|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मी व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठीच लिहितो : कवी अजय कांडर

मी व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठीच लिहितो : कवी अजय कांडर 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

जीवन जगताना वेगवेगळय़ा व्यवस्थेत अनेक बदल, स्थित्त्यंतरे घडत असतात. त्यामधील काही घटना व प्रसंग आपल्यामधील आतल्या आवाजापर्यंत पोहचतात. त्यातुन आपणाला लिहिण्याची उर्मी मिळते. आजपर्यंत माझ्याकडून जे साहित्य निर्माण झाले त्यामध्ये त्या सगळय़ा घटना, प्रसंग आणि वास्तवाचा अंतर्भाव आहे.  त्यामुळे मी व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यासाठीच लिहितो असे मत प्रसिद्ध कवी व पत्रकार अजय कांडर यांनी व्यक्त केले. येथील अक्षर मानव, रोटरी क्लब व नारायण सुर्वे कवी मंच यांच्या वतीने आयोजित कवी अजय कांडर यांची एकनाथ पाटील यांनी प्रकट मुलाखत घेतली. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित या मुलाखतीला वेगवेगळय़ा क्षेत्रातील साहित्यप्रेमी रसिक श्रोत्यांनी उपस्थिती लावली होती.

‘हत्ती इलो’ या प्रदिर्घ काव्य संग्रहामुळे महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेल्या अजय कांडर यांच्या या मुलाखतीस रसिक श्रेत्यांची चांगली दाद मिळाली. या मुलाखतीत एकनाथ पाटील यांनी कांडर यांना बोलते केले. यावेळी पाटील यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांतून कांडर यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून काव्य लिहिण्यापर्यंतचा प्रवास, काव्य निर्मिती प्रक्रिया अशा विविधांगानी त्यांनी दिलेल्या माहितीतून ही मुलाखत बहरत गेली. यावेळी बोलताना कांडर म्हणाले वारकरी सांप्रदायाचे वातावरण घरात होते. त्यामुळे अगदी 12 ते 13 व्या वर्षी मी काहीतरी लिहू शकतो याची जाणीव मला झाली. वयाच्या 16 व्या वर्षी पहिली प्रेम कवीता लिहिल्याचा त्यांनी उल्लेख केला. लहाणपणापासून एकत्रीत कुटुंबात राहून  घरातील आणि आजुबाजुच्या बायकांचा संघर्ष मी जवळून पाहिला. पाण्यासाठी अगदी पहाटे पासून झऱयावर येरझाऱया मारणाऱया बायांच्या त्या संघर्षाने ‘बाया पाण्याशीच बोलतात’ या माझ्या कवितेला जन्म दिला. मी वारकरी सांप्रदाय मानतो. पण संत ज्ञाानेश्वर व तुकारामांनी ज्यावेळी परंपरा उलटी तपासून पाहिली त्याचवेळी विठ्ठलाकडे पोहचले. यावेळी काही कवी व लेखकांच्या दिखाऊपणा विषयी बोलताना ते म्हणाले, की अशा लेखक व कवींनी दिखाऊपणाला महत्व न देता आपल्यातील सामान्यपण हरवू नये याची प्रकर्षाने काळजी घेतली पाहिजे. उत्तम निरिक्षण क्षमता असणाराच चांगला लेखक होवू शकतो.

काव्य लेखनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, सतत विचाराच्या पातळीत राहिल्याशिवाय कविता लिहीता येत नाही. यावेळी त्यांनी आपल्या अनेक कवितांबद्दल बोलत असतानाच मला ‘बायका पाण्याशीच बोलतात’ या कवितेला ओलांडून जाणारी कविता लिहायची आहे असे सांगताच पेक्षकांनी त्याना टाळयाच्या गजरात दाद दिली. यावेळी त्यांनी ‘हत्ती इलो’ या दिर्घ काव्याच्या निर्मितीच्या संकल्पनेची माहिती देताना सांगीतले, मला नाटक लिहायचे होते, पण नाटक लिहिता लिहिता 75 पानांची दिर्घ कविता तयार झाली. कादंबरी लिहीण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की जगण्यातील चिंतनाच्या पातळीवरील काही मांडता आले तरच कादंबरी लिहीन. उत्तरोत्तर बहरत गेलेल्या या मुलाखतीत त्यांनी प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी राजकीय हस्तक्षेप असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. पत्रकार आणि कवी या संदर्भात बोलताना ते म्हणाले, जीथे बातमी सुरू होते तीथेच कवितेची सुरूवात होते.

आपल्या ‘हत्ती इलो’ या दिर्घ काव्य संग्रहाविषयी बोलताना त्यांनी राजकारणातल्या हत्ती प्रवृत्तीने केलेले माणसाचे उद्धवस्तपण मांडले असल्याचे सांगीतले. यावेळी त्यांनी आपल्या विविध साहित्त्य निर्मितीमधील घटनाक्रम, सूचकता यांचे सविस्तर विवेचन मुलाखतीच्या माध्यमातून केले. या कार्यक्रमास  जेष्ठ साहित्यिक राजन खान, गझलकार प्रसाद कुलकर्णी, माजी शिक्षण उपसंचालक संपत गायकवाड यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदीयाळी होती. कार्यक्रमाचे प्रास्तविक अक्षर मानव, इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी केले. साहिल शेख यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ साहित्त्यिक राजन खान यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्रदीप गांधी, शैलेश खुडे, संजय होगाडे यांच्यासह मान्यवरांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.