिक असून सर्व धर्मातील लोक गुण्या गोविंदाने नांदत असल्याचे सांगितले. यावेळी आनंदजी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंग जैन, राष्ट्रीय सचिव शरद सेठी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला शरद सेठी यांनी सर्वाचे स्वागत केले तर शेवटी गोवा विभागाचे अध्यक्ष सनत कुमार जैन यांनी आभार मानले. यावेळी जीवन गौरव पुरस्कार औरंगबाद येथील मोतीलाल पाटंनी यांना प्रदान करण्यात आला. तसेच स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात आले. 

Related posts: