|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कर्जमाफीपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही

कर्जमाफीपासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही 

प्रतिनिधी/ कोल्हापूर  

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी अंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील 43 हजार 304 शेतकऱयांना आतापर्यंत 94 कोटी 58 लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे. यात 13 हजार 385 शेतकरी थकबाकीतील तर 29 हजार 819 शेतकऱयांना प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे. आणखी 37 हजार खातेदारांच्या अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या निकषांना पात्र असणारा एकही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही. यासाठी सहकार विभागाकडून काटेकोर नियोजन केले आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे यांनी दिली.

राज्यात 19 हजार कोटींचे वाटप

 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात 41 लाख शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम शासनाने बँकाकडे वर्ग केली आहे. या योजनेंतर्गत राज्यात 77 लाख अर्ज प्राप्त झाले असून छाननी नंतर दुबार झालेली खाती दूर करुन 69 लाख खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकाकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरीत केला आहे, असे काकडे यांनी सांगितले.

पात्र पण अर्ज न केलेल्या शेतकऱयांनाही कर्जमाफी मिळणार

जे शेतकरी पात्र होते, पण वेळेत अर्ज करू शकले नाहीत. अशा शेतकऱयांनाही या योजनेत समावून घेण्याबाबत शसनाने निर्णय घेतला असून शेवटच्या पात्र शेतकऱयाला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे.

आतापर्यंत 43 हजार 304 शेतकऱयांना कर्जमाफीचा लाभ

कर्जमाफीच्या कामास सहकार विभागाने प्राधान्य दिले असून सर्वच पात्र शेतकऱयांच्या खात्यात निधी उपलब्धतेनुसार कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे. असे सांगत जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे म्हणाले, कर्जबाजारी शेतकऱयांना दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याबरोबरच नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाही गतीमान केली आहे. कोल्हापूर जिल्हयात आतापर्यंत 43 हजार 304 शेतकऱयांना कर्जमाफीच्या निर्णयाचा लाभ दिला आहे. यामध्ये 13 हजार 385 शेतकऱयांना 48 कोटी 21 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, 29 हजार 819 शेतकऱयांना 46 कोटी 35 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले आहे.

राज्यातील 36 लाख शेतकऱयांचा सातबारा कोरा होणार

कर्जमाफीच्या या निर्णयामुळे 36 लाखाहून अधिक शेतकऱयांचा सात-बारा आता कोरा होणार आहे. तर नियमितपणे कर्जफेड करणाऱया शेतकऱयांना पीक कर्जाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम देण्यात येणार आहे. मात्र ही रक्कम किमान 15 हजार रुपये असेल. तथापि शेतकऱयांनी कर्जाची पूर्णत: परतफेड केलेली रक्कम 15 हजारपेक्षा कमी असल्यास अशी संपूर्ण रक्कम शासनातर्फे देण्यात येत असल्याचे काकडे यांनी शेवटी सांगितले.

आणखी 57 कोटी प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्हय़ासाठी आणखी 57 कोटी रुपये प्राप्त झाले असून 37 हजार 300 हून अधिक शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संबंधित शाखांकडे वर्ग करण्यात आले आहेत. सदरची रक्कम नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दिली.

Related posts: